*गाविलगड वीरयोद्धा बेनिसिंह आणि वीरांगना मातृशक्तीची शौर्यगाथा*
मध्य भारतातील पर्वत शृंखला पूर्वेला अमरकंटकपासून पश्चिमेला गुजरातच्या पर्यंत पसरलेली आहे. या पर्वतराजीस विंध्याचल, सातपुडा, मेळघाट इत्यादी नावांनीही संबोधले जाते. घनदाट वनराई आणि बहुविध वन्य प्राणी संपदा असलेला मेळघाट एक उच्चतम परिसंस्था आहे. राष्ट्रीय प्राणी *पट्टेदार वाघ* मेळघाटची शान आहे. भारत सरकारने येथे *गुगामल व्याघ्र प्रकल्प* स्थापन करून या परिसराला अभयारण्य घोषित केले. कोरकू, बलई, निहाल, मोंग्या, राठ्या, गवळी येथील मूळ रहिवासी आहेत. येथील भाषा, लोकगीते, लोककथा, वेशभूषा, चालीरीती सर्वार्थाने एक वेगळे सांस्कृतीक विश्व आहे. मेळघाटचे पुरातन संदर्भ थेट *रामायण- महाभारत* काळाशी जुळतात. रामायणातील प्रमुख पात्र *रावण आणि मेघनाथ* यांच्या नावाने सण साजरे करण्याची परंपरा येथे आहे. महाभारतातील *पांडव* अज्ञातवासात असताना, येथील विराट राजाच्या नगरीत वास्तव्यास होते, असा समज प्रचलीत आहे. महान कर्मयोगी श्रीकृष्ण यांसी संबंधित *रुक्मिणी हरण* ही घटना या पर्वतरांगातून उगम पावणाऱ्या नद्यांच्या तटावरील *कौंडण्यपूर व अंबानगरी* सोबत जोडली आहे. पौराणिक ग्रंथांमध्ये उद्धृत प्रसंगांना सुसंगत असलेली अनेक स्थळे व परंपरा याचा पुरावा देतात.
मध्ययुगीन भारताच्या इतिहासावर एक नजर टाकली तर येथील योद्ध्यांचे शौर्य आपल्याला थक्क करते. गाविलगड, नरनाळा, आमनेर, मैलगड आणि लगतच्या परिसरातील भव्य वास्तूंचे अवशेष मेळघाटच्या वैभवशाली इतिहासाची शौर्य गाथा सांगतात.
गाविलगड एक हजार वर्षांच्या आठवणी आपल्या हृदयात साठवून आहे. या गडाच्या नावावरून त्याची स्थापना करणाऱ्या गवळी शासकाची असल्याची कल्पना करता येऊ शकते. *गवळी* म्हणजे गोपालक. पौराणिक संदर्भानुसार यादव कुलभूषण गोपालक कृष्ण वैदर्भीय राजकन्या रुक्मिणीचे हरण करण्यासाठी विदर्भात आले होते. कार्य सिद्धीस गेल्यानंतर एखाद्या भविष्यकालीन योजनेअंतर्गत त्यांच्या सोबत आलेले यादव योद्धे येथेच वसविले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. युग बदलले, सामाज व्यवस्था बदलल्या, जगण्याचे संदर्भही बदलले. बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेणे मनुष्य प्राण्याची मूळ प्रवृत्ती आहे. सातपुडा पर्वत शृंखलेतील मौलिक वनसंपदा, बारमाही जलस्रोत, सुपीक जमीन, अनुकूल पर्जन्यमान यांनी येथील जीवन समृद्ध केले. परिणामी जीवन संघर्ष सुद्धा कमी झाला असेल. अशा सुखमय परिस्थितीत सुरक्षा संबंधी अनास्था स्वाभाविक होती. आणि याच काळात बाह्य शक्तींची वक्रदृष्टी संपन्न भारत देशाकडे वळली. मागील एक हजार वर्षाच्या इतिहासावर एक दृष्टीक्षेप टाकला तर कळेल, की याच सहस्रकात भारतावर अगणित हल्ले झाले. आणि हाच तो काळ होता, जेव्हा भारतीयांना आपली समृद्ध संस्कृती जपण्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागला. परकियांशी शेकडो वर्ष सामना केला, नव्हे शौर्य गाजवीत स्वराज्य परत स्थापन केले. यातूनच गाविलगड सारख्या सर्वार्थाने सुरक्षीत किल्ल्याची निर्मिती झाली.
