Subscribe Us

वऱ्हाड .सोन्याची कऱ्हाड


 *वऱ्हाड: सोन्याची कऱ्हाड*


 *वऱ्हाड उगम, उत्पत्ती* :


विदर्भाच्या प्राकृतिक रचनेनुसार विदर्भाचे पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ असे दोन भाग पडतात. या भागातील पश्चिमेकडील विदर्भ प्रांत हा वहऱ्हाड या नावाने इतिहासात प्रसिद्ध आहे. बुलडाणा, अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ या पाच जिल्ह्यांचा समावेश वऱ्हाड प्रांतात होतो. वहऱ्हाड या देशवाचक नामाबाबत इतिहासात विविध आख्यायिका, संशोधकांची मते, विविध मतप्रवाह प्रचलीत आहेत. अबुल फजल याने ऐन-ए-अकबरी चे लेखन करतांना वऱ्हाडाचा उल्लेख वर्धातट केला आहे. (वरधाह वरधास्दे अस्त वहट किनार अस्त) अर्थात वर्धा नदीचे तिरावरील प्रदेश ऐन-ए-अकबरी ग्रंथानुसार वऱ्हाडाचे जुने नाव वर्धातट असेच होते. वऱ्हाड शब्दाचे उत्पत्तीबाबत खात्रीदायक सांगणे कठिण असले तरी या शब्दाचे उत्पत्ती बाबत अनेक विविध तर्क इतिहासात प्रचलित आहेत.


वैदिक संस्कृतीतील आख्यायिके नुसार वऱ्हाड शब्दाबाबत एक विचार प्रवाह प्रचलीत आहे. भगवान श्रीकृष्ण रूख्मीणीला वरन्यासाठी विदर्भात आले असता त्यांचे सोबत अनेक आप्तजणांचे वऱ्हाड होते. (लग्न समारंभात नवरदेवासोबत आलेल्या आप्त, स्वकियांना 'व-हाड' असे म्हटले जाते. आजही हा शब्द लग्न प्रसंगी वापरला जातो) रूख्मी याने आपल्या बहिणीचा विवाह शिशुपाल राजाशी करण्याचे योजीले यावेळी दोहो पक्षांकडून आप्तस्वकीय लग्न समारंभाला उपस्थित होते. भगवान श्रीकृष्णाचे आप्तस्वकीय या लग्न समारंभास उपस्थित होते. रूख्मीनीचे हरण भगवानकेल्याने त्यांचे सोबतचे वऱ्हाड याच प्रदेशात राहिले. त्यावरून या प्रदेशाला वऱ्हाड म्हटले जाऊ लागले. असा आख्यायिकेनुसार तर्क बांधला जातो व तो संयुक्तीकही वाटतो 


वऱ्हाड हा शब्द संस्कृत भाषेतील आहे. या शब्दाचे उत्पत्तीचा अर्थ स्वतंत्र्यपणे लावता येतो. संस्कृत भाषेत वरअहाट वर म्हणजे नवरदेव आणि हाट म्हणजे समुदाय १९ उत्तरेकडील हिंदी भाषेत वरात, लग्नातील मंडळी, बारात, वरयात्रा शब्द प्रचलीत आहेत. मराठीतही वरात किंवा वऱ्हाड, वरडी मंडळी, वऱ्हाडी हे शब्द सर्रासपणे व्यवहारात प्रचलीत आहेत.


आधुनिक इतिहासकार वि. का. राजवाडे यांचे संशोधनानुसार वर्धाहार (वर्धा+आहार) वर्धेच्या काठचा देश यावरून वद्दहार, वढार, वन्हाड असा अपभ्रंश झाला आहे. ही उत्पत्ती ठीक असली तरी वर्धाहार या शब्द वन्हाडशी सुसंगत असलेला दिसून येत नाही.


