*अध्याय - २*
*कथा मेळघाटच्या-१*
*हिरवा चारानी नाव*
मोथ्याचा गणा शनवारे माझा जुना दोस्त. दहा अकरा एकराचे दोन लालतांबुस मातिचे गोटाळ बरडे, तिन खंडया म्हशी, सागाच्या भक्कम खांबांवर टिनपञे चेहऱ्यावर हसु आणि सदैव जोडलेले हात एवढी गणाचि जायदाद. शाकारलेला गोठा आणि तिन पाखि घर. दिवाळीनंतर रानातलं हिरवा चारा सरला कि ढोरा वासरांचा अटाला घेऊन गणा चारापान्याच्या शोधात वऱ्हाडात उतरतो. मृगाचा पहिला पाऊस पडला कि वऱ्हाडात लांबदुर वावरधुऱ्यावर वस्ती करनारे गवळी परत मेळघाटात पांगतात.
अखाडी झाली तसा गणाचा निरोप आला. झाडा झुडपांवर भीरभीरनारे फुलपाखरू थोराड झाले होते. नदी नाल्यांचे ओघळ बदाबदा वाहत होते. वृक्षांची शेवाळलेली जुनाट खोड़ं पाझरायला लागली होती. सातपुडयाच्या तांबुस डोंगररांगा हीरव्याचुटूक गवताने आपल्या कवेत घेतल्या होत्या. गवताचं बी टाकायलाही जागा नाही एवढं गच्च गवत वाऱ्यावर डुलत होत. भिलखेडा फाटा ओलांडला तसा रानफुलांच्या आदिम मखमली सुगंधान मला वेढून घेतलं. डुलणाऱ्या मारवेल, काळी कुसळी, वैद्य, मोशान, पवन्या आणि गोंडे गवताची पाती खिदळू लागली. वावराच्या धुऱ्यावर हसणारं गोंडाळी, लाल गवत मला खुणावू लागलं. मध्ये मध्ये दिसनारी एखाद दूसरी तीखाडी, मोती तुरा आणि डोंगरी गवताची उंचच उंच थोंब दिसली की मन आल्हादित होऊ लागलं. सगळ्या गवताच्या प्रजाति एकमेकांचा हात हातात घेऊन एकमेकांच्या शेजारी वस्ती करून वाऱ्यावर डुलतात. कुणी उंच नाही कि कुणी खुजं नाही. अगदी समान. वाल्ट व्हिटमनच्या काव्यातील स्वप्न प्रतिमा प्रत्यक्षात साकार झाल्याची उन्मनी की गणाच्या घरी पोहचायच्या लालसेनं माझ्या मनोवस्थेला लागु पाहनारी बोच. मनाच्या अवार्चिन तलघरात समाधिस्त बसतो ना बसतो तोच रॉबर्ट फ्रॉस्टच्या नायकाला कुणाला तरी दिलेल वचन आठवतं. चिकटा, शेळा, कुसळी, कुंदा, सीव्का आणि भुसभुसीच्या मध्ये मान वर करू पाहणारी दूर्वा. बारमासी दूर्वा आपल्या सफ़ेद टनक मुळांचा गुंता खोलवर रुजवून जमिनितली ओल शोधत राहते. अगदी कास गवतासारखी बहुवर्षायु, चिवट, अवर्षनावर मात करणारी. कास म्हणजे खटयाळ गवत, कास्तकारांचा फास जणू. एकदा का शेताबांधावर उगवलं की कितीही खोलवरुन खोदून काढ़ा, मरता मरत नाही. उत्तरा नक्षत्राच्या उतरणीनंतर पडयाळचे हातभर लांबीचे उसासारखे तुरे मन वेडावून टाकतात. मध्यप्रदेशातील पचमढीच्या डोंगरांवरुन नागव्दारिच्या घळईत उतरलो कि वनविभागाचा रोरिघाट कॅम्प लागतो. त्या रानातुन कोसभर पुढे चालत गेली कि पुढे हजारो एकराचं कास गवताचं कुरण लागतं. लागट वाऱ्यावर डुलणारे कासचे तुरे मनात साठवून घेत मी दिवसभर वेडावलो होतो. मध्यप्रदेशातील उज्जैनजवळ एक आगर नावाचं गाव आहे. आगर वरुन उत्तरेकडे राजस्थानकड़े निघालो कि मध्ये निलगाईचं एक अभयारण्य लागतं. एकदा गवताचे प्रसिद्ध तज्ञ डॉ. गजानन मूरतकरांसोबत तिथे अभ्यास दौऱ्यावर गेलो. मातीचे नमूने, आर्द्रता तापमान आणि तेथील जैवविविधतेचे आकलन अंतिम टप्प्यात आल्यावर मेळघाटातुन नेलेलं गोंधळ, पोचाटी आणि सुकईचं बी तिथे रुजवण्यात वनविभागला यश आलं. नीलगाईची