*डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली पातुर्डा भुमि..29 मे 1929*
*प्रस्तावना -*
चातुर्वर्ण्य व्यवस्थेचे बंधन झुगारून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दलितांना राजकीय तथा सामाजिक हक्क मिळवून देण्यासाठी अखंड भारतात जनआंदोलन उभे केले. महाराष्ट्रातही विविध प्रांतात भ्रमण करून सार्वजनिक ठिकाणे जसे मंदीर, पाणवठे, गावठाण आदी दलितांना खुली करून देण्यासाठी लढा उभारला. इ.स.1920 नंतर प्रसारित झालेल्या ब्राम्हणेतर चळवळीनेही दलितोध्दाराच्या कार्यास सुरुवात केली होती. परंतु त्याला हवे तेवढे यश प्राप्त झाले नाही. यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुढाकार घेवून दलितांना एकत्र केले. विविध ठिकाणी दलितांची तथा बहिष्कृत समाजाची अधिवेशने घेतली. पूणे येथे सर्व प्रथम महार परिषद इ.स.1927 मध्ये घेतली. या परिषदेला संपूर्ण महाराष्ट्रातील समाजसेवक उपस्थित होते. या सेवकांनी दलितांच्या न्याय, स्वातंत्र, समता तथा सर्वजनिक हक्कासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रेरणा घेऊन लढा उभारला. डॉ. बाबासाहेबांचा लढा विदर्भातही पोहचला होताच. अॅड. पंजाबराव देशमुख यांनी अंबादेवी मंदीर दलितांना खुले करून देण्यात यावे यासाठी अमरावती सत्याग्रह केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी इ.स. 1920 नंतर दलित समाजाचे नेतृत्व करून बहिष्कृतांना सामाजिक न्याय मिळवून देण्याचे कार्य केले. प्रस्तुत लेखात बुलडाणा जिल्हयातील पातुर्डा येथे झालेली अस्पृश्य परिषदेची चिकीत्सा केलेली आहे.
दलित समाजाचा उध्दार होण्यासाठी एकसंघटीतपणे लढा उभारावा यासाठी दि. 20 जुलै 1927 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली महार समाजाची पहिली सभा पुणे येथे संपन्न झाली. या सभेला बुलडाणा जिल्हयातील पंढरीनाथ पाटील, आनंदस्वामी यांची उपस्थिती होती' उभयतांच्या उपस्थितीमुळे बुलडाणा जिल्हयात दलित समाजाचे परिषदांस पोषक वातावरण निर्माण झाले. पंढरीनाथ पाटील यांनी पुढाकार घेऊन सातगाव भुसारी येथे प्रथमच जिल्हास्तरीय महार परिषदेचे आयोजन केले. तद्नंतर बुलडाणा जिल्हयात विविध ठिकाणी बहिष्कृत तथा दलित समाजाच्या परिषदांचे आयोजन झालेले दिसून येते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुणे येथे घेतलेल्या सामाजिक परिषदेमुळे बहुजन समाज जागृत झाला. महार बांधवांतही सामाजिक उत्थानाची आणि परंपरेने निर्माण केलेले जोखळदंड उखडून फेकण्याची प्रेरणा निर्माण झाली. याच विचारसरणीतून सातगाव भुसारी येथे इ.स. 1927 मध्ये महार परिषदेचे आयोजन करण्यात आले. या परिषदेच्या आयोजन समितीमध्ये आनंदस्वामी, पंढरीनाथ पाटील यांचा प्रामुख्याने समावेश होतो. या परिषदेमध्ये स्वतःचे धार्मिक विधी स्वतः करतांनाच अस्पृश्य बांधवांना जाणवे घालण्याचे कार्य आनंदस्वामींनी केले. अस्पृश्यांना जाणवे घालणे हे त्या काळात समाज व्यवस्थेविरुध्द बंड पुकारण्यासारखेच होते.
