*मेळघाट भ्रमंती- ८*
**डाकबंगला*
*(भाग ३)*
आमची गाडी सुसाट निघाली होती. चालक मित्र वगळता आम्ही दोघे मागे पाहत होतो.
बछुवा पाठलाग करत होता.
पण त्याची चाल दुडकी असल्यामुळे गाडीच्या वेगात पळणं त्याला शक्य नव्हतं.
काहीच वेळात गाडी कटरीत येऊन पोचली आणि आम्ही सुटकेचा श्वास घेतला.
एकदा मागं पाहून घेतलं.
गावात तुरळक माणसं बाहेर दिसत होती.
आम्ही कुठं चहा मिळतो का ते पाहू लागलो.
एका झोपडीवजा घरात किराणा सामानाचं छोटसं दुकान होतं.
उघड्या अंगाचा बुटका दुकानदार दुकानात बसलेला होता.
तिथं जाऊन आम्ही त्याला चहा बनवून देणार का विचारलं.
त्यानं हाक मारून घरातून बायकोला बोलावलं आणि तीन कप चहा करायला सांगितलं.
घरासमोर लिंबाचं झाड होतं. बुंध्याशी एक खाट उभी केलेली होती. दुकानदारानं अगत्यानं ती टाकून दिली आणि आम्हाला बसायला सांगितलं.
चहा पिताना आम्ही त्याला विचारल-
"वो आगे जो डाकबंगला है, वहां कोई रहता है क्या?"
"मालूम नही साहब." त्यानं त्रोटक उत्तर दिलं.
"आप लोग जाते हो वहां?"
"नही."
"क्यों?"
"ऐसेईच." तो अधिक बोलायला अनुत्सुक दिसला. "नही जाते."
"बाहर से कोई आते है वहां?"
"पता नही."
"कुछ खतरा है क्या?"
"पता नही साहब."
"उस जगह की देख- भाल किसके तरफ है?"
"पता नही."
"तो पता क्या है?"
"जाने दो ना साहब." त्यानं विनंती केली. "जिससे कोई मतलब नही वह बात पुछते क्यों हो?"
"अच्छा अब आखरी सवाल" सिनिअर मित्र त्याला म्हणाला, "हम लोग वहां गये तो क्या होगा?"
"मत जाना." त्यानं अंगाला शहारा देत मनाई केली. "वहां से कोई वापिस नही आता. ऐसा सुना है हम लोग."
आम्ही तिघेही एकमेकांकडे पाहू लागलो.
त्याला पैसे दिले. लगेच तिथून निघालो.
थोड्याच वेळात केथल आलं.
उन चटचटू लागलं होतं.
एका लेकुरवाळ्या घराच्या पडवीत खाटेवर एक म्हातारा बसलेला होता.
मी मित्राला गाडी थांबवायला सांगितली.
आम्ही तिघेही उतरून त्याच्याजवळ गेलो.
"रामराम."
"रामराम जी." त्यानं हात जोडले. थोरल्या नातवाला दुसरी खाट टाकायला सांगितली आणि आम्हाला विचारलं, "स्कूल के साहब हो क्या?"
"नही." आम्ही सांगितलं. "बस ऐसे ही घुमने आये थे."
"बाबाजी-" मी विचारलं, "आपकी उम्र क्या होगी?"
त्यानं हात उडवले. "कौन को पता? पर सत्तर एक होगा."
"आपके गाव के जो लोग है, उन सबको आप पहचानते होगे."
"गाव है ही कितना!" तो हसला. "सबको पहचाने मै."
"यहां बछुवा नाम का कोई बंदा रहता है?"
तो विचारात पडला.
मग काहीतरी आठवत म्हणाला, "इस नाम का अभी तो कोई नही. पन पहले था और उसको मरे अब पच्चीस तीस साल बित चुका है."
आमच्या अंगावर सर्रकन काटा उभा राहिला.
"उसका शक्ल सूरत कैसा था?" माझ्या तोंडून निघालं.
"अचा था. धोती पेनता था..." पुढे म्हातार्यानं जे वर्णन केलं ते आम्ही भेटून आलेल्या बछुवाशी तंतोतंत जुळणारं होतं.
"वह मरा कैसा लेकीन?" आमच्या दुसर्या मित्रानं विचारलं.
"आगे डाकबंगला है. वहां पहले अंग्रेज लोग रहता था. बाद मे कोई नही रहा. ये बछुवा वहां जाता था. घास काटने. कहते है वहां उसे कोई लडकी मिली. ये जाता था तो रात रात भर वापिस नही आता था. फिर एक दिन बछुवा वहां मरा पडा दिखा."
"ऐसा क्या हुवा की-"
"वो लडकी चुडैल थी कहते. उसीने इसे मारा."
आम्ही पुढचं काही विचारणार होतो. पण तेवढ्यात म्हातार्याकडे गावातली दोन माणसे आली. तो त्यांच्याकडे वळला आणि आम्ही तिथून निघालो.
रस्त्यात आमच्यात बरंच काही बोलणं झालं.
बछुवाचं ते भूत होतं तर त्यानं आपल्याला अपाय का केला नाही?
दुपारपर्यंत आम्ही बैतुलला पोचलो.
तिथल्या हॉटेलमध्ये जाऊन एक रुम बुक केली. कारण आम्ही बरेच थकलो होतो आणि थोडा आराम आवश्यक होता.
चारला उठून परतीला निघायचं नियोजन होतं.
पण अंगे टाकताच आम्हाला गाढ झोपा लागल्या.
जाग आली तेव्हा चक्क रात्रीचे दहा वाजत होते.
दरम्यान भुकाही लागल्या होत्या.
आम्ही जेवण करून निघायचं ठरवलं.
निघायला अकरा वाजले.
गाडी परतवाड्याच्या दिशेनं भरधाव जात होती.
रस्त्यानं वर्दळ नव्हती.
एखाद दुसरं वाहन येत जात होतं.
बाराचा सुमार असावा.
किट्ट काळोख होता.
रातकिडे उच्चरवात ओरडत होते.
आता रस्ता अगदी सामसूम होता.
ते पाहून मित्रानं गाडीचा वेग वाढवला.
समोर वळणाचा रस्ता होता.
वळसा येताच मित्रानं गर्रकन स्टेअरिंग व्हिल फिरवलं.
आणि अचानक पायात असेल नसेल ते बळ एकवटून त्यानं ब्रेक लावले.
टायर्सचा केवढ्यानं तरी चरचराट झाला.
आम्ही समोर पाहतो तर रोडच्या मधोमध पांढरा शुभ्र पायघोळ झगा परिधान केलेली एक मुलगी बसलेली होती.
ती उकिडवी बसलेली होती आणि आपलं मुंडकं तिनं दोन गुडघ्यांच्या मधे घातलेलं होतं.
(क्रमश:)
*-अशोक मानकर*
0 Comments