संख्याही आपसूकच वाढली. मेळघाटातील गुल्लरघाट, अमोना, कोहा, कुंड, धारगड, बोरी, सोमठाना, मेमना, चुरनी आणि केलपानी गावांचं पुनर्वसन झाल्यावर रिक्त झालेल्या गावठाणांवर कुरणं डूलत आहेत. तृणभक्षी आणि मांसंभक्षी प्राण्यांची संख्या वाढली आहे. बोरी, कोहा, कुंड आणि आतील रानकपारींमध्ये वावरनाऱ्या वाघांचा वावर अगदी रस्त्यांवरच्या गावांमध्ये देखिल बघायला मिळतो आहे. मध्यप्रदेशातील सातपुडा राष्ट्रीय अभयारण्यातुन तर एकून ३५ गावांचे यशस्वी विस्थापन करुन वनविभागाने कुरनविकास साधला आहे. कान्हा आणि बांधवगढ़च्या जंगलाची तर नैसर्गिक ठेवनच अभिजात आहे. गच्च दाट झाडी असणाऱ्या रानामध्ये ठराविक अंतरावर असणारे शेकडो एकरांचे कुरण म्हणजे प्राण्यांसाठी नैसर्गिक लपन आणि विनिच्या हंगामात गवसलेला नैसर्गिक अधिवास. बठाण, राजबहरा, कल्लवाह, मगधि, सेहरा, भीतरी, सुहारी बाह आणि अंधेरी झीरिया सारख्या बांधवगडच्या जंगलातील कुरनांचं सौदर्य पावसाळयात डोळ्यात साठवन्यासारखं दुसरं थोर भाग्य या आयुष्यात नाहीच. अंधेरी झीरियाच्या दलदल माजलेलं कुरन बेर गवताने गच्च झाकलेलं असतांना आम्हाला त्या गवतात लागलेला किटकभक्षी वनस्पतिचा शोध म्हणजे एकदम युरेकाच.
मेळघाटात आढळणाऱ्या गवताच्या एकून ११६ प्रजातींपैकि गोंधळ, पोचाटी, सुकई, मोतीतुरा गवत जनावरांच्या आवडीचं. उत्तरा नक्षत्र संपलं की गवळी गवत कापनिला सुरुवात करतात. पेंढयांचे गुड रचून गवत उन्हाळ्यात वैरंण म्हणून वापरले जाते. संशोधनानंतर गवतांच्या प्रजातिचं एकमेकांशी असलेलं सख्यशास्त्रज्ञांच्या लक्षात आलं आहे. गोंधळ, मोतितुरा, मारवल आणि कुसळी गवताचं एक कुटुंब आहे. या प्रजाति सहसा एकमेकांच्या सहवासात फुलतात. खस, मोशान आणि दूर्वा असेच एकमेकांचे सोयरे आहेत. मेळघाटात कोदो आणि कुटकी या गवताच्या बीया खाण्यासाठी वापरतात. ही पीकं पेरली जातात. रान उडद, रान बाजरी, रान ज्वारी, रान तांदुळ, नाचनी, रानजवासारख्या गवतांवर आज विपुल संशोधनाची गरज आहे.
मेळघाटात लोकजीवनची नाळ घट्टपने निसर्गाच्या दैविक सृष्टि चक्राला बांधलेली आहे. येथील लोकसंस्कृति निसर्गाशी साधर्म साधणारी आहे. येथील सेंद्रिय जिवनाला रूढीप्रिय म्हणून आपन हिनवत असलो तरी येथे पालवनारे श्वास ऐहिक नाहीत. वाड्मयात म्हणूनच तर गवताला जीवन आणि अमरत्वाचं प्रतीक मानलं आहे. कोरकु लोकसंस्कृतिमध्ये तर एकून सगळी २५ गोत्र प्राणी, पक्षी आणि वृक्षांच्या नावावरून पडली आहेत. अखंडी, दरसिमा, झारा आणि ताती याचारही गोंत्राची नावे गवतांच्या प्रजातिवरून पडली आहेत.
गणाकड़े जरा उशीराच पोचलो. त्याच्या गोठ्यात गाई म्हशीसमोर गव्हानित रचलेल्या हिरव्या गवताची पूजा सुरु होती. गवळी लोकसंस्कृतित गवताची पूजा म्हणजे “हिरवा चारानी नाव”. सिंधूनं वलदा ठेवला होता. वलदा म्हणजे पूजेच्या दिवशी दूधदुभतं विकन्यावरचे निर्बध. देव्हाऱ्यात तुपाचा दिवा जळत होता. बालींनं पानं वाढले तसा मीही पंगतीत खीरपुरीचा आस्वाद घ्यायला बसलो. गवताला मनोमन हात जोड़ताच एक नितळ हिरवं स्वप्न माझ्या मनात फुलून आलं.
*डॉ. एकनाथ तट्टे*
९४०४३३७९४४
0 Comments