*मेळघाट भ्रमंती - ६*
*डाकबंगला*
(भाग १ )
हो ना करता अखेर आम्ही तिघांनी त्या अत्यंत जुनाट आणि कैक वर्षांपासून कुणीच राहत नसलेल्या डाकबंगल्यात मुक्कामी जायचा निर्णय घेतला.
कटरी या दीडशे लोकवस्तीच्या गावातून पश्चिमेला अरुंद रस्ता जातो.
पुढे टेकडी आहे.
तिच्या पायथ्यानं पुढे गेलं की दाट जंगल लागते. इथून दोन किमी अंतरावर मोकळ्या जागेत हा डाकबंगला आहे.
त्याच्या चारी बाजूंना गंज चढलेल्या तारांचं कुंपन आहे. मधे फाटक आहे. ते ही गंजलेलं आहे आणि त्यावर जागोजाग खपल्या धरल्या आहेत.
समोरचा मोकळा भाग सोडता बाकी तिन्ही बाजूंनी डाकबंगला गर्द झाडीनं वेढलेला आहे.
आम्ही निघालो तो अमावस्येचा दिवस होता.
कटरीच्या अलीकडे केथल नावाचं गाव लागते.
गावात तीस चाळीस घरं आहेत.
आम्ही अंथरुणे पांघरुणे सोबत घेतली होती. बॅटरीचे दिवे घेतले होते आणि जेवायचा डबाही घेतला होता.
पण मुक्कामी थांबायचं तर डाकबंगल्याची स्वच्छता करून घेणं गरजेचं होतं.
यासाठी कटरीतला कुणी माणूस शोधावा तर ती अशक्यप्राय गोष्ट होती.
कारण तुम्ही लाख रुपये देऊ केले तरी साफसफाईच काय डाकबंगल्यात पाय ठेवायलाही इथलं कुणीच तयार होत नाही.
म्हणून आम्ही केथलमध्ये गेलो आणि कामासाठी कुणी गडी मिळतो का ते शोधू लागलो.
साधारण पंचेचाळीशीतला माणूस मिळाला.
तो फार कमी बोलणारा होता. पण त्यानं अट टाकली.
साफसफाई झाल्यावर दिवस मावळायच्या आत मला परत आणून सोडावं लागेल.
आम्ही ते कबूल केलं.
त्याला घेऊन आमची गाडी डाकबंगल्याकडे निघाली.
कटरी ओलांडून काहीच वेळात आम्ही डाकबंगल्यासमोर आलो.
लोखंडाचा सांगाडा झालेलं फाटक उघडलं. गाडी आत घेतली.
आत जाऊन सगळं पाहून घेतलं.
किचनपासून बाथरून संडास आणि झोपायला दोन मोठी दालनं होती. दालनात दोन सागवानी पलंग होते.
पण ते इतके जुनाट होते की झोपणं दूर त्यावर बसावसंही वाटत नव्हतं आणि तिथं जे जे काय होतं ते सगळं भग्नावस्थेत होतं.
लोखंडी सामान तर सडायला आलं होतं.
आवारात डावीकडे हापशी होती.
आम्ही गाडीतून बादली गुंडी मग्गा आदी साहित्य काढून गड्याच्या सुपूर्द केलं आणि त्याला डाकबंगला होता होईल तेवढा स्वच्छ करायला सांगितला.
गड्यानं होकारार्थी मान हलवली.
तो धोतर कमरेला खोचून कामाला लागला.
दुपारचा एक वाजत होता.
आम्हाला आता वेळच वेळ होता.
आमच्यापैकी आम्ही दोघे गाडीत पहुडलो.
आमचा तिसरा मित्र आवारात फेरफटका मारायला गेला.
उजवीकडे उंच गवत वाढलेलं होतं. मित्र त्यात घुसला. घुसताच त्यानं आम्हाला हाक मारली.
आम्ही जाऊन पाहतो तर तिथं एक थडगं होतं.
त्या भंगलेल्या थडग्यावर मारिया स्मिथ १८८९ असं सिमेंटमध्ये कोरलेलं होतं.
पूर्वी इथं ब्रिटिश राहत असावेत. त्यातली ही स्त्री इथं मरण पावली असावी असं आम्ही अनुमान काढलं.
पाचच्या सुमारास गड्याची साफसफाई पूर्ण झाली.
ठरल्याप्रमाणे आम्ही तिघंही गाडीत बसलो आणि त्या गरीब माणसाला ठरवले होते त्यापेक्षा शंभर रुपये अधिक चुकते करून पोचवायला निघालो.
परत आलो तेव्हा दिवस मावळतीला आला होता.
आम्ही आवारातच सतरंजी अंथरली.
त्यावर जेवणं आटोपली.
नंतर शतपावली करू लागलो.
थोडा वेळ असाच गेला.
मग अंधार पडू लागला.
एकट दुकट रातकिडा बाहेर येत होता आणि समूहगान सुरू होण्यापूर्वी सरावाचा भाग म्हणून स्वर आवळून पाहत होता.
आम्ही बॅटरिचा दिवा पेटवला.
आवाराचं फाटक जमेल तसं बंद करून घेतलं.
कारण या टापूत रात्री वन्य श्वापदांचा स्वैर वावर असतो हे आम्हाला ठाऊक होतं.
मग आत येऊन आम्ही वळकट्या अंथरल्या.
दालनाचं दार कसंबसं आतून बंद करून घेतलं.
दिवा तसाच ठेवला आणि अंगावरून चादरी ओढून घेतल्या.
दरम्यान झाडून सगळ्या रातकिड्यांचे समूह तारस्वरात ओरडू लागले होते.
लगतच्या झाडीतून खसफसण्याचे, कुणीतरी हळूवार पावलं टाकत चालल्याचे आवाज येत होते.
आम्हाला झोप येत नव्हती.
मग अकराच्या नंतर केव्हातरी आमचा डोळा गुरमाळला.
अचानक आम्ही तिघेही दचकलो.
खाडकन उठून बसलो.
बहुतेक तो बारा एकचा सुमार असावा.
बाहेरून कुणीतरी दाराची कडी वाजवत होतं.
(क्रमश:)
*-अशोक मानकर*
0 Comments