*मेळघाट भ्रमंती - १०*
*डाकबंगला*
*(भाग ५)*
तिकडून फोनवर तिनं मारिया असल्याचं सांगताच मी ताडकन उडालो आणि मला दरदरून घाम फुटला.
काय बोलावं ते सूचेना झालं. "अं, I want to know why you are chasing me?" मी कसंबसं विचारलं.
"Yeah." ती अत्यंत अदबीनं उत्तरली, "surely."
"Tell me." मी अंगात धिटाई आणली. "Why are you following me? Have you any problem from me?"
माझं इंग्रजी जेमतेम असल्यामुळे नंतर मी तोडकंमोडकं बोलू लागलो. पण मी मग चिडलो. "आणि मला मारायचं आहे का तुम्हाला? तसं असेल तर- "
माझं कच्च इंग्रजी पाहून की काय ती मराठीत बोलू लागली.
"मी का मारेल सर तुम्हाला?" तिला वाईट वाटलं आणि ती त्वेषानं म्हणाली, "उलट कुणी तुम्हाला मारायला आलं असतं नि शक्य झालं असतं तर मी त्याला मारलं असतं."
"म्हंजे तुम्ही कुणाला मारत नाहीत?"
"Nope sir." ती दु:खी कष्टी झाली. "आम्हा लोकांना उगीच बदनाम केलं गेलं आहे. तसं असतं तर मानव जातीतला एकही खुनी जिवंत नसता राहिला. साध्या भोळ्या लोकांना गंडवणार्यांची खैर नसती. मुली महिलांना त्रास देणारे नावाला उरले नसते. पण झालं आहे असं कधी? आमचं वास्तव्य स्मशानात असते. पण स्मशानात गूढरित्या कुणी मारल्या गेलंय का कधी? खूप व्यथा आहेत सर आमच्या. पण सांगणार कुणाला? जे देवाला मानतात ती श्रद्धा म्हणविली जाते आणि ज्यांचा आमच्या असण्यावर विश्वास असतो ती अंधश्रद्धा म्हटली जाते. असं बरंच काही आहे. असो."
तिचं बोलणं ऐकून मला हायसं वाटलं. "म्हंजे मला तुमच्याकडून कसलाच धोका नाही?"
"Nope sir. आणि मला अहो काहो नका म्हणू. तू म्हणा."
"ok. पण मी निश्चिंत राहू ना?"
"Yeah sir." अशी ग्वाही देत तिनं नाराजी व्यक्त केली. "आणि सर तुम्हाला काही करायचं असतं तर मी डाकबंगल्यावरच केलं नसतं का? पण झालं का तसं काही?"
"हूं. आणि तो बछुवा? तो का मागं लागला होता आमच्या? तो तर तुझाच माणूस होता ना?"
"Yeah. तो माझाच माणूस होता. पण माझ्या घरचं माणूस म्हणून नव्हे."
"मग?"
"He is my servent."
"मग त्याला आदेश-"
"मीच दिला होता."
"कशाला?"
"ते सगळं सांगते मी. But one by one. अगोदर माझ्याबद्दल सांगते. थोडक्यातच सांगते. Edward Smith आणि Alexandra यांची मी एकुलती एक मुलगी.
वडील ब्रिटीश इस्ट इंडिया कंपनीत या प्रांताचे Deputy commissioner होते. कटरीचा डाकबंगला गव्हर्नरकडून त्यांना खास विश्रांतीस्थळ म्हणून देण्यात आलेला होता.
इथं आल्यावर नंतरच्या खेपेला ते आईला नि मला सोबत घेऊन आले. हा देश त्यांना खूप आवडला होता.
त्यांनी रितसर मला सिमल्याच्या स्कूलमध्ये दाखल केलं.
सुटीत मी घरी यायचे तेव्हा ते मला नि आईला घेऊन डाकबंगल्यात यायचे.
तिथं आम्ही एकेक आठवडा राहायचो.
एकदा काय झालं, की त्या आवारात तेव्हा खूप मोठमोठी झाडं होती. आईवडील आत असल्याचं पाहून मी एका झाडावर चढले. बरीच वर गेले. आणि एकाएकी तोल जाऊन खाली पडले."
"अरे!"
"Yeah. खाली लोखंडी पाइप ठेवलेले होते. माझं डोकं एका पाइपवर आदळलं. मेंदूला गंभीर इजा झाली. त्यात माझा मृत्यू झाला."