जळगाव जामोद, मलकापूर, नांदुरा तालुक्यात अस्पृश्यता सुधारणेची चळवळ सुरू झाली होती. अनेक दलित पुढारी समाजाला एकसंघ करून त्यांची कर्मठ विचारसरणीतून सुटका व्हावी यासाठी प्रयत्नरत होते. या पुढा-यांनी एकत्र येत व-हाड मध्यप्रांतीय अस्पृश्य परिषद घेण्याचे ठरविले. दलित समाजात शिक्षणाचा प्रसार व्हावा, धार्मिक, सामाजिक व राजकीय बाबतीत जागृती उत्पन्न व्हावी, समाजास इतर समाजा बरोबरीचे सामाजिक हक्क मिळावे. कायदे कौन्सिलच्या निवडणूकीत समाजाला मतदानाचा अधिकार मिळवून एकसंघ करावे, या हेतूने परिषदांचे आयोजन होऊ लागले होते. यावेळी जळगाव तालुक्यातील 5, 000 लोक दि.1 जुन 1929 रोजी परधर्मात प्रवेश करणार होते. त्याचा पुर्नविचार करावा. या प्रमुख विषयांवर चर्चा करण्यासाठी पातुर्डा ता. जळगाव येथे दि. 29 व 30 में बुधवार व गुरुवार रोजी व-हाड प्रांतीय अस्पृश्य परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेचे प्रथम दिवसाचे अध्यक्ष दस्तुरखुद डॉ. बाबासाहेब आंबेडकर तर दुस-या दिवसाचे अध्यक्ष आनंदस्वामी होते. या परिषदेच्या पूर्वी जळगाव तालुक्यात सनातन्यांकडुन होत असलेल्या वागणुकीस कंटाळून महार बांधव दुसरा धर्म स्वीकारणार होते. तसे स्वतंत्र प्रसिध्दी पत्रक काढुन संपूर्ण व-हाड प्रांतात प्रसारीत करण्यात आले होते. जळगाव तालुक्यातील 5000 जनसमूह धर्म परिवर्तन करणार होता. या असंतोषाची जाणीव लक्षात घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर अस्पृश्य लढ्याला विधायक वळण देण्यासाठी पातर्डा येथे उपस्थित झाले होते. या परिषदेला संबोधीत करून धर्मातरणाच्या विचारावर पुर्नविचार करून तो पुढे ढकलावा असा निर्वाणीचा सल्ला त्यांनी उपस्थित जनसमुदायाला दिला. या परिषदेचे गणेश अक्काजी गवई (उपाध्यक्ष), उजाजी लुलाजी शेगोकार, बॅरिस्टर बागवे, अण्णासाहेब तिडके, नानासाहेब अमृतकर, अण्णासाहेब कोर्डे, बॅरिस्टर कायंदे. पंढरीनाथ पाटील आदी ब्राम्हणेतर पुढा-यांनाही देण्यात आले होते. या परिषदेच्या यशस्वीतेसाठी एस.जी. आगलावे, किसन दशरथ मकेसर, के.एस. पुनाजी जाधव,
एस.ए. खंडारे, नारायण हेमाजी भालेराव, नारायण तायडे, किसन भगवान शेगोकार, केशवराव रावजी इंगळे, गुणवंत अर्जुन इंगळे, पांडुरंग राघो इंगळे, पुर्णाजी वानखडे, रोडुजी आत्माराम टिटवीकर, आर.बी. इंगळे, मोतीराव जिराजी शेगोकार, केशवराव जानूजी खंडारे यांनी परिश्रम घेतले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीने बुलडाणा जिल्हयातील दलित चळचळ गतिमान होण्यास मदत झाली. याबरोबरच धर्मातर ही गरज असली तरी यांबाबत तातडीने निर्णय घेणे शक्य नाही हे बाबासाहेबांनी उपस्थित जनसमुदायाला सांगीतले. यावेळी
*बाबासाहेब आंबेडकर आपल्या भाषणात म्हणतात की*,
*भाषण* *-
विषय - अस्पृश्यांनी दिलेली धर्मातराची नोटीस
"विशेषतः या जिल्हयातील अस्पृश्य वर्गाच्या व ब्राम्हणेतर पुढा-यांनी मिळून अस्पृश्यता निवारणाचा आटोकाट प्रयत्न केला. परंतु त्यांना या कामी यश न येता उलट त्यांचा भिक्षुकशाहीकडून प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रीतीने अनेक प्रकारे छळ करण्यात येऊन त्यांची योग्य चळवळ हाणून पाडण्याचा कसून प्रयत्न करण्यात आला. पुढा-यांविषयी वृत्तपत्रात खोट्यानाट्या बातम्या प्रसिध्द करणे, अस्पृश्य वर्गात दुही उत्पन्न करणे, ब्राम्हण अधिका-यांकडुन त्यांचा छळ करणे, त्यांच्यावर बहिष्कार घालणे अशा त-हेचे निंद्य प्रकार त्यांनी सुरु करून ती चळवळ नेस्तनाबूद करून टाकण्याचा जणू विडाच उचलला आहे. या त्यांच्या अनन्वीत छळाला व लिलेला कंटाळून या जिल्हयाच्या काही भागातील हजारो अस्पृश्य बांधव धर्मातर करण्यास तयार झालेले आहेत व त्यांनी अशा प्रकारची नोटीस सुध्दा स्पृश्य वर्गाला उद्देशून दिलेली होती. परंतु या स्वार्थलोलुप अशा अंतःकरणाच्या भिक्षुकशाहीला याची काहीच कल्पना झाली नाही. शुध्दीवाले आणि हिंदुसभावाले यांना तर जणू काय या वार्तेचा गंधही नाही, हे दाखविण्याकरिता त्यांनी त्यांच्या दुःखाची थोडीदेखील पर्वा केली नाही.
