Subscribe Us

डाक बंगला.मेळघाट 4

 *मेळघाट भ्रमंती -९*

*डाकबंगला*

*(भाग ४)*


त्या किट्ट काळोखात रात्रीचे बारा वाजता रोडवर गुडघ्यात डोकं खुपसून बसलेली ती मुलगी पाहून आमच्या मित्रानं गाडीला करकचून ब्रेक घातला खरा.

पण आता काय होणार?

आमची अवस्था न सांगितलेली बरी.

पण चालक मित्राला कुठून सुबुद्धी सुचली कोण जाणे, त्यानं ब्रेक तर घातलाच पण दुसर्‍याच क्षणी गाडी न थांबवता ती गर्रकन तिच्या डाव्या बाजूनं काढली. 

मग जमेल तेवढं ॲक्सीलरेटर वाढवून त्यानं ती प्रचंड वेगात पुढे दामटली.

आमच्यापैकी कुणीच मागं पाहत नव्हतं. 

वार्‍याशी स्पर्धा करत आमची गाडी पाचेक किमी पुढे गेली.

कुठलसं गाव लागलं. 

रस्त्यालगत असल्यानं थांब्यावर सटरफटर हॉटेल्स होती. 

त्यातलं एक उघडं दिसलं. 

मालक सगळी आवरासावर करून ते बंद करण्याच्या बेतात होता.

मित्रानं गाडी थांबवली.

खाली उतरून आम्ही मागं पाहिलं. मग हॉटेलमधे गेलो. मालकाला चहा मिळेल का विचारलं.

त्यानं होकार दिला.

चालक मित्रानं खिशातून मोबाइल काढत आम्हाला म्हटलं, "इथं माझा एक स्टुडंट राहतो. त्याला फोन करतो. आता रात्रभर त्याच्याकडे थांबू. सकाळी निघू. तेच बरं राहील."

फोन करताच विद्यार्थी लगबगीनं तिथं आला.

तो शेतकरी पूत्र होता.

त्यानं आम्हाला आनंदानं घरी नेलं. घरच्यांना उठवून आम्हाला जेवायचा आग्रह केला. 

मित्रानं त्याला फक्त झोपायची व्यवस्था करायला सांगितलं.

सकाळी आम्ही लवकरच उठलो आणि परतवाड्याकडे निघालो.

चालक मित्र तिथलाच होता. त्याच्य‍ाकडे जाऊन मस्तपैकी फ्रेश होऊन चहा नाश्ता केला.

सिनिअर मित्र म्हणाला, "आता सरके अमरावतीले जाऊन डाक्तर xxx च्या घरी जाऊ." 

हे डॉक्टर म्हणजे अमरावतीतले प्रख्यात मानसोपचार तज्ञ होते नि ते मित्राचे चांगले परिचित होते.

आम्ही अमरावतीकडे निघालो.

सिनिअर मित्र म्हणू लागला. "लोकं सायाचे म्हंतात भूत नसते. मंग हे काय होतं? चाला डाक्तरलेच विचारू."

दीड तासानंतर आम्ही डॉक्टरांच्या केबिनमध्ये होतो.

त्यांनी प्रतीक्षेत असलेले रुग्ण तात्पुरते थांबवून आम्हाला आत बोलावून घेतलं होतं.

अगत्यानं चहा बोलावला होता.

चहा घेत घेत सिनिअर मित्रानं काय काय नि कसं कसं घडलं ते  त्यांना सांगितलं.

डॉक्टर त्या दोघांचे परिचित होते. मला काही ते अोळखत नव्हते. मित्रानं तिखटमीठ लावून माझा परिचय दिला.

सगळं ऐकून झाल्यावर त्यांनी निर्वाळा दिला. अगोदर त्यांनी चालक मित्राकडे पाहिलं.  "हे लेखक आहेत."

मग सिनिअर मित्राकडे पाहिलं. "आणि अलीकडे तुम्ही पण लिहू लागलात."

नंतर ते माझ्याकडे वळले. "आणि हे तर जुने जाणते लेखक आहेत."

त्यांनी पुढे म्हटलं. "लेखक स्वप्नाळू असतो. स्वप्न पाहिल्याशिवाय तो लिहूच शकत नाही. माणसाच्या मेंदूत एक भ्रमाचा कप्पा असतो. तो वाईटच असतो असं नाही. पण तुम्ही जे पाहून अनुभवून आले म्हणता ते सगळं भास या प्रकारात मोडते."

याचं त्यांनी मग सविस्तर स्पष्टीकरण दिलं.

आम्ही खाली माना घालून तिथून निघालो.

सिनिअर मित्राच्या घरी गेलो. 

मला आता प्रकर्षान घरी जायचे वेध लागले होते.

पण जेवण करु न देता जाऊ देणारा तो मित्र कसला!