"अरे." मी हळहळलो. "सो सॅड."
"Yeah sir. मग मी भूत बनले. I means हडळ."
काही क्षण शांततेत गेले.
मग मी तिला विचारलं, "आणि त्या बछुवाचं काय?"
"तो खूप गरीब माणूस होता. पण हकनाक जिवानं गेला बिचारा."
"काय झालं होतं त्याचं?"
"पुढच्या काळात डाकबंगला ओस पडला." ती सांगू लागली. "नंतर त्या ठिकाणी फक्त माझं वास्तव्य होतं. बछुवा तिथं गवत कापायला यायचा. नेहमीप्रमाणे तो त्या ही दिवशी आला. आला नि गवत कापू लागला. पण, तो दिवस अमावस्येचा होता."
"ohh."
"होय. इतर दिवशी आम्ही लोकांना दिसत नाही. पण अमावस्या याला अपवाद असते."
"कशी काय?"
"तुमचे half and full holidays असतात ना Saturday, Sunday. तसे आमचे अमावस्या नि पौर्णिमा डे असतात. अमावस्या ही तर पर्वणी असते आमच्यासाठी. खूप खूष असतो आम्ही या दिवशी. इच्छा झाली तर या दिवशी आम्हाला देह धारण करण्याची मुभा असते. ती दीड दिवसही घेता येते. But we can decide when to appear. तर त्या दिवशी मी देह धारण करून आवारात आले. आले नि बछुवाला दिसले."
"मग?"
"मग काय? मला पाहून त्याची बोबडी वळली. फार भित्रा निघाला तो. क्षणात खाली पडला नि गतप्राण झाला."
"बाप रे. ही स्टोरी आहे तर बछुवाची."
"Yeah. मला खूप वाईट वाटलं त्या दिवशी. पण काय करू शकत होते मी? nothing else. मग तो ही भूत बनला. आता माझा सेवक म्हणून काम करतो."
"मग त्या दिवशी-"
"सांगते. त्या दिवशी तुम्ही डाकबंगल्यावर येणार आहात हे ऐकून मला इतका आनंद झाला सर, की विचारू नका."
"आनंद झाला?" मी गडबडलो. "आणि तुला ते-"
"Yeah sir. आमच्याशी संबंधित सगळी माहिती असते आमच्याकडे. नि ती आम्हाला अगोदरच माहिती होते. Its the part of our communication."
"बाप रे."
"होय. मग तुम्ही येणार आणि डाकबंगला तर कमालीचा अस्वच्छ झालेला. अनायसेच तो साफ करायला तुम्ही माणूस शोधायला केथलमध्ये गेला नि ती संधी साधून मी बछुवाला तिथं पाठवून दिलं. माझं भाग्य असं की त्या दिवशी अमावस्या होती."
"साफसफाई तू पण करू शकली असतीस." मी प्रतिप्रश्न केला. "त्याला का पाठवलं?"
"काय सर!" ती हसली. "मी जर कामवाली म्हणून तुमच्या समोर आली असती तर तुम्हाला शंका नसती का आली? ही गोरीभुरी ब्रिटीश मुलगी इकडे कशी काय म्हणून?"
"मग आम्ही येण्यापूर्वी तुला साफसफाई करता आली असती."
"अहो सर-" ती पुन्हा हसली. "तसं झालं असतं तर ते पण शंकेचं कारण नसतं का ठरलं? की आपण येण्यापूर्वीच हे सगळं एकदम स्वच्छ कसं काय? तुमची समजूत झाली असती, हे भुताचंच काम दिसते नि तुम्ही तिथं मुक्कामी तरी थांबला असतात का?"
"अच्छा! हे लॉजिक होतं तर ते."
"हां."
"बरं आम्ही डाकबंगल्यात झोपल्यावर बछुवाला रात्री पाठवायचं कारण काय?"
"तुमची शक्य आहे ती खातिरदारी करण्याची जबाबदारी मी त्याच्यावर सोपवली होती. त्याला मी वारंवार बजावत होते, हे माझे गेस्ट आहेत. त्यांना काहीच कमी पडता कामा नये. त्या आदेशामुळे तो बिचारा रात्रभर पहारा देत राहिला. मग न राहवून तुम्हाला काही हवं का ते बघायला म्हणून त्यानं त्या अपरात्री कडी वाजवली."
