Subscribe Us

मेळघाट


 *अध्याय - २*

*कथा मेळघाटच्या - २*

*आमाकोन साजाऊबा*


चेतो महिन्याचा दूसरा मंगळवार. चिखलदऱ्याच्या देवीला कबूल केलेला नातवाचा नवस डोकरा आबाला फेडायचा होता. रानातून निसवलेली झाकट काळोखाच्या रुपानं गर्दगहिरी झाली तशी त्याने सगळ्यांना हाक मारली. दहा बैलगाडित पस्तीस चाळीस जनांचा अटाला बसला तसे शेवटी दोन खम्मन बकरे आबानं आपल्या गाडित चढवले. रात्रभर प्रवास करुन दुसऱ्या दिवशी देवीची पूजा बांधायची होती. खिचड़ा आणि जिलुच्या (बकऱ्याचे मासं) नैवदयानं देवी नवसाला पावणार होती. बानाच्या (अस्वल) तावडीतून जिवंत वाचलेल्या नातवाच्या घोयसलेल्या अंगातला किजा कासु (वेदना, दुःख) निघुन जाईल ही डोकरा आबाची आदिम श्रध्दा. कोरकुंच्या निष्पाप मनात कायम लौकिक जिवानाप्रती जिज्ञासा आणि पारलौकिक गोमजाप्रति अतूट श्रध्दा ठासून भरलेली असते. कोरकू भाषेत गोमज म्हणजे देव. रावन सभ्यतेचे पूजक असलेल्या कोरकुंच्या श्रद्धेच्या आवर्तात अनेक गोमज येतात. म्हणूनच तर मेळघाटच्या निबिड़ अरण्यात आदिम देवांची ठाणी ठीकठिकाणी आपल्याला पहायला मिळतात. गोंडांच्या अध्यात्मिक जिवनातील बड़ादेव किंवा महादेवाची संकल्पना येथील बहुतेक जमातिंच्या पूजा विधिंचा भाग आहे. येथे प्रचलीत वेगवेगळ्या बोलीभाषेत अस्तित्वात असलेल्या, मौखिक परंपरेत विविध जमातिंच्या देवत्वाच्या संकल्पनेचा सूर आपल्याला सापडत असला तरी सगळ्या जमाती मूलतः निसर्गपूजक आहेत. सृष्टि आणि समस्त प्राणीमात्रांमधे इश्वराचे अस्तित्व मानणाऱ्या जमातींचा मृताला आणि जादूटोण्यावर अढळ विश्वास आहे. म्हणूनच तर गोमज आणि गाथा म्हणजे दुष्ट आत्मा हे दोन शब्द कोरकू बोलीत प्रचलीत आहेत. ईश्वराला प्रसन्न करण्यासाठी जसे अनेक निधी आणि पूजा आहेत, तसेच गाथाला प्रसन्न करण्यासाठी गाथा उत्सव होतो. मेळघाटच्या कोरकू लोकसंस्कृतीत गृहदेवता, कुलदेवता आणि मृतात्म्यांना उरा गोमज, गोत्र गोमज आणि गाथा गोमज म्हणून ओळखले जाते. गोत्र गोमजाचे स्थान एखाद्या वृक्षाखाली असते तर गाथा गोमजाचे स्थान स्मशानात. कोरकुंच्या सगळ्या गोत्रांची नावे वृक्ष, गवत आणि प्राणीमात्रांच्या नावावरून पड़लेली आहेत. आपल्या गोत्राचा वृक्ष वा गवत प्रत्येकाला पूजनीय असते. कोरकुंच्या उत्पत्तीकथेचे साधर्म्य सायबेरीयातील जमातीच्या उत्पत्तीसोबत जुळते हे अभ्यासकानी शोधून काढले आहे. अखील विश्वातील समस्त जमातींच्या अस्तित्वाचे अधिष्ठान निसर्ग आहे आणि श्वासाचे परीमान स्वातंत्र, समता आणि बंधुत्व आहे म्हणूनच तर येथे विकल्पाना खोल गाडून निर्वैर आणि निर्वीष झाडझडोऱ्याची, प्राणीमात्रांची पूजा केली जाते. या जमातिंची देवत्वाची संकल्पना अत्यंत सहज आणि समजायला सुलभ आहे. आपल्यातील एक पवित्र आत्मा म्हणजे गोमज म्हणूनच तर खोंगडा, अंबापाटीवरून बेलकुंडकड़े जाणाऱ्या वाटेवर ठान मांडून बसलेल्या, राजदेवबाबाला प्रत्येक पांथस्थ घटकाभर थांबुन आपल्या खिशातील विडी, तंबाखु, गुटका अत्यंत प्रेमाने खाऊपिऊ घालतो. उत्तर मेळघाटात कोकरू खामलाजवळ एका खोल दरीत भंगी दैताचं ठाणं आहे. मेळघाटातले समस्त थाट्या (गुराखी) आणि गोपालक माळी पोर्णिमेला देवाला मीठ आणि गांजेलच्या डहाळया वाहतात. देवासमोर तुपाचा दिवा पेटवून कोंबडा बकऱ्याचा बळी दिला जातो. देवाच्या अंगावरून उतरलेलं मीठ, गांजेल गुरांना खाऊ घातलं तर दुभतं वाढत हा सश्रद्ध समज. रानातून औषधी वनस्पति वापरासाठी काढतांना, उपटतांना त्या वृक्ष वनस्पतिची आराधना करुन आवाहन केले जाते. धारगढ़ मोझरी आणि कावड़ाझीरिचा महादेव, भुतखोऱ्यातून माखल्यावरून पुढे जातांना टेकडीच्या पायथ्याशी बसलेला चितामदेव, रायपुरवरून हतरूकड़े जातांना गच्च झडित रानाचं रक्षण करीत युगानुयुगे बसलेला डोलारामबाबा, रंगुबेलिजवळ जनसामांन्याची श्रध्दा पालवनारा धावनगिरी बाबा, सेमाडोहवरुन धारणीकड़े जातांना मुख्य रस्त्यावर पांथस्थांना विसावा बहाल करणारा भुमकाबाबा ही मेळघाटच्या श्रद्धेच्या आवर्तात डूचमळणारी आशेची स्त्रोत आहेत. तारुबादांच्या काद्रीबाबाला जाणाऱ्यांची संख्या आता वाढली आहे. जानेवारीत टिटंबाला भरणारी मोतीमातेची जत्रा, बहीरमची जत्रा किंवा मंनभंगच्या टीपऱ्यादेवाची जत्रा म्हणजे सश्रद्ध आदिम मनाच्या मनोरंजन आणि खरेदीचा मेळ जणु वस्तापुर, मालनीकुंडी किंवा मेळघाटातील अनेक गावांमध्ये चेतो म्हणजे चैत्र महिन्यात देवकुदाई होते. भुमका म्हणजे गावपुजाऱ्याच्या अंगात देव येतो. बीमार, गांजलेले डाई देवापुढे सवाल मांडतात. देव जबाब देतो, अंगारा, बेल (मंतरलेला धागा) देतो. 