या धर्मातराच्या बाबतीत आपल्या अस्पृश्य बंधुंचे मत काय आहे ते जाणून घेण्यासाठी जळगाव तालुक्यातील अस्पृश्य वर्गाच्या पुढा-यांनी ही परिषद बोलाविली होती. या परिषदेत पहिल्या दिवशी धर्मातर करण्याबद्दलच्या ठरावावर उहापोह झाला. त्यात सर्व बहिष्कृत समाज या ठरावाला अनुकूल आहे असेच दिसन आले. ब्राम्हणेतर पक्षाच्या पुढा-यांनी यावर जोरदार भाषणे करून ठरावाला अनुकूल अशीच मते दिली असे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी विचार व्यक्त केले.
डॉ. बाबासाहेबांच्या भाषणाने उपस्थित जनसमुदाय सुखावला. ख्रिश्चन किंवा मुस्लिम धर्मात प्रवेश करण्याची घाई न करता सर्वसमावेशक विचार करून धर्मांतर केले जाईल या भूमिकेवर डॉ. बाबासाहेब ठाम होते. पुढील काळात बाबासाहेबांनी जागतीक स्तरावर विश्वबंधुत्व आणि मानवतेचा संदेश देणा-या बौध्द धर्माला पसंती दिली. चातुर्वर्ण्य व्यवस्थे विरोधात आजीवन लढतांना त्यांनी मानवता तत्वाला धरून चालणा-या बौध्दधर्मात आपल्या असंख्य अनुयायासह दि. 14 ऑक्टोबर 1956 साली नागपूर येथे प्रवेश घेतला. या धर्मातरची पहिली पायरी म्हणून पातुर्डा येथील अस्पृश्य परिषद महत्वाची मानली जाते.
*पातुर्डा परिषदाची यशस्वीता व त्याचा परिणाम* -
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या समाज चिंतनातून मानवतावादी आदर्श समाजाचे प्रारूप उभे केले. भारतीय समाज व्यस्थेच्या परिवर्तनासाठी भारतातील जाती, जातीभेद निर्मूलन, अस्पृश्य, दलित, वंचितांच्या उध्दारासाठी त्यांनी कार्य केले. त्यांच्या समाज जातीभेदविरहीत चिंतनातून भारतीय समाजक्रांतीचा पथ दिपस्तंभासारखा उजळून गेला आहे. त्यामुळे बाबासाहेब आदर्श अशा भारतीय विश्वसमाजाच्या जडणघडणीचेही शिल्पकार आहेत. माणूस धर्मासाठी नसून मानवतेसाठी आहे. एकसंघ समाज निर्माण करण्यासाठी एकोणविसाव्या शतकापासून सुरु झालेल्या समाजसुधारणांचे कार्य अंतिम टप्प्यात बाबासाहेबांनी यशस्वी नेतृत्व केले. समाजात स्थिरता, जातीभेदविरहीत मनुष्य निर्माण करण्यासाठी त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राबरोबरच भारतातही विविध परिषदांचे, चळवळीचे नेतृत्व केले. पातुर्डा येथील परिषद ही विदर्भ प्रांतीय परिष्द असली तरी या परिषदेचे परिणाम संपूर्ण महाराष्ट्रात उमटले. चार्तुवर्ण्य व्यवस्थे विरोधारत धर्मपरिवर्तन हा एकमेव मार्ग आहे असा संदेश या परिषदेतून मिळाला. चवदार तळे सत्याग्रह, काळाराम मंदीर प्रवेश, अंबानगरी मंदिर प्रवेश, महाड, नाशिक, मुखेड पुणे यांसारख्या असंख्य ठिकाणी दलितांना, वंचितांना त्यांच्या न्यायहक्कासाठी सुरु केलेल्या चवळवळीमूळे असंख्य समाज बांधव बाबासाहेबांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहिला. स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर असलेला भारत तत्कालीन परिस्थितीमध्येही धार्मिक आणि जातीय गुलामगिरीने जोखडलेला होता. संविधान निर्मीते बाबासाहेबांनी या सर्व गोष्टींचा अथांग चित्तीने सतत चिंतन, मनन करून घटनात्मक तरतुदीच्या सहाय्याने सर्व वंचित घटकांना न्याय, स्वातंत्र, समता, बंधुता या तत्वांकडे नेण्याचे कार्य केले. वंचितांच्या उध्दारासाठी केलेल्या कार्यामुळे आज भारतात सर्व घटकांना न्यायीक समानतेने वागणूक दिली जाते. यांचे सर्वश्री श्रेय बाबासाहेबांनाच जाते.
.
*लेखक.*
*प्रा डॉ किशोर वानखेडे*
इतिहास अभ्यासक लेखक
खामगाव
7588565392

0 Comments