"पण आम्ही घाबरलो होतो त्यामुळे."
"I know. आणि जसं ते माझ्या लक्षात आलं तसं मी त्याला मनाई केली."
"आणि सकाळी त्याला चहा करायला पाठवलं तर त्यात तो गूळ-"
"मीच म्हणाले होते त्याला चहासाठी."
"पण त्या गुळात तर रक्तासारखं काहीतरी-"
"नो. रक्त नव्हतं ते. त्याचं झालं असं, की बछुवानं तुम्हाला चहा तर करून दिला असता. तुम्ही तो प्यायले असते. पण तिथून परत निघताना तुम्ही बछुवाला परत चल म्हटलं असतं. तो आला नसता. कदाचित तुम्हाला शंका आली असती. तुम्ही केथलमध्ये जाऊन त्याची चौकशी केली असती. आणि तिथं तुम्हाला कळलं असतं की तो कधीचाच वर गेला आहे."
"हूं."
"मग ते ऐकून तुमच्या पोटातल्या चहाचं काय झालं असतं?"
मी कल्पना केली. "आम्हाला ओकार्याच झाल्या असत्या."
"तेच तर. आणि तो सल तुमच्या मनात आयुष्यभर राहिला असता. सो जसा बछुवा चहा मांडायला गेला तसं माझ्या हे लक्षात आलं. मी त्वरित जवळच्या झाडावरचं मध काढलं. जवळच्याच जास्वंदीच्या फुलाचा रस पिळून त्यात टाकला नि हे मिश्रण गुळावर टाकलं. ते पाहून तुम्हा सर्वांना शंका आली आणि माझा जीव भांड्यात पडला. आणि हां सर, मी तिथं हजर होते. पण तुम्हाला दिसत नव्हते. of course मी शरीर धारण केलं नव्हतं."
"अच्छा. हा प्रकार होता तर तो."
"होय."
"हे झालं बछुवाचं. पण-" मला ती रोडवर बसलेलं दृश्य आठवलं. "त्या दिवशी आम्ही बैतुलवरून येताना तू रस्त्याच्या मधोमध बसण्याचं कारण काय?"
"हां ते ना. त्या दिवशी मला प्रकर्षानं वाटत होतं, तुम्ही इतक्या लवकर तिथून येऊ नयेत."
"कारण?"
"कारण मला तुमच्याशी खूप खूप बोलायचं होतं. त्या भावनावेगात मी त्या रस्त्याच्या मधोमध येऊन बसले. या धारणेनं, की मला पाहून तुम्ही खाली उतरून माझ्याजवळ याल. माझी प्रेमानं वास्तपुस्त कराल.
आणि मी मग मला जे सांगायचं होतं ते तुम्हाला सांगेल." ती काहीशी भावविभोर झाली. "मी हडळ असले म्हणून काय झालं? फिमेल तर आहेच ना. आणि मानव जातीतल्या फिमेल मनाला असतात त्या भावना आम्हालाही आहेत. म्हणून मी तसं करून पाहिलं.
पण तुम्ही थांबला नाहीत आणि माझी चूक माझ्या लक्षात आली."
मी पुढचा प्रश्न केला, "आणि त्या दिवशी मी अमरावतीवरून निघालो तर माझा पाठलाग कशासाठी करत होतीस?"
"तुम्ही अमरावतीवरून निघालात ना, तेव्हा तुमच्या बाजूला बसून प्रवास करायचा विचार होता माझा."
"बाप रे."
"होय सर. पण मी ते टाळलं. कारण मला जे बोलायचं आहे ते बसमध्ये बसून शक्य नव्हतं. पण माझं अनावर मन मला तुमच्या मागे मागे नेत राहिलं."
"ते कशासाठी?"
"हे पाहायला की तुम्ही सुरक्षित जाताय ना."
"ओह."
"पण ते तुम्हाला आवडलेलं दिसलं नाही. म्हणून मी कामरगावपर्यंत आले नि तिथून परत गेले."
"हूं."
"सर आता मुद्द्यावर येते. तत्पूर्वी एक सांगू का?"
"काय?"
"तुमचे ते दोन मित्र आहेत ना. खूप चांगले लोक आहेत ते. अशी माणसं मोजकीच असतात."
