*मेळघाट भ्रमंती - ३*
*मेळघाटातल्या भुताखेतांच्या गोष्टी*
जगाच्या कानाकोपर्यात अशी एक तरी मानवी संस्कृती असेल का, जिथं भुताखेतांच्या गोष्टी नसतील?
मला नाही वाटत.
आमचं मेळघाटही याला अपवाद नाही.
आज तीच गोष्ट सांगतो.
मागील दिवसांत आमचं त्रिकूट (पृथ्वीराजसिंह राजपूत, एकनाथ तट्टे आणि मी) मेळघाटात गेलं होतं तेव्हा आम्ही या ठिकाणी जाऊन आलो.
सोबत तट्टे सरांचा गणा हा गडी होता.
गणा गवळी आहे.
खूप शालीन आणि इमानी माणूस आहे.
त्याचं अगत्य पाहून कुणाही सुह्लदाचा ऊर भरून येईल.
ही गोष्ट गणानंच आम्हाला सांगितली.
ती मी माझ्या शैलीत सांगतो.
चिखलदर्याच्या थोडं अलीकडे एक माळरान आहे.
या माळरानाच्या उत्तरेला एक उंच आणि एकाकी अशी टेकडी आहे.
वर चढायला निसरडी वाट आहे.
वर गेलं की वडाचं मोठं झाड आहे.
त्यासमोर जमिनीत चौरसाकार गाडलेले आणि अोळीनं रचलेले चिर्याचे ताशीव दगड आहेत.
आजूबाजूला विटांचे तुकडे विखुरलेले दिसतात.
यावरून कोणे एके काळी येथे एक शानदार चिरेबंदी घर असावं आणि त्यात कुणीतरी राहत असावं असं जाणवते.
काही वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे.
या उजाडबोडक्या टेकडीवर उत्तररात्री काही व्यक्ती आल्या. कोण होत्या माहीत नाही. पण काहीच दिवसात तिथं एक चिरेबंदी घर उभं राहिलं.
आजूबाजूच्या खेड्यापाड्यात राहणारे लोक चकीत झाले.
उत्सुकतेनं टेकडीच्या आसपास येऊन वर कुणी दिसते का ते बघू लागले. पण कुणीच दिसत नव्हतं.
वर जाण्याची मात्र कुणाचीच हिंमत झाली नाही.
या घराबद्दल टापूत चर्चा, शंकाकुशंकांना उधाण आलं आणि लोकांनी इकडे फिरकणं बंद करून टाकलं.
नजिकच्या एका गावात मोंगा नावाचा युवक राहत होता. त्याच्याकडे पंधरा वीस गायी होत्या.
भल्या पहाटे उठावं. गायींचं दूध काढावं. त्यातलं रतिबाचं गावात वाटावं. उरलेल्या दुधाचा खवा बनवावा.
अंगावर चार तांबे अोतून अंघोळ करावी. असेल तो अोला सुका भाकरतुकडा खावा नि गायी घेऊन त्यांना चारायला रानात न्यावं हा त्याचा दिनक्रम होता.
मोंगा हिंमतबाज गडी होता.
इतरांप्रमाणे त्याच्याही मनात या टेकडीवरच्या गूढ घराबद्दल कुतूहल होतं.
तो विचार करायचा, तिथं जाऊन बघावं का?
अखेर एके दिवशी भल्या पहाटे मोंगा उठला.
गायींचं धारोष्ण दूध काढलं.
एक चरवी भरून घेतली नि सरळ टेकडीकडे निघाला.
टेकडी चढून झाली.
सगळीकडे नीरव शांतता होती.
घराचं दार आतून बंद होतं.
मोंगानं दार ठोठावलं.
आतून कसलाच प्रतिसाद आला नाही.
मोंगानं पुन्हा दाराची कडी वाजवली.
असं दोन तीनदा केल्यावर आतून बांगड्या किणकिणल्या आणि पुरुषी आवाज आला, "कोण आहे?"
"मी मोंगा." यानं उत्तर दिलं, "तुमच्यासाठी दूध घेऊन आलो आहे."
आत पावलांचे आवाज उमटले.
हळूच दार किलकिलं झालं आणि फटीतून एक हात बाहेर आला.
त्या गोर्यापान हातात गाडगं होतं.
मोंगानं त्यात दूध अोतलं.
"थांब जरासा." असं म्हणून व्यक्ती गाडगं घेऊन आत गेली.
लगेच दाराआड येऊन तिनं मोंगाला हात पुढे करायला सांगितलं.
मोंगानं हात दाराशी नेला.
आतला हात बाहेर आला. त्यानं मोंगाच्या हातावर सोन्याची मोहोर ठेवली आणि मोंगा काही बोलायच्या आत दार आतून बंद करून घेतलं.
मोंगाच्या आश्चर्याला पारावार उरला नाही.
परत येऊन झाली गोष्ट त्यानं आईला सांगितली.
सोन्याची मोहोर पण दाखवली.
नंतर दुसर्याही दिवशी मोंगानं हाच कित्ता गिरवला.
व्यक्तीनं दूध घेतल्यावर कालच्याच प्रमाणे पुन्हा एक मोहोर दिली.
मोंगाला परमानंद झाला.
मग हा त्याचा परिपाठच होऊन गेला.
त्यातून अनेक मोहोरा त्याच्या पदरी जमा झाल्या.
याची कुणकुण आजूबाजूला लागली.
काहींनी मोंगाला विचारलं. यानं खरं काय ते सांगून टाकलं.
लोक विचार करू लागले,
आपणही असं करावं का?
या कोल्हेकुईत नित्याप्रमाणेच मोंगा दुसर्या दिवशी पहाटे टेकडीवर गेला.
पुढे काय झालं ते कुणालाच कळलं नाही.
पण मोंगा नंतर परत आला नाही.
लोक टेकडीच्या आसपास जाऊन पाहत.
पण ना मोंगा दिसत असे ना आतल्या व्यक्ती.
पुढे कित्येक दिवस हा शोध सुरू राहिला.
पण मोंगा गेला तो गेलाच.
नंतर गावात वदंता पसरली, की टेकडीवरची ती भूतं होती आणि त्यांनी मोंगाला त्यांच्यातलं करून घेतलं.
गोष्ट सांगून झाल्यावर गणानं पुढची माहिती दिली.
"साहेब, हितं सोनं हाये असं आजूनबी काही लोकायले वाटते. राती बेराती ते इथी येऊन खड्डे खंडून पायतेत. आन् तो पाहा न खड्डा. काल परवाच खंडला दिसते."
असं म्हणत त्यानं आम्हाला त्या चार ते पाच फूट खोदलेल्या खड्ड्यापाशी नेलं.
नंतर या ठिकाणी आम्ही भरपूर फोटो काढले. गणासह काढले.
सोबत ते फोटो शेअर करतोय.
आणि होय, असल्या भुताच्या गोष्टी मिथकं असल्या तरी रोचक असतात.
मिथकांत तीच तर खरी गंमत असते.
*-अशोक मानकर*
0 Comments