वरदातट, वर्धातट या नावाबद्दल इतिहासात दाखले सापडतात. या नावाचे अपभ्रंश होऊन वऱ्हाड शब्द प्रचलित झाला . यासमच वऱ्हाड हे नाव येथील विराट अथवा वैराट या राजाच्या नावावरून पडले अशी दंतकथाही व-हाडात प्रचलीत आहे. विराटचे राज्य येथपर्यंत होते असे सांगण्यात येते. या प्रदेशातील तत्कालीन राज्यव्यवस्थेच्या आणि गावांच्या खुणा आजही वऱ्हाडात आढळतात. सातपुड्या पर्वत रांगांतील एका मोठ्या खोऱ्याचे नाव किचकदरा असे आहे. भीमचुला नावाची एक विशाल चुल आणि तीन दगडी चुली सारख्या शिळा येथे सापडतात. मेळघाटात वैराट नावाचेही गावही आजरोजी अस्तित्वात आहे 


दंतकथा आख्यायिका यानुसार वऱ्हाड शब्दाचे उत्पत्तीबाबत निष्कर्ष अगदीच अचूक आहेत असे नाही परंतु वऱ्हाड हा शब्द भारतीय संस्कृतीमध्ये बहुतांशी प्रमाणात प्रचलीत आहे. या वहऱ्हाड प्रांताने प्राचीन काळापासून भौगोलिक, सामाजिक, राजकीय, नैसर्गिक धनसंपदा, सांस्कृतिक बाबतीत आपले वेगळेपण जपलेआहे. या प्रदेशाच्या नैसर्गिक तथा भौगोलिक रचनेचा अभ्यास केल्यास या प्रदेशाची संपन्नता लक्षात येते.


भौगोलिक व्याप्ती :


ऐतिहासिक आणि सांस्कृतिक बाबतीत वेगळेपण जपलेल्या व-हाड प्रांताचे भौगोलिक वैशिष्ट्य महत्वपूर्ण असेच आहे. पश्चिम विदर्भ अर्थात वऱ्हाड प्रांताचा सद्यस्थितीत अमरावती विभाग म्हणून शासकीय कागदपत्रांत उल्लेख केला जातो. अमरावती हे मुख्य प्रशासकीय कार्यालय असून अमरावती, यवतमाळ, अकोला, वाशिम, बुलडाणा हे उपविभाग पाडलेले आहेत. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर १ मे १९८१ चे प्रशासकीय रचनेनुसार अमरावती विभागाची निर्मिती करण्यात आली. सुरूवातीस अमरावती, यवतमाळ, अकोला, आणि बुलडाणा या चारच जिल्ह्याचा समावेश वऱ्हाड प्रांत अमरावती विभागात होता. तद्नंतर विस्ताराने मोठ्या असलेल्या अकोला जिल्ह्याचे विभाजन करून वाशिम जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. सद्यस्थितीत वऱ्हाडात पाच जिल्ह्यांचा समावेश होतो.


महाराष्ट्राच्या अविभाज्य भौगोलिक घटकांपैकी असलेला वऱ्हाड हा घटक भारताच्या मध्यवर्ती भागात आहे. या भुभागाचा विस्तार उत्तर अंशास ९० अंश ते २२.४७ तथा रेखांशास ७६ ते ८१ च्या मध्यभागी आहे. वऱ्हाडचे एकुण क्षेत्रफळ ४६०९० चौ.कि.मी. आहे वऱ्हाडचे पूर्वेस वर्धा जिल्हा, उत्तरेस मध्यप्रदेश, पश्चिमेस खांदेश, दक्षिणेस मराठवाडा प्रांत आहे. वऱ्हाडच्या नकाशाचे अवलोकन केल्यास या प्रदेशाचे तिन स्वाभाविक विभाग पडतात. उत्तरेस सातपुड्याचा निव्वळ डोंगराळ प्रदेश आहे. यास मेळघाट असे म्हणतात. दक्षिण बाजुस अजिंठा पर्वताचा विस्तीर्ण प्रदेश असून हा सपाट आहे. याला पठार अथवा सपाट देश असे म्हणतात. पूर्व पश्चिम समांतर रेषेने या पठाराचा चढाव हल्लीच्या रेल्वे लाईनच्या दक्षिणेस वीस मैलापासून सुरू होतो. व ही उंचीचढून गेले म्हणजे फार मोठे मैदान लागते या प्रदेशास घाट असे म्हणतात. उत्तर वऱ्हाडातून दक्षिण वऱ्हाड कोठेही जायचे असल्यास घाट चढावाच लागतो. तिसरा भाग म्हणजे उत्तरेस सातपुड्याचा मेळघाट भाग व दक्षिणेत बालाघाट यांच्या दरम्यानचा खोलगट प्रदेश होय  चोहोबाजूंनी नैसर्गिक रचनेनुसार वेढलेल्या या भागाची नैसर्गिक श्रीमंती अलौकीक आहे.


