Subscribe Us

मेळघाट 3

 *अध्याय - २*

*मेळघाटच्या कथा - ३*

*स्तोत्रात इंद्रिये अवधी*


अश्विन पोर्णिमेची पहाट रायपूर हतरुच्या निसरड्या वाटेवर उगवली तसा दाटोणातून सळसळणारा वारा काहीसा बोथट झाला. पहाटेचं गर्भकोमल हास्य पाखरांच्या चिवचिवाटानं आणि डांगीफांदीवर ओघळून आलेल्या सूर्यकिरनांच्या लखलखाटानं रेशीम रेशीम झालं. नाल्याच्या खोबणितून वाट ओलांडू पाहणारी रानकोंबडीची खोप वाचवण्यासाठी मी बाईकचे करकचून ब्रेक दाबले तशी पाठीमागे बेसावध बसलेली स्टेला आपल्या तंद्रीतून जागी झाली. गिरक्या घेणाऱ्या वाऱ्यावर स्वार होऊन पुन्हा कूच केलं तसा चिखलाम बिटच्या अस्पर्ष वाटेवर बसलेला लाबु दृष्टीपयास आला. निर्व्याज स्नेहाची कळी त्याच्या हास्याच्या रुपानं खुलली तशी मी बाईक आडोशाला उभी केली. अंगाखांद्यावर खेळणारा गागरा उडवून हाती कॅमेरा घेउन स्टेला सज्ज झाली. 

हातातली काठी मानुसभर वाढलेल्या तीखाडी, गोंधळच्या डुफावर फीरवत लांबुन वाट काढ़ायला सुरुवात केली तसे आम्ही भरभर त्याच्यामागे चालायला लागलो. रायमुनीयाच्या झुडूपामधून वाट काढताना बोचकारलेल्या अंगाला कुरवाळत तोंडावर सनस्क्रीन लोशन लावलेली स्टेला कावली तसा लाबु वरमला त्यानं आपल्या पावलांचा वेग काहीसा कमी केला. सागवनावर फुललेल्या झुबकेदार फुलांच्या घोसातून झीरपणारं उन काहीसं धारदार झालं. सूर्यदेवानं थेट आभाळात माथ्यावर ठिय्या मारला तसा हल्दू, लेंड्या आणि साजडच्या डांगा शहारल्या. नदीकाठावर स्तिथप्रज्ञागत उभ्या असलेल्या अर्जुनवृक्षाला टेकून बसत लांबुन जरा उसंत घेतली. चौफेर भीरभीरणारी त्याची नजर एकाएकी धावड्याच्या बुंध्यावर एकवटली तसा तो सजग झाला. तांबुस गवतात अल्लाद पावलं टाकत त्यानं आम्हाला त्याच्यामागे येण्यासाठी खुण केली. सावलीत येताच तो गवतात पहुडला. त्याच्या आज्ञेची आब राखत आम्हीही धावड्याच्या बुंध्यावर बसलेल्या जागली महाराजांवर कॅमेरा रोखत गवतात पडून राहिलो.

वेळुच्या झावळामधून वाहणारा वारा काहीसा वेडावला. उतरणीच्या उन्हानं तलखीभरले वृक्ष पेंगायला लागले. दिवसभर चरून रान्नावलेले जनावरं झाडापेंडाच्या सावलीत रवंथ करत बसले. नितळ शांततेनं रानावर आपला हात फीरवताच महाराजांनी पुढे कूच केली. पडल्यापडल्या स्टेलानं इशारा करताच मी सावध झालो. महाराजांच्या झुबकेदार मिशा ताठरल्या. आपलं कृश शरीर सांभाळत महाराज राणीवसाकडे निघाले तशा राणी सावध झाल्या. आपले गलेलठ्ठ डौलदार शरीर सांभाळत त्या आपल्या जाळ्यावर महाराजांच्या स्वागताला सज्ज झाल्या. विरहाच्या अग्नित होरपळलेल्या महाराजांनी आपल्या पायांचा वेग वाढवला तसा राणी सामोऱ्या झाल्या. दोघानी एकमेकांकड़े बघताच सारं चराचर स्थिर झालं. श्वास गुरफटले. देहप्राण एकाकार झाले. उन्मनीच्या सुरात तल्लीन होत. आदिअंताच्या पल्याड जाताच राणीने डाव साधला. महाराजांनी मान आपल्या अजस्त्र हातांनी मुरगाळत त्यांच्या डोळ्यात आपले दात खुपसले. प्रणयकोमल श्वासांच्या सुरावटी महाराजांच्या निष्प्राण कलेवरात विलीन झल्या. स्टेलाला चेहऱ्यावर खीन्नता उतू आली. कॅमेरा बॅगेत कोंबत ती गपकन उठुन बसली. 

स्टेला म्हणजे जनुकशास्त्राची संशोधक, ट्रेकर आणि सिमौन द बुवा ची निस्सीम भक्त. स्त्रीवादाची भक्कम पुरस्कर्ती रानावनात जाऊन कीटकांच्या मैथुनाच्या फिल्मस रिकॉर्ड करण्याची तिला भारी हौस 

आणि कीटकांच्या शरीरात मैथुनाच्या वेळी होणाऱ्या रासायनिक बदलांचा अभ्यास करण्याची तिला प्रचंड असोशी. ती प्रचंड अस्वस्थ झाली. तसे आम्ही चिखलाम मचानावर परतण्याचा निर्णय घेतला. गवतातून वाट काढतांना मनात विचारांचा गुंता वाढला. 

कोरकू बोलीत जागली महाराज म्हणजे कोळी, स्वायडर. मेळघाटात आढळणाऱ्या कोळ्याच्या विविध प्रजातींपैकी जायंट वुड स्पायडरने विणलेले जाळ बघणं म्हणजे नजरेत रसिकत्व सांधून नक्षीकलेला साद घालणच जणू. पण या रहस्यमयी गूढ़ प्राणीजगतात घडणाऱ्या अनेक गोष्टी समजुन घेतल्या की, मनाला हादरेच बसतात खरं तर विदर्भात आढळणाऱ्या कोळ्यांच्या एकून १६०० प्रजातींपैकी काही तर आयुष्यात एकदाच मैथुन करतात आणि शेवटच्या क्षणी मादीकोळीचे भक्ष बनतात. स्टेला सांगत होती. मादी कोळीचे नरदेह खाऊन टाकला की तीची गर्भारवस्थेतली प्रोटीनची गरज पूर्ण होते म्हणून. पण वाटलं प्रितीच्या अनन्यभावात डूंबून पतंग दिपज्योतीवर झडप घालुन आलिंगन देतोच ना. “ह्या सगळ्या राण्या स्वार्थी असतात” मी स्टेलाला डीवचून पहिलं तसा तीन रानीमधमाशीच्या मैथुनाचा पाढाच माझ्यापुढे वाचला. मैथुनानंतर नरदेहाला गीळंकृत करणाऱ्या नाकतोडाचं चित्रण माझ्यापुढे करताच मी अंगभर शहरलो. निसर्गानं खरं तर मादीला, स्त्रीशक्तिला जाणीवताच भक्कमपणा दिलाय. आधुनिक काळात भौतिकेच्या उतरंडीत प्रितीचे मणी शोधतांना सारेच भयव्याकुळ कातर होताच. चिखलामची संरक्षण कुटी जजरेच्या टप्प्यात येताच मनाच्या सर्द गाभाऱ्यात एक ओळ फुलून आली.

“स्तोत्रात इंद्रिये अवधी"

*-डॉ. ए


कनाथ तट्टे*

Post a Comment

0 Comments