Subscribe Us

मेळघाट 4

 *अध्याय - २*

*मेळघाटच्या कथा -४*

*अश्वत्थ : सर्ववृक्षांना*


कधी मधी रखणीच्या सावलीत उन्हाची तीरीपं उतरतात. मुल्यव्रतांचे ॠतु कालसापेक्ष काळोखाच्या पखालीच्या पायाशी भेलकांडतात. शिशिर तमांच्या छचोर रासवट सावल्या आपल्या सैरंध्री शब्दांनी देहभावाला फितवु पाहतात. तेव्हाही भान शाबुत राहतं. पुराणकथांमधील सभ्यतेसारखं कधीकधी दिलेर विमनस्कता निजरूप घेऊ बघते. तेव्हा भंटोल झाड बनुन मी रानावनात फिरस्ती करतो. मनाचं व्हैतपन गळुन अव्दैताचं पुननिर्माण आनंदवृत्तीच्या निमीत्यानं मनगर्भीत होतं तेव्हा देहशिसारिची भयकातर भावना दृगोचर होते. मी झाड होतो पुन्हा पुन्हा आणि या ॠतुचे दीप मालवून झाडच राहतो युगानुयुगे.

मी चडूपाटीच्या मचानावारून बारामुंदा कँपकडे नदी ओलंडून जातांना वड होतो. हा वड म्हणजे मला या नक्षीवंत रानातला रहस्यमय महापुरूषच भासतो. युगानुयुगे तीष्ठत उभा असलेल्या आतुर प्रियकरासारखा तर कधी समाधिस्त स्थितप्रज्ञासारखा. तर मला या झाडाखाली काहीशी भीती वाटते तेव्हा मी सीपना पटेलचा धावा करतो. हा सीपना पटेल म्हणजे मेळघाटच्या रानातील सर्व वुक्षांचा थोरला भाऊ. अंगापेरानं भरदार, बुंध्याचा घेर, गोलाई, उंची, वय, डांगाफांद्याचं वैभव आणि पाखरांची दोस्ती निभवत हा महावृक्ष रायपुरवरून जारिदाकडे जातांना रानवाटेवर मध्ये लागणाऱ्या डोलारामबाबा वनखंडात ठाण मांडून उभा आहे. कोरकूर बोलीत सीपना म्हणजे साग आणि पटेल म्हणजे गावपाटील, गावप्रमुख. खरंतर या महावुक्षाला आलींगन द्यायला अनेक जण आतुर असतात पण अतीसंरक्षित क्षेत्रात जायला बंदी असल्याने तो प्राचीन महाकाव्यातील श्लोकासारखा, स्वप्नातल्या प्रेयसीसारखा अव्यक्त, अनवट नुसता उभा आहे. 

मानवी जीवनात खरं तर आनंद आणि सुख अश्वत्थ आणि उंबरफुलासारखा अप्राप्त आहेत. अश्वत्थ तर भारतीय संस्कृतीचं मुळ आहे. श्रीकृष्ण भगवंतांनी भगवदगीतेमध्ये सांगीतलेच आहे, की मी वृक्षांमधे अश्वत्थ आहे. अश्वत्थ म्हणजे सनातन विश्वास आणि आस्था आहे. वामनपुराणात तर अश्वत्थला सूर्यपुत्र मानलं आहे. स्कंदपुराणात अश्वत्थला विष्णू आणि वडाला शिव म्हटलेलं आहे. 

मेळघाटात आढळणाऱ्या साऱ्याचं वृक्षप्रजाती वर्षानुवर्ष प्रियकरासारखा तीष्ठत उभ्या आहेत. लतावेली मोहरतात, झाडावुक्षांच्या अंगाखांद्यावर चढतात तेव्हा झाडं प्रेमात डुंबलेल्या माणसांसारखी पुननवा होतात. निमदरिच्या माझ्या बांधावर बेहाडाची तीन, एक अश्वत्थ, एक तिवस आणि चार मोहाची झाडं वारसाहक्काने मीळाली आहेत. बहावा, चारोळी, बीबा, पांगरा, काटेसावर, हल्दू, लेंड्या, साजड, धावडा, कांचन, तिवास, कुंभी, पळस, जांभूळ, आंबा, आवळा, महावृक्ष आणि अर्जुन मेळघाटात माझी वाट पहात असतात, तेव्हा मी धारणीच्या रस्त्यावर घटांग जवळ उभा असलेल्या बीजावृक्षाला आलींगन देतो. ब्रह्मासतीच्या नाल्यावर सफेद पाकळ्यांनी नटलेल्या कांचनला डोळ्यांच्या कमानित साठवुन घेतो. तारुबांदा आढावच्या जंगलात काटेसावर, बहाण्याच्या आडोशाने ताणुन देतो. 

ग्रीष्मात रानातनात अंगार फुलतो तेव्हा फिरस्ती दरम्यान आंबेडाच्या डोहातलं अमृत मधुर पाणी पीऊन मी मुरडशेंगाच्या फुलांसारखा गर्भगुलाबी, उर्जावान होतो. नदीच्या काठोणानं फिरतांना अर्जुनाचा भक्कम आधार असतो. मेळघाटातील अर्जुनवुक्ष म्हणजे देवानं पृथ्वीवर धाडलेले साक्षात देवदुत. ह्रदयस्थ प्रीतिला दडवुन ॠषीसारखे युगानुयुगे नदीकाठांवर उभे असलेले अर्जुनवृक्ष म्हणजे प्रकृतीचे उत्तम सहोदर, पळस, बहावा आणि अशोक वाल्मीकींचे प्रिय वृक्ष आहेत. महाकवि कालीदासांनी बहाण्याच्या फुलांचं वर्णन गंधहिन म्हणून जरी केलेलं असलं तरी पळस आणि बहाव्याचा मोहर पहिला, कि सारीच ज्ञानेद्रीय उत्तेजित होतात आणि अनुभवांची गंध आणि रंगापलीकडची उन्मनी गाठतात. 

वामनपुराणात सुगंधित बकुळाच्या निर्मितीची खुप सुंदर कथा आलेली आहे. महादेवाची तपस्या भंग करण्यासाठी जेव्हा कामदेवाने आपला बाण चालवला तेव्हा शिवशंकराने आपला तीसरा डोळा उघडला. त्र्यंबकाच्या नेत्रज्वालांनी पेटलेल्या भयभीत झालेल्या कामदेवाने आपला बाणफेकून दिला, तसे त्या बाणाचे पाच तुकडे झाले. क्षणार्धात त्या पाच तुकड्यांमधून पाच सुगंधीत वृक्षांची निर्मिती झाली. बकुळ त्यापैकि एक. चिखलदऱ्याच्या अप्पर प्लॅटूवर, जुनाट बंगल्याच्या प्रांगंणात उभे असलेले बकुळ वृक्ष मला विषयवासनेसारखे अनंत भासतात. बकुळफुलाच्या चारच प्रजाती भारतात सापडतात त्या म्हणजे मोह, खिरनी, चीकू आणि बकुळ.

आग्रमोहर वसंतॠतुचा संदेशवाहक आहे. प्रेमप्रतीक मोहर आपल्या मधुर गंधामुळे संपूर्ण वातावरण उल्हासित करुन टाकतो. अशोक आणि आम्रवृक्षाचा मोहर कामदेवाला अतिशय प्रिय आहे. दोन्ही कामदेवाचे अस्त्र आहेत. झाड़ाझुडपांमध्ये फिरस्ती करतांना मी आता हिरवागार झालो आहे.       

*-डॉ. ए


कनाथ तट्टे*

Post a Comment

0 Comments