वऱ्हाडचा प्रदेश नैसर्गिक साधन संपत्तीने ओतपोत भरलेला आहे. येथील नद्या विस्ताराने मोठ्या असून येथील जमिन पोतदार आहे. वऱ्हाड मध्ये मेळघाट, पूर्णा नदीचे खोरे, बालाघाट, अजिंठा डोंगररांगा, वर्धा नदीचे पूर्वेकडे असलेले खोरे यवतमाळ जिल्ह्यातील सुपिक पठार, बुलडाणा जिल्ह्यातील सुपिक पठार इत्यादी वैशिष्ट्यपूर्ण बाबींनी वन्हाड प्रांत नटलेला आहे. अमरावती हा वऱ्हाड मधील महत्वाचा जिल्हा असून सद्याचे मुख्य प्रशासकीय केंद्र आहे. या अमरावती जिल्ह्याचे मेळघाट आणि पायनघाट असे दोन स्वाभाविक कार पडतात. गाविलगडच्या डोंगराळ भागांनी / पर्वतरांगांनी मेळघाट प्रदेश व्यापलेला आहे. या भागाची समुद्र सपाटी पासून उंची १०३६ मिटर आहे. या भागातील वैराट हे अतीउंच शिखर असून त्याची उंची १७७ मिटर आहे. आणि हे चिखलदऱ्याजवळ स्थित आहे  यवतमाळ हा वऱ्हाडातील महत्वाचा जिल्हा असून या जिल्ह्यातील भूमी उंचसखल आहे. नैसर्गिक वनभूमी लाभलेला वहऱ्हाडातील सर्वात मोठा जिल्हा आहे. या जिल्ह्याचा बहुतांशी भाग पर्वतरांगांनी वेढला आहे. जिल्ह्याचा मध्यवर्ती भाग समुद्रसपाटीपासून ३०० ते ५०० मिटरचे उंचीचे पठारी प्रदेशाने व्यापला आहे. साधारणतः दर दोन मिटर प्रती किलोमिटर प्रमाणे पूर्वेकडे उत्तरत गेलेला आहे. पुसद तालुक्यामध्ये सर्वाधिक डोंगररांगा असून खोगीर सदृश्य प्रदेश आणि उंच टेकड्या आहेत. यवतमाळ जिल्ह्याचे उंच सखल डोंगराळ भागानुसार तीन प्रकार भौगोलिक दृष्टीकोनाने पडतात. यामध्ये पहिला भाग हा उत्तर भागातील बेंबळा व वर्धानदीकाठचा सखल प्रदेश आहे. दुसऱ्या भागात प्रदेशाचा समावेश होतो. तिसऱ्या भागात दक्षिणेकडील पैनगंगा नदी खोऱ्याचा सखल भागाचा समावेश होतो  प्राकृतिक विभागामुळे यवतमाळ जिल्ह्याच्या समृद्धतेत विशेषत्वाने भर पडली आहे.


बुलडाणा हा वऱ्हाड मधील पश्चिमेकडील जिल्हा असून खांदेशचे प्रवेशद्वार म्हणून हा जिल्हा ओळखला जातो. बुलडाणा जिल्ह्याच्या उत्तरेकडील भागास पाईनघाट तर दक्षिणेकडील भागास बालाघाट असे म्हणतात. भौगोलिक रचनेनुसार या जिल्ह्याचे तिन भागात विभाजन केलेले आढळते. पहिल्या भागात उत्तरेकडील गाविलगडचे डोंगरी भाग, दुसऱ्या भागात पूर्णा नदीचे सुपीक खोरे, तिसऱ्या भागात दक्षिणेकडील बालाघाट या प्रदेशाचा समावेश होतो. पहिल्या भागातील गाविलगडची डोंगररांग म्हणेज पूर्व, पश्चिम भागात पसरलेली सातपुडा पर्वतरांग होय. यामध्ये प्रामुख्याने जळगाव जामोद तालुक्याचा समावेश होतो. पाषाणयुगात लाव्हा रसापासून या डोंगरांची निर्मिती झाली अजिंठा आणि गाविलगड डोंगररांग अर्थात सातपूडा पर्वतरांगाच्या दरम्यान पुर्णा नदीचे सुपिक खोरे या जिल्ह्यात आढळते. खडकाळ आणि ओबडधोबड प्रदेशावर गाळाचे संचयन होऊन या प्रदेशाची निर्मिती झाली आहे. अजिंठा डोंगररांग ही जिल्ह्यातील इतर भूभागापेक्षा जास्त उंच आहे.