"यात शंकाच नाही."
"पण सर, त्या दोघांपेक्षा मला तुम्हीच अधिक आवडता."
"अय पोरी." मी वर्हाडीवर घसरत तिच्यावरही घसरलो. "काय बोलून रायली तू?"
"सर सर सर." तिनं मला रोखलं. "Please d'ont misunderstand. त्या दोघांत आणि तुमच्यात एक फरक आहे."
"कुठला?"
"कबूल की ते दोघे पण लिहितात."
"हो मग?"
"पण त्यांनी एक तरी भुतावरची गोष्ट लिहिलेय का कधी? आणि तुम्ही? जास्त नाही, पण लिहिल्या आहेत!"
"अच्छा अच्छा अच्छा." मी थक्क झालो. "ते पण ठाऊक आहे तुला?"
"मी म्हटलं ना सर. आमचं कम्युनिकेशन असतं. मला अजूनही आठवते, तुम्ही शाळेत शिक्षक असताना मुलांना भुतांच्या गोष्टी सांगायचे."
"माय गॉड. ते पण-"
"Yeah sir. तुमच्या त्या भुतांच्या गोष्टी ऐकून किती खूष व्हायची मुलं? ब्ला ब्ला ब्ला! सर, ती मुलं तुम्हाला अजूनही विसरली नाहीत. त्यांना जर विचारलं तुम्हाला सरांच्या कुठल्या गोष्टी आवडायच्या? तर ते भुतांच्याच असं उत्तर देतील."
"माना लागील पोरी तुला."
"आणि सर, आम्ही वाईट असतो तर मुलांना तरी आवडलो असतो का?"
"पण भुतांच्या गोष्टीत भीती असते." मी मुद्दाम म्हटलं.
"पण ती हवीहवीशी असते सर. नाही तर विचारा कुणाला पण. आणि लहानच नाही तर मोठी माणसं पण. ज्यांना आमच्या गोष्टी आवडत नाहीत असा एक तरी कुणी असेल का?"
"ना." मी मान डोलावली. "असलाच तर अरसिक असेल तो."
"आणि सर तुम्हाला ठाऊक आहे का, तुमच्या त्या गोष्टी आमच्या कम्युनिटीमधे पण चर्चिल्या गेल्या होत्या."
"अच्छा?"
"होय. आमचं दरवर्षी annual function असते. या फंक्शनला त्या त्या रिजनमधली सगळी भुतं आवर्जून हजेरी लावतात. या कार्यक्रमात धमाल असते सर. नाचगाणी असतात. विविध स्पर्धा असतात. व्याख्याने असतात. आणि एक तर कथाकथनाचा कार्यक्रम असतो."
"ओह!"
"हां सर. त्यात तुमच्यातल्या ज्या ज्या लेखकांनी भुतांवर कथा लिहिल्या आहेत त्यांचं वाचन केलं जाते. यात तुमच्याही कथा सांगितल्या जातात सर, बरं का!"
"What?"
"Yeah. मला व्यक्तिश: म्हणाल तर तुमच्या 'फाशी घेणारं प्रेत' आणि 'भुताचा धडा' ह्या दोन कथा खूप आवडल्या होत्या सर."
"बाप रे बाप!" मी सर्द झालो.
"होय सर. मला तेव्हाच वाटलं होतं, या लेखकाला भेटता पाहता आलं तर किती छान होईल. आणि मी लकी ठरले."
"हूं. बरं आता पाहिलं ना मला?"
"होय सर. पाहिलं. अगदी डोळे भरून पाहिलं."
"मग आता काही शिल्लक तर राहिलं नाही ना?"
"राहिलं ना सर."
"ते काय?"
"अधूनमधून अशीच किमान एखादी तरी कथा लिहीत जा आमच्यावर. I request you. बाकी काही नाही सर."
"येस." मला गलबलून आलं. "नक्की लिहीत जाईन."
"बस एवढंच बोलायचं होतं मला. Wish you all the best. रात्र बरीच झाली आहे. चलो बाय. गुड नाईट. टेक केअर. and लब्यू सर."
"अहो उठा... उ
ठा..." कुणीतरी हाका मारत होतं. मी खडबडून जागा होऊन उठून बसलो आणि भानावर आलो.
मी स्वप्न पाहत होतो तर!
(समाप्त)
*-अशोक मानकर*
0 Comments