मेळघाटात अश्विन महिन्याच्या पहिल्या अमावस्येनंतर येणाऱ्या मंगळवारी कोरकू, उरा गोमज म्हणजे गृहदेवतेची पूजा करतात. रानात वसलेल्या गावांमधील कोरकू धार्मिक संस्कृतित मुठवा गोमज, खेडा गोमज, खनेरा गोमजांचे महत्व अनन्यसाधारण आहे. मुठवा गोमज आणि खेडा गोमजांची ठाणी हरेक कोरकू ढाण्यांवर असतातच. मुठवा गोमज आणि खेडा गोमज ही जशी ग्रामदैवत तसे हरदुला गोमज, कालजग गोमज आणि गाथा गोमजांची वस्ती पानाफुलांच्या सानिध्यात, कड़ेकपारित असते. कोरकुंच्या प्रमुख सहा गोत्रदेवांची पूजा विवाह आणि इतर उत्सव प्रसंगी केली जाते. ही सहा लोकदैवतं म्हणजे विविध वृक्ष कींवा प्राणी. प्रकृतीची ईश्वररुपात केलेली आराधनाच जणू. मेळघाटात गावोगावी मध्यभागी मेघनाथाची प्रतिमा खाबांच्या रुपाने उभी आहे. फागुनला (होलीकोत्सवात) मेघनाथाची पूजा केली जाते. 

आदिवासींच्या दैवतकथा स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे. लहान लोकसमुहाची लोकतत्वीय वैशिष्टे स्वतंत्र व भिन्न असतात. येथील लोकसाहित्यातून धार्मिक आचार, विधि आणि लोकदैवतांचे वेगळेपण सिद्ध होत असते. मेळघाटच्या एकूण धार्मिक परंपरेत, लोकंपरंपरेत कृषी संस्कृति आणि निसर्गाला अन्यन्यसाधारण महत्व आहे. 

डोकराआबानं भुमकाच्या हातात ज्वारीचे दाणे देताच, भुमकाच्या रुपानं देवं कुदू लागला. डोकराआबानं बकऱ्याच्या गळ्यावरून दाथरोम (विळा) फिरवताच रक्ताचा फवारा उडू लागला. दातकड़ी बसलेल्या बोको टारयच्या चेहऱ्यावरून नजर फिरवत भगत विक्राळ आवाजात चित्कारला “आमाकोन साजाऊबा”.


----------------

    *प्रा. डॉ. एकनाथ तट्टे*

Post a Comment

0 Comments