अकोला हा वऱ्हाडातील चौथा महत्वाचा जिल्हा असून उत्तरेकडील भाग वगळता उर्वरीत तिन्ही भाग हे वन्हाडातील जिल्ह्यांशीच भिडलेले आहे. उत्तरेकडील भाग हा मध्यप्रदेशाच्या सिमा भागाशी जोडलेला आहे. पूर्णा नदी या जिल्ह्यातून वाहत जाऊन बुलडाणा जिल्ह्यात प्रवेश करते. उंच सखल आणि सपाट पृष्ठ भागावर असलेला हा जिल्हा पठारी अवस्थेत मोडतो. पूर्णा नदीच्या सुपिक खोऱ्यामुळे या भागाला पाईनघाट असेही संबोधले जाते. अजिंठा पर्वतरांगाचा काही भाग या जिल्ह्यात आहे . याच जिल्ह्यातून प्रशासकीय सोयीसाठी वाशिम जिल्ह्याची निर्मितीकरण्यात आली. वाशिम जिल्ह्याचा भौगोलिक प्रदेश अकोला जिल्ह्याप्रमाणे सपाट आहे. पूर्वेकडील व दक्षिणेकडील भागात डोंगराळ रांगा आहेत. दक्षिण बाजूस मराठवाडा प्रांताची सिमा आहे.


वऱ्हाडातील नद्या, जलसंपत्ती :


भौगोलिक रचनेनुसार संपन्न असलेला हा प्रदेश सपाट तथा डोंगराळ प्रदेशात विभागलेला आहे. या प्रदेशातून वाहणाऱ्या नद्यांमुळे या प्रदेशाच्या सुपीकतेत अधिकच भर पडली आहे. नद्यांच्या खोऱ्यामुळे जमिनीची सुपिकता वाढली आहे. या भागात विविध नद्या वाहतात. मेळघाट हा अमरावती जिल्ह्यातील भाग असून या भागातुन अनेकविध नद्यांचा उगम झालेला आहे. अमरावती जिल्ह्याच्या पूर्व सिमेजवळून वर्धा नदी दक्षिणेकडे वाहत जाते. मेळघाटातून कामदा, कापरा, गार्गा, सिपना नद्या वाहतात. चंडामुनी, मातृ, विदर्भा, बेंबळा, खोलार या तापी नदीच्या उपनद्याही अमरावती जिल्ह्यातून वाहतात. मध्यभागातील प्रथम दक्षिण वाहिनी व नंतर पश्चिम वाहिनी पूर्णा ही वऱ्हाडातील प्रमुख नदी असून ती तापी नदीस मिळते. या नदीच्या शहानुर, चंद्रभागा, पेढी या उपनद्यांमुळे अमरावती जिल्ह्यात सुपीक खोरे निर्माण झाले आहे यवतमाळ जिल्ह्यातील वर्धा व पैनगंगा ह्या मुख्य नद्या आहेत. वर्धा नदी ही जिल्ह्याच्या ईशान्य व पूर्व सरहद्दीवरून तर पैनगंगा नदी दक्षिण सरहद्दीवरून ३२० किमी पर्यंत वाहते. वर्धा नदीचे पात्र खोल असून बेंबळा व निरगुडा, उजवीकडुन वाहत येवून वर्धा नदीला मिळतात. निरगुडा नदीचा मुख्य प्रवाह वणी तालुक्यातून तर बेंबळा नदी यवतमाळ तालुक्याच्या उत्तर भागातून वाहते. पैनगंगा नदीच्या पुस, अरूणावती, अडाण, वाघाडी, खुनी, विदर्भा ह्या उपनद्या यवतमाळ जिल्ह्यात वाहतात. पुस नदी ही पुसद तालुक्यातून वाहते. अरूणावती, अडाण नद्या दारव्हा तालुक्यातून वाहतात. खुनी नदी हे केळापूर तालुक्यातून तर विदर्भा नदी ही वणी तालुक्यातून वाहते. यवतमाळ जिल्ह्यातील मुरली गावाजवळ पैनगंगा