आम्ही जेवणं केली.

मग या दोन्ही मित्रांनी मला गाडीतून राजापेठ बसस्थानकावर आणून सोडलं.

बस उभीच होती.

मी डावीकडच्या आसनावर बसलो नि ती निघाली. 

मित्रांना बाय बाय केलं.

बसनं अमरावती अोलांडलं.

ती बडनेरा स्थानकात शिरली. 

दोन मिनिटे थांबली. 

दोन तीन प्रवासी गाडीत चढले. 

कंडक्टरनं घंटी वाजवली.

बस निघाली तेव्हा सहज म्हणून मी बाहेर पाहिलं.

आटो उभे असतात तिथं कुठल्यातरी खेड्यावरच्या पाच सहा महिला कलकलाट करत उभ्या होत्या. 

त्यांच्या मागे पांढरा शुभ्र वन पीस परिधान केलेली एक मुलगी उभी होती. 

त्या गोर्‍या भुर्‍या आणि दिसायला अत्यंत सुंदर असलेल्या मुलीचे केस पिंगट सोनेरी होते. त्यांची तिनं बुची बांधलेली होती. 

गंमत म्हणजे ती माझ्याकडे एकटक पाहत होती. 

मी तिला निरखून पाहायला जातो तर बस पुढे निघाली.

पुढे लोणी आलं. 

बस थांबली.

माझं लक्ष हिंगलासपूर रस्त्याकडे गेलं. 

पाहतो तर रस्त्याच्या बाजूला तीच मुलगी उभी!

माझ्याकडे पाहून ती गालात हसत होती.

मी अस्वस्थ झालो.

त्यातच बस निघाली.

पुढे धनज आलं तेव्हा मी कटाक्षानं बाहेर पाहणं टाळलं.

नंतर कामरगाव आलं.

कंडक्टरच्या घंटीसरशी बस थांबली. 

मी बाहेर न पाहता खाली मान घातली.

डबल घंटी होताच बस पुढे निघाली.

कामरगाव अोलांडताना डावीकडे रस्त्यालगत काही लिंबाची झाडं आहेत.  

गाव मागं गेलं म्हणून मान वर काढून मी तिकडे पाहिलं.

पाहतो तर एका झाडामागे ती उभी होती!

यावेळी ती हात उंचावून मला बाय बाय करत होती आणि तिच्या चेहर्‍यावर गूढ हसू होतं.

बाप रे!!!

मी गावी आलो.

टी पॉइंटवर उतरून घराकडे निघालो तेव्हा माझी नजर भिरभिरत होती. 

मी सारखा इकडेतिकडे पाहत होतो.

पण तसं काहीच दिसलं नाही.

घरी आलो. 

घरच्या कामात गढून गेलो. 

नंतर काही कामानं बाहेर गेलो की माझी नजर सारखा शोध घेत राही. 

भाजी आणायला गेलं असं वाटायचं, ती दूर कुठं उभी तर नसेल?

किराणा दुकानातही मी इकडेतिकडे पाही. 

एवढंच काय पीठगिरणीवर दळण घेऊन गेलो तरी माझं लक्ष लगतच्या झाडाझुडपांकडे नि लोकांकडे जात असे.

पुढचे काही दिवस असेच तणावात गेले.

पण सुदैवानं काहीच घडलं नाही.

नंतर मी माझ्या रहाटात व्यस्त होऊन गेलो.

ती स्मृती धूसर होऊ लागली.

हां हां म्हणता महिना होत आला. 

आणि मग ती रात्र आली.

रात्रीचं जेवण आटोपून नेहमीप्रमाणे मी व्हरांड्यातल्या झोपाळ्यावर झोके घेत बसलो होतो. 

कानात हेडफोन घालून मोबाइलमधली गाणी ऐकत होतो.

रात्री मी साधारणत: साडेअकराला झोपतो.

पण त्या रात्री कळत न कळत बारा वाजले.

झोके आवरते घेत झोपाळ्यातून उठायला जातो, अशात माझा मोबाइल वाजला.

ऑन करून मी तो कानाला लावला. "हलो."

"Mr. XXX XXXX speaking?" आवाज मुलीचा होता आणि फारच मधुर होता.

"Yeah." मी सावरून बसलो. "You?"

"I will tell you. But please don't cut the call."

"Why? And who are you?"

"Will tell you, sir. But you wouldn't cut the call after telling that, right?"

मी आजूबाजूला पाहिलं.

"You're listening sir," ती म्हणाली, "aren't you?"

"Yeah, but you- " आज अमावस्या तर नाही? माझ्या मनाला शंका चाटून गेली. 

ती हळूच उदगारली, *I'm Maria, Sir.*


(क्रमशः)


*-अशोक मानकर*


Post a Comment

0 Comments