*अभेद्य गाविलगड*
मेळघाटातील गाविलगड विदर्भाच्या अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा या गावापासून ३ किमी अंतरावर आहे. हा किल्ला बेजोड वास्तुकलेने नटलेला एक अभेद्य दूर्ग आहे. याचे बांधकाम बाराव्या शतकात गवळी राज्यांनी केल्याचे सांगितल्या जाते. त्याला *अहिरगड* नावाने सुद्धा संबोधले जाते. भारतीय समाजाला पाच हजार वर्षांचा समृद्ध आणि संपन्न संस्कृतिक वारसा आहे. मात्र वर्ण व जाती व्यवस्थेमुळे आपला समाज आतून पूर्णतः दुभंगलेला आहे. सुमारे एक हजार वर्षांपूर्वी मूठभर परकीय आक्रमकांनी या जाती वर्णात विखुरलेल्या समाजाला गुलाम करण्यास सुरुवात केली. पुढे तेराव्या शतकाच्या मध्यापर्यंत त्यांचे हे इप्सित साध्य पण झाले. प्रथमतः त्यांनी दिल्लीवर सत्ता स्थापन केली. पुढे आक्रमणकर्त्यांची विस्तारवादी नजर दक्षिण भारताकडे वळली. दक्षिणेकडील मोहिम फत्ते करण्यासाठी मध्य भारतातील सातपुडा पर्वतरांगा फार महत्त्वाच्या होत्या. भारतावर सत्ता स्थापन करण्यास परकीय शक्तींनी, आम्हा भारतीयांच्या, *फितुरी* वृत्तीचा पूरेपूर उपयोग केला. तेराव्या शतकाच्या अखेरीस दक्षिणेत विजापूरपर्यंत परकीय सत्तेचा विस्तार झाला होता. स्वकीयांच्या फितुरीने गाविलगड सुद्धा शतकानुशतके आक्रमणकारी शक्तींच्या हातात झुलत राहिला. सुमारे चारशे वर्षे गाविलगडचे वैभव मोगल, बहामनी, निजाम व इमादशाहीच्या आक्रमकांनी अक्षरशः लुटले. त्यांच्या गरजेनुसार गडावर विविध वास्तू व प्रार्थनास्थळे निर्माण केली.
सतराव्या शतकात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा उदय झाला. त्यांनी परकीयांचे अधिपत्य झुगारून सह्याद्रीपासून तर मराठवाड्यापर्यंत भोसलेशाहीची स्थापन केली. १६९८ मध्ये शिवरायांचे चिरंजीव राजारामने विदर्भ प्रांत जिंकला आणि कित्येक शतकांच्या प्रतीक्षेनंतर गाविलगडाला स्वतःचा राजा मिळाला. पुढे राजपुत्र राजाराम यानी या संस्थानाचा कारभार नागपूरकर पराक्रमी व पारखी राजे रघुजी भोसले यांच्याकडे सोपवला. त्बंगालच्या मोहिमेवर असताना शत्रू सैन्यातील योद्धा झामसिंह यांच्या शौर्याचा आणि निष्ठेचा अनुभव त्यांना आला. मोहीम समाप्त झाल्यावर, त्यांनी गाविलगडच्या किल्लेदाराचा प्रस्ताव झामसिंहसमोर ठेवला. वीर झामसिंहानी तो आदरपूर्वक स्वीकारला. गाविलगडचे किल्लेदार म्हणून झामसिंहानी आपल्या पराक्रमाने गडाच्या केवळ सीमा सुरक्षित केल्या नाहीत तर संपूर्ण प्रदेशाला समृद्धीच्या शिखरावर नेले. राजे रघुजी भोसले यांच्या मृत्यूनंतर त्यांचे सुपुत्र जानोजीने संस्थानची सूत्रे हाती घेतली. दरम्यान वृद्धापकाळाने किल्लेदार झामसिंह यांचे देखील निधन झाले. पुढे त्यांचा मुलगा प्रमोदसिंह यानी किल्ल्याचा मान वाढवला. प्रमोदसिंच्या मृत्यूनंतर गाविलगडची जबाबदारी त्यांचा पराक्रमी पूत्र बेनिसिंह यांच्याकडे आली.
याच काळात छत्रपती शिवाजी महाराजांनी नेमलेल्या पेशवे सरदारांनी *पेशवाई* स्थापन केली व स्वतःला मराठ्यांचा राजा घोषित केले. सत्ता हाती आल्यावर त्यांची नजर वऱ्हाड प्रांतातील भोसले संस्थानाकडे वळली. पेशव्यांचा अंत्यस्थ हेतू ओळखून, राजे जानोजीनी संस्थानचा सर्व खजिना किल्लेदार बेनिसिंह यांच्या सुरक्षितेत गाविलगडला पोचविला. ही घटना म्हणजे बेनीसिंह यांचे शौर्य आणि स्वामीनिष्ठेची पावतीच होती.
अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात इंग्रजांनी *ईस्ट इंडिया कंपनीचा *छद्मावेश* परिधान करून भारतात पाळे-मुळे रुजवायला सुरुवात केली होती. याच काळात भारतातील मुगल सत्ता सुद्धा अधोगतीकडे झुकत चालली होती. सत्ता व संपत्तीचे लोभी इंग्रजांनी व्यापाराच्या नावाखाली भारतात प्रवेश केला होता. त्यांना जेव्हा गाविलगडावर भोसल्यांचा खजिना असल्याचे कळले, तेव्हा त्यांनी साम-दाम-दंड-भेद नीतीचा अवलंब करून एक कुटील कारस्थान रचले. गाविलगडच्या पायथ्याला लागून असलेले 'अचलपूर' हे त्या काळी एक मोगल संस्थान होते. सलावत खान हा त्या संस्थानाचा सरदार होता. त्याला बेनिसिंहाच्या लढाऊ बाण्याची चांगलीच जाणीव होती. बेनीसिंहाशी वैर म्हणजे मृत्यूला आमंत्रण देणे, म्हणून सलावत खान त्यांच्यापासून अंतर राखून होता. इंग्रज अधिकारी वेलस्ली मात्र फारच धूर्त होता. त्याने सरदार सलावत खान यास जीवाचे रक्षण आणि खजिन्याचा हिस्सा देण्याचे आमिष दाखवून आपल्या खेम्यात ओढले. याची खबर बेनीसिंह यांना मिळाली. त्यांनी लगेच युद्धाची तयारी सुरू केली. त्यांना आपल्या युद्ध कौशल्यावर आणि निष्ठावान सैन्यावर पूर्ण विश्वास होता. त्यांच्या सैन्यात गवळी, कोरकू, बलई, राठ्या, मोंग्या, निहाल इत्यादी मेळघाटचे मूळ रहिवासी आणि बऱ्याच स्वामीनिष्ठ मुस्लीम योद्ध्यांचा समावेश होती. गाविलगडची भौगोलिक स्थिती आणि सुरक्षा व्यवस्था युद्धाच्या दृष्टीने भक्कम होती. बेनिसिंह आपल्या निष्ठावान सैन्यानिशी कर्तव्य पार पाडण्यासाठी सज्ज झाले. शत्रूने युद्धाची घोषणा करण्याची वाट पाहणे म्हणजे निव्वळ वेळ वाया घालविणे होते. *आक्रमण हाच सर्वोत्तम बचाव* उक्तीप्रमाणे बेनिसिंहानी असई-जाफ्राबाद-जालना आणि सिरसोली-आडगाव-अकोट येथे इंग्रज सैन्यावर हल्ला करून त्यांचा पराभव केला. असई आणि सिरसोली या दोन्ही युद्धात ब्रिटिश सैन्याचे प्रचंड नुकसान झाले. किती तरी इंग्रज सैनिक मारल्या गेले. या परिसरातील विखुरलेली त्यांची थडगी आजही त्यांच्या पराभवाची साक्ष देतात. या पराभवानंतर, बेनीसिंहाशी थेट लढाई करणे अशक्य आहे, हे इंग्रजांना सुद्धा चांगलेच कळून चुकले होते. मग त्यांनी एक नवीन रणनीती अवलंबली. जाती-वर्णात विभाजित भारतीय समाजात *फितुरी* एक नीहीत प्रवृत्ती आहे. या प्रवृत्तीस खतपाणी घालून पराक्रमी भारतीयांना सहज पराभूत करता येऊ शकते. ही बाब लक्षात घेऊन, खजिन्यासाठी वेडे झालेले इंग्रज आणि मोगल यांनी एका कुटील योजना आखली. लॉर्ड वेलस्लीच्या ब्रिटिश सैन्यातील कॅप्टन केनी आणि अचलपूरचे मोगल सरदार सलावत खान यांनी काही फितुरांना हाताशी धरले. त्यांना मेळघाटचे मूलनिवासी दाखवून बेनिसिंहाच्या सैन्यात दाखल केले. हे छद्मी सैनिक, दिखावा म्हणून गाविलगडच्या सैन्याचा भाग बनले. या गद्दारांनी इंग्रजांना गाविलगडच्या 'मछली' दरवाज्याची माहिती दिली. हा दरवाजा चिखलदऱ्याच्या बाजूने, किल्ल्यात प्रवेश करण्याचा सुलभ मार्ग होता. या माहितीने, कॅप्टन केनी याने गाविलगडच्या पूर्वेकडील मुख्य 'पीरफत्ते' दरवाज्यावर सैन्य तर उभे केलेच सोबतच पश्चिमेकडील मछली दरवाज्यावर मोठ्या संख्येने