नदीवरील सहस्त्रकुंड धबधबा हा जिल्ह्यातील महत्वाचा धबधबा आहे 


पश्चिमेकडे असलेल्या बुलडाणा जिल्ह्यात पैनगंगा व पूर्णा नद्या प्रमुख आहेत. या बरोबरच ज्ञानगंगा, काटेपूर्णा, नळगंगा, विश्वगंगा, बाणगंगा, कोराडी, धामणी ह्या जिल्ह्यातील महत्वाच्या नद्या आहेत. पैनगंगा नदीचा बुधनेश्वर येथे उगम असून ती बुलढाणा जिल्ह्याच्या पश्चिम भागातील अजिंठा डोंगर रांगामध्ये उगम पाऊन आग्नेय दिशेने बुलडाणा पठारावरून वाहत जात अकोला जिल्ह्यात प्रवेश करते. पूर्णा ही जिल्ह्यातील दुसरी महत्वाची नदी आहे. पूर्वेकडून पश्चिम दिशेने वाहते. पूर्णा नदीला प्राचीन काळात 'पयोष्णी' नावानेही ओळखले जाते. पूर्णा ही वऱ्हाडातील अत्यंत महत्वाची नदी असून या नदीच्या तिरांवर अनेक प्राचीन, मध्ययुगीन संस्कृती नांदतांना दिसून येतात. सम्राट अशोकाचे काळात पूर्णा नदीचे तिरावरील भोन हे मध्यभारताचे महत्वाचे व्यापारी केंद्र होते. येथे बौद्ध विहार बरोबर अनेक सांस्कृतिक, ऐतिहासिक वास्तुंचे अवशेष भोनमध्ये सापडतात. या विषयावर जगभरातील संशोधक अभ्यास करून नवनवीन संशोधन शोधुन काढत आहेत. पयोष्णी अर्थात पूर्णा नदी ही बुलढाणा जिल्ह्याची भाग्यवाहीनीच ठरली आहे. या नदीच्या गाळामुळे बुलढाणा जिल्ह्यातील घाटाखालील भाग अत्यंत सुपीक झाला असून हा परिसर 'कॉटनबेल्ट' अर्थात 'कापसाचा प्रांत' म्हणून ओळखला जातो. बारामाही पाणी पुरवठा करणारी नदी जिल्ह्याची भाग्यलक्ष्मी ठरली आहे. याबरोबर पांडव, बेंबळा, निपाणी या सातपुडा पर्वतरांगात उगम पावणाऱ्या नद्या पुर्णला येवून मिळतात. मास, बडी ज्ञानगंगा, केदार, विश्वगंगा, नळगंगा या उत्तरवाहीनी नद्या अजिंठा पर्वतरांगात उगम पावून पूर्णेला मिळतात. बाणगंगा ही नदी अमरावती जिल्ह्यात उगम पावून अकोला, बुलडाणा जिल्ह्याच्या सरद्दीवरून दक्षिणेस वाहत जाते व बुलडाणाजिल्ह्यातील देऊळगाव राजा येथे पूर्णा नदीस मिळते. माठा ही उत्तरवाहीनी नदी बुलढाणा पठारावर उगम पावून बुलडाणा-अकोला जिल्ह्याच्या सिमेजवळ पूर्वेस मिळते. म्हैस, मन, तोरणा, विश्वमित्रा या बुलढाणा जिल्ह्यातील तिच्या उपनद्या आहेत 


अकोला जिल्ह्यात शहानुर, विद्यापेढी, उमा, काटेपूर्णा, लोणार, मोर्णा, निर्गुणा व माठा या प्रमुख नद्या आहेत. पूर्णा नदीच्या उपरोक्त उपनद्या असून पूर्णा नदी अमरावती जिल्ह्यातून वाहत अकोला जिल्ह्यात येते. पैनगंगा ही दुसरी महत्वाची नदी असून बुलडाणा जिल्ह्यातून वाहत येते. याबरोबरच मन, आस, विश्वमित्री, निर्गुणा, गांधारी, वान या नद्या असून यावर अकोला जिल्ह्यात धरणे बांधलेली आहेत  वाशिम या नवनिर्मित जिल्ह्यामध्ये अडाण, अडोळ, अरूणावती, कोटपूर्णा नदी महत्वाच्या मानल्या जातात.


