*अध्याय -२*
*मेळघाटच्या कथा -५*
*डाई*
मेळघाटातील कोरकू मौखीक परंपरेतील गीत आणि कथांमधे सृष्टिच्या उत्पत्ती संबधी अनेक लोककथा प्रचलीत आहे. या लोककथांचे आजही काही विधी आणि गीतांच्या माध्यमातून पठन केले जाते.
कोरकुंच्या एकंदरीत अस्तित्वाची, गोत्र कुळांची आणि चालीरितींची माहिती या उत्पत्तिकथांमधून स्पष्टपणे अधोरेखिल केलेली आहे. कोरकू धार्मिक जीवनामधे लंकापती रावणाला सर्वोच्च देवाधिदेव मानलेले आहे. कोरकूंचे अधात्म शास्त्र आणि पुराणकथा रावणाच्या पराक्रमाभोवती फिरतात.
एकदा रावण फिरत फिरत सातपुडा डोंगरावर येवून पोहोचला. त्याला हा प्रदेश एकदम निर्जन दिसल्याने, त्याने भगवान शंकराला या पर्वतावर मनुष्यवस्ति वसविन्यासाठी पार्थना केली. भगवान शंकरानी कागेश्वराकडून (कावळा) थोडी माती मागवली आणि या मातीपासून एक स्त्री-पुरुष याची प्रतिमा बनवली. भगवान शंकराच्या या सर्जन विधीवर इंद्रदेव मात्र रागवला. इंद्राने, भगवान शंकराचा विधिमधे अडथळे आणन्याचा प्रयत्न केला. पण या अडथळ्यांना न जुमानता शंकराने मुर्तिमधे प्राण प्रस्तिष्ठा करून त्यांचे नाव भुला-भुलई असे ठेवले.
भारतातील समस्त कोरकू आजही भुला-भुलईला आपले पूर्वज आणि रावण व शंकराला आपले दैवत मानतात.
कोरकुंच्या उत्पत्ती कथेशी साम्य असलेल्या अन्य एका लोककथेचा उल्लेख डॉ. वेरिअर ऑलवीन यांनी आपल्या ग्रंथात केला आहे. तर कोरकुच्या एका लोकगीतांमधे अजुन एक उत्त्पत्ती कथा आलेली आहे. होळीच्या उत्सवाप्रसंगी हे गीत गायलं जातं. या उत्त्पत्ती कथेनुसार पृथ्वीवर कुठेच मानव वस्ती नव्हती. एक दिवस वडाच्या झाडाखाली सर्व देवांची सभा झाली. या सभेमधे मानव उत्पत्ती आणि समाज निर्मितीचा निर्णय घेण्यात आला. या वेळी मानव घडविण्यासाठी म्हणून, दिमक देवी (उधळीची राणी) कडून माती मागवली गेली. माती आणण्याचे काम कागेश्वराकडे (कावळा) सोपविण्यात आले. माती आणण्यासाठी जातांना कागेश्वराचे पंख अनेकदा झडून पडले. परंतु हतबल न होता कागेश्वर पाई चालत दिमक देवी जवळ पोहोचला. दिमक देवीची मनधरनी करुन कागेश्वरानी थोडी माती मिळवली आणि ती देवाना सोपविली. सर्व देवांनी मिळून या मातीपासून मानव मूर्ति घडविली, परंतु रात्री आकाशातून उतरलेल्या पऱ्यांनी ही मूर्ति तोडून टाकली. काही कुत्र्यांनी मात्र पऱ्यांच्या तावडीतून ही मूर्ति वाचविली. मूर्ती सुकल्यानंतर देवांनी मुर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. या मुर्तिच्या वंशवृद्धीसाठी देवांनी शंकराची आराधना केली. शंकराने देखील मदतीसाठी वाघाच रूप घेऊन पृथ्वीवर आगमन केले. या वाघाने जेव्हा गर्जना केली, तेव्हा मानव जातीमध्ये भीतीचे वातावरण पसरले. रडारडी माजली, जो तो भीतीने सैरवैरा पळू लागला. स्वताला वाचविण्यासाठी कुणी झाड़ावर चढले. कुणी तलावात उडी मारली, कुणी गुहेत जाऊन लपले तर कुणी उंच गवतात लपून बसले, काही वेळानंतर शांतता पसरल्यावर वाघाने मानवाचा लपण्याच्या ठिकाणावरून कोरकुंमधे गोत्र निर्मिती केली. या कोरकू पुराणकथेच्या आधारे कुत्र्याला देखील देवत्व बहल करण्यात आले आहे. कोरकुंच्या एकुण २५ गोत्रांचा अभ्यास केला तर या जमातीची निसर्ग भक्तिचं दृगोचार होते. कोरकुंच्या प्रामुख्याने चार उपशाखा आहेत. राज कोरकू, मवाशी कोरकू, पोथडीया कोरकू, रुमा कोरकू. या चारही उपशाखांमध्ये धोरण करणारी कोरकू जमात मध्यप्रदेशातील निमाड प्रांतात, आसाम राज्यात आणि महाराष्ट्रातील अमरावती आणि नागपूर भागात वास्तव्य करतात.
गतिशीलता जीवनाचे सनातन लक्षण आहे. ज्या समाजात काळानुरूप बदल घडून येत नाही. तो समाज संस्कृतिक आणि सामजिक दृष्टया मृतप्राय होतो. कोरकू समाजात सामजिक आणि सांस्कृतिक पातळीवर गतिशीलता दिसून येते. कोरकुंच्या आर्थिक जीवनात तर प्रचंड मोठं बदल घडून आलेले आहेत. मेळघाटातील अनेक बाजारांमध्ये अलीकडच्या काही वर्षात, विनिमय माध्यम रूपये पैसे म्हणून आजही काही बाजरांमधे भाजीपाला विकणारे कोरकू दुकानदार आधुनिक वजन मापे न वापरता पुरातन बाटे पद्धती वापरतात.
कोरकू लोकजीवनामधे लोकगीतांचं महत्व अन्यन्यसाधारण आहे. येथील लोकगीतं, लोकजीवनातील सत्य स्पष्टपणे मांडन्याचं काम करत असतात. लोकजीवनाची व्याप्ती इतकी मोठी असते की, ती लोकगीतं आणि कथांच्या माध्यमातून देखील स्पष्टपणे समोर येत नाही. कोरकुंच्या निसर्गासोबत एकरूप झालेल्या जीवनात स्थळ, काळ आणि प्रसंग निर्माण होताच अभिव्यक्तिचे कोंब आपोआपच फुलतात. आधुनिक सभ्यतेचा हातात हात धरून मेळघाटातील डाई (माणूस) आजही आपल्याच तालात जगतो आहे. या स्वर्गीय जगण्याला सलाम.
*-एकनाथ तट्टे*
9404337944
0 Comments