सैन्य पाठवून निर्णायक युद्धाची तयारी सुरू केली. आपल्याच सैन्यात गद्दार सैनिक असतील, याची स्वप्नातही बेनिसिंहानी कल्पना केली नव्हती. जेव्हा हा प्रकार उघडकीस आला तोपर्यंत मात्र खूप उशीर झाला होता. १५ डिसेंबर १८०३ रोजी सकाळी इंग्रज आणि मोगल सैन्याने मिळून पिरफत्ते आणि मछली या दोन्ही दरवाजावर तोफांनी हल्ला केला. बेनिसिंह आपल्या मर्यादित सैन्यासह दोन्ही आघाड्यांवर अफाट साहसाने लढले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून किल्ल्यावरील राजस्त्रियांनी सुद्धा युद्धात उडी घेतली. त्याचे विलक्षण शौर्य पाहून सर्व सेना भारावून गेली. गाविलगडचे योद्धे शत्रूंवर अक्षरशः तुटून पडले. बेनिसिंह तर एका भयंकर वादळाप्रमाणे लढत होते. त्यांची नजर जेंव्हा कॅप्टन केनीवर पडली तेंव्हा, शत्रूच्या सैन्याला बाणासारखे चिरत ते पुढे सरसावले आणि एका फटक्यात कॅप्टन केनीचा शिरच्छेद केला. कॅप्टन केनीचे पतन म्हणजे विजयाची चाहूल होती. वीरश्रीने ओतप्रोत बेनिसिंहच्या सैन्याला विजय स्पष्ट दिसत होता. एवढ्यातच अचानक एका फितूर सैनिकाने बेनिसिंहावर मागून वार केला. या अनपेक्षित हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना वाचवण्यासाठी अंगरक्षकांनी प्राणाची बाजी लावली, मात्र अखेर त्यांना अपयश आले. विजयाच्या अगदी उंबरठ्यावर उभ्या असलेल्या गाविलगडच्या सैन्यात अचानक गोंधळ उडाला. आपली व परक्याची ओळख पटत नसल्यामुळे प्रचंड अनागोंदी झाली. या कोलाहलात शेवटी शत्रूचे पारडे जड झाले. पुन्हा एकदा आपल्यातीलच विश्वास घातकी वृत्तीने भारतीय अस्मितेच्या पाठीत खंजीर खुपसला. अद्भुत शौर्याने लढत असलेल्या वीरांगना मातृशक्तीने, वीरयोद्धा बेनिसिंहला वीरगतीला प्राप्त होताना पाहिले, तेव्हा त्यानाही आपल्या पराभवाची जाणीव झाली. क्षणाचाही विलंब न लावता या विरागणांनी स्वतःच चिता रचून अग्नीला समर्पित केले. निशब्द गाविलगड पाणावलेल्या डोळ्यांनी, वीरयोद्धा बेनीसिंह आणि वीरांगना मातृशक्तीच्या शौर्याला नतमस्तक झाला.
कालचक्रात गरगरत आम्ही या शौर्यगाथेला विसरलो असलो तरी, स्वराज्य सेवा प्रतिष्ठानच्या मावळ्यांनी मात्र हा शौर्य व बलिदानाचा वारसा जिवंत ठेवला आहे. या प्रतिष्ठानचे संस्थापक शिवा काळे व त्यांचे शेकडो मावळे दरवर्षी *गाविलगड शौर्य दिन व मातृवंदना सोहळा* दरवर्षी स्वयंप्रेरणेने साजरा करतात.
या द्विदिवसीय उत्सवात, पाहिल्या दिवशी भल्यापहाटे गाविलगडाच्या पायथ्याशी असलेल्या बागलिंगा सुरक्षा चौकी परिसरात सर्व मावळे जमा होतात. पुढे अत्यंत अवघड वाटेवरून गड चढाईचा थरार अनुभवतात. पिरफत्ते दरवाजातून गडावर प्रवेश केल्यावर, गड-स्वच्छता, इतिहास संशोधन, उदबोधन, वैचारिक संगोष्ठी व सायंकाळी आदिवासी कला महोत्सवाचा आनंद घेतात. दुसऱ्या दिवशी, समाजाच्या विविध क्षेत्रातील सेवाव्रतींचा सन्मान, मान्यवरांचे संबोधन आणि शेवटी अदम्य साहस, शौर्य व समर्पण यांचे प्रतीक वीरयोद्धा बेनीसिंह आणि वीरांगना मातृशक्तीला कृतज्ञतापूर्वक भावांजली अर्पण करून समारोहाची सांगता होते.
*प्रा. डॉ. पृथ्वीराजसिंह राजपूत*
९३७३०२३६४४/९३२५२५२१२१
0 Comments