पैनगंगा ही जिल्ह्यातील महत्वाची नदी रिसोड तहसील मधून वाहते. कास ही पैनगंगा नदीची उपनदी आहे. काटेपूर्णा नदीचा उगम याच जिल्ह्यात झाला आहे. वाशिम हे नाव प्राचीन इतिहासात वत्सगुल्म नावाने ज्ञात होते. पूर्णा, काटेपूर्णा नद्यांमुळे येथील संपन्नता वाढली आहे.


वऱ्हाडातील साधन संपत्ती :


वऱ्हाड प्रांतात प्राचीन काळापासून नैसर्गिक साधनसंपत्ती मोठ्या प्रमाणात अस्तित्वात आहे. अजिंठा डोंगररांगा, सातपुडा पर्वतरांगा, मेळघाट, गाविलगड डोंगररांग, यवतमाळ जिल्ह्यातील डोंगररांगामुळे येथे साधनसंपत्ती मुबलक आढळते. साग वृक्षाचे प्रमाण या प्रदेशात मुबलक आढळते. यवतमाळ, बुलडाणा, सातपुडा, अजिंठा डोंगररांगात सागाचे उत्पादन बहुतांशी प्रमाणात आढळते. याबरोबरच तिवस, सलई, धावडा, नालडू, आवळा, मेंदू, बांबु, तेंदुची पाने, मोह, गवत, जळाऊ लाकुड, डिंक ही जंगलातील प्रमुख उत्पादने वऱ्हाडात आढळतात. या जंगली प्रदेशात जंगलीश्वापदांचाही मोठ्या प्रमाणात वावर दिसून येतो. सागाबरोबर ऐन, तिवट, लेंडीया, धावडा, तेंदू, सेमल, कारम, बांबु, लिंब, अंजन यांसारखे वृक्ष मुबलक आहेत. त्यामुळे औद्योगिक तथा घरगुती कामासाठी लाकुड उपलब्ध होते.


वृक्षांसोबतच खनिज संपत्तीही वऱ्हाड प्रांतात मुबलक आहे. वन्हाड प्रांतात दगडी कोळसा, मॅगनीज, लोह, कायनाईट, ग्रेनाईट, क्रीमाईट, सिलीमनाईट, चुनखडी, कोळसा आदी खनिज संपत्ती सुध्दा या प्रांतात आढळते. यवतमाळ जिल्ह्यात चुनखडी मोठ्या प्रमाणात आढळते. मुकुटवन, परमडोह, सिंदोळा या भागात चुनखडी सापडते वणी व राजुर येथे दगडी कोळशाच्या खाणी आहेत 


बुलडाणा जिल्ह्यात चंदन वृक्षाची झाडे आहेत. गेरू माटरगाव धरणाचे परिसरातील डोंगरावर चंदनाची झाडे आढळतात. बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवराचे परिसरात मीठ व शिसे अल्प प्रमाणात आढळते. जिल्ह्याच्या काही भागातून अकीक, कॅल्साईट इत्यादी खनिजेही कमी अधिक प्रमाणात आढळतात  यातील अकीकचा उपयोग दागिण्यासाठी व कॅल्साईट प्रकाशकीय उपकरणासाठी केला जातो. अकोला जिल्ह्यात कमी, अधिक प्रमाणात चुनखडी आढळते. भुगर्भातील नैसर्गिक साधन संपत्तीमुळे वऱ्हाड खनिज संपत्तीचे बाबतीत परिपूर्ण आहे. कमी-अधिक प्रमाणात भूगर्भात सापडत असलेल्या खनिज संपत्तीचे उत्खनन करण्यासाठी या भागात औद्योगिक वसाहतींची निर्मिती झालेली आहे.


वऱ्हाडात वाहणाऱ्या नद्यांमुळे या प्रांतात काळी कसदार जमिन आढळते. वाहणाऱ्या नद्यांमुळे गाळाचा सुपिक प्रदेश वऱ्हाड प्रांतात निर्माण झालेला आहे. काळी कसदार माती या प्रदेशात आढळते. या काळ्या कसदार जमिनीमुळे या प्रदेशात कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात आढळते. आधुनिक काळात कापसाच्या मुबलक उत्पादनामुळे हा प्रदेश अधिकच प्रसिद्ध झाला आहे. येथीलकापसाचे महत्व ओळखुन ब्रिटीशांनीही येथे कापुस गिरणी, सुतगिरण्यांची स्थापना केली. हा प्रदेश कॉटनबेल्ट चा भाग म्हणूनही ओळखला जातो. पूर्णा नदी काठची जमिन अस्सलीत काळी कसदार असून सर्वात सुपीक जमिन आहे. रब्बी आणि खरीप हंगामात उत्पादन या प्रांतात घेतले जाते. शेती पिकामध्ये कापूस हे अत्यंत महत्वाचे पीक आहे. याबरोबरच ज्वारी, कापूस, तुर, भूईमूग, गहु, हरभरा, जवस इत्यादी पिकेही घेतली जातात. कापुस, तुर, सोयाबीन हे नगदी पिक वऱ्हाडातील सर्वच जिल्ह्यांमध्ये घेतले जाते.


वऱ्हाडातील शेती ही प्रामुख्याने पावसावर अवलंबुन आहे. त्यामुळे नगदी पिकांवर जास्त भर या प्रदेशातील शेतकरी देतात.


यवतमाळ जिल्ह्यात काही ठिकाणी कोळशाच्या खाणी आहेत. वणी तालुक्यात लोहारा या ठिकाणी लोखंड कमी अधिक प्रमाणात सापडते. चुनखडी बरोबर रेती दगड, स्टेट्राचे दगड मिळतात.


याबरोबरच आधुनिक काळात व्यापारी उद्योगधंद्यांची येथे भरभराट झाली. पाश्चात्य तंत्रज्ञानाबरोबरच मुळ भारतीय हस्तोद्योग येथे आहे. सतरंज्या, पागोटी तयार केल्या जात होत्या. बाळापुर हे मध्यकाळात कागदासाठी खुप मोठे व्यापारी केंद्र होते. येथील शेती हा प्रमुख व्यवसाय असल्याने कच्चा माल सहजतेने कलाकारांना उपलब्ध होत असे त्यामुळे वऱ्हाडात लुगडी, खण, सुती कापडाचा व्यवसाय पाय रोवून होता. लुगडीसाठी देऊळगाव राजा प्रसिध्द ठिकाण आहे. खोलापूर, अंजनगाव सुर्जी येथे रेशमी कापड तयार केले जात असे. अचलपुर जवळील करजगाव येथे धातू गाळून घंटा व इतर सामान तयार केले जाई. देऊळघाट येथे पोलादी सामान, अडकीत्ते, कारंजा, देऊळगाव राजा येथे कुंकु, नांदुरा येथे लहान मोठ्या गाड्यांची निर्मिती केली जाई ४), बडनेरा, अकोला, खामगाव ब्रिटीश काळात कापडासाठी मोठ्या व्यापार पेठा म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या. या भागातील दर्जेदार कापसाला विदेशी बाजारपेठेत मोठी मागणी होती. हा उद्देश हेरून ब्रिटीशांनी वऱ्हाडात मोठ्या प्रमाणात

सुतगिरण्यांची स्थापना केली. रेल्वे लाईनही आणली. येथील कापूस सहजरित्या गोळा व्हावा यासाठी ब्रिटीश सातत्याने प्रयत्नशील होते. खामगाव ही वऱ्हाड मुख्य कापूस बाजारपेठ होती. येथुन कापूस अमरावती मार्ग कलकत्तेस पाठवला जाई  वऱ्हाडात दरवर्षी आठ ते दहा लक्षापर्यंत कापसाच्या गाठी तयार केल्या जात. अर्थातच शेती व्यवसायाने वऱ्हाडाच्या आर्थिक संपन्नतेत हातभार लावला होता.


डॉ किशोर वानखेडे.

इतिहास संशोधक 

 स्थापत्य ,गड किल्ल्यांचे अभ्यासक.

7588565392/9921245690

Post a Comment

0 Comments