Subscribe Us

संशोधकाने घेतला भाषांतरातून इतिहासाचा शोध


 खामगावच्या संशोधकाने घेतला भाषांतरातून इतिहासाचा शोध

जागतिक अनुवाद दिनानिमित्त विशेष

खामगाव : भाषा ही केवळ संवादाचे साधन नसून ज्ञान, इतिहास आणि संस्कृती जोडणारा दुवा आहे. याची प्रचिती बाळापूरच्या इतिहासावर संशोधन करणाऱ्या डॉ. किशोर मारोतीराव वानखडे यांच्या कार्यातून येते. त्यांनी सन १६५० ते १९५० या कालखंडातील सूफी अवलियांच्या जीवनावरील संशोधन करताना अरबी, उर्दू व फारसी भाषांतील अनेक मौलिक दस्तऐवजांचा अभ्यास केला. रूहुल इनायत,बकिय ए इनायत, तजकेरा अवलिया दक्कन,इंकलावी किरदार छ्त्रपती शिवाजी महाराज, अवारीफुल मवूरिफ,किमया ए सादत , फालणामा वाजेफ,माजमोए कासएब,मजरुंनुर,गुलजार ए नक्षबंद,मंशुर कशिफ,ताजकेरा कार्याने हिंद, कलमात,नुरुल ताहीर,मासिरातुल उमरा,इंडो पर्शिया सारख्या अनेक ग्रंथाचे भाषांतर केले. यामुळे या दस्तऐवजांचा मराठी व हिंदी भाषांतर करून त्यांनी स्थानिक इतिहास समाजासमोर मांडला.

जागतिक अनुवाद दिनाच्या पार्श्वभूमीवर हे कार्य विशेष ठरते. कारण अनुवादामुळे स्थानिकांना परकीय भाषेतील ज्ञान सहज उपलब्ध झाले. धार्मिक, सामाजिक व ऐतिहासिक घटना अधिक समजण्यास मदत झाली. भूतकाळातील परंपरा, विचार आणि जीवनशैली आजच्या पिढीपर्यंत पोहोचली.

बाळापूरच्या ऐतिहासिक दस्तऐवजांमध्ये मोगल बादशहा औरंगजेबाने दिलेला जमीन अनुदानाचा हुकूम, शाही पत्रव्यवहार, राजकीय स्थित्यंतरणात सुफी संतांचे योगदानतसेच सूफी संतांची वचने यांचा समावेश होता. या सगळ्याचा अनुवाद केल्यामुळेच त्या काळातील सामाजिक-धार्मिक परिस्थितीवर प्रकाश पडला. अनुवाद ही केवळ भाषांतराची प्रक्रिया नसून ज्ञानाला नवी दारे उघडणारा पूल आहे. आज जागतिक अनुवाद दिन साजरा करताना बाळापूरसारख्या ऐतिहासीक शहरातील इतिहास प्रकाशात येण्यासाठी अनुवादाने निभावलेली भूमिका अधोरेखित करणे आवश्यक आहे.

------------

भाषा शिकताना आलेल्या अडचणी

अरबी, उर्दू आणि फारसी या तिन्ही भाषा आत्मसात करताना डॉ. वानखेडे यांना प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागले. सुरुवातीला लिपी ओळखणे आणि अक्षरांची रचना समजून घेणे कठीण गेले. जुन्या दस्तऐवजांमध्ये आढळणारे पारंपरिक शब्द, धार्मिक संज्ञा आणि शाही पदव्या यांचा अर्थ शोधण्यासाठी त्यांनी अनेक प्राचीन ग्रंथांचा आधार घेतला. फारसी भाषेतील काव्यात्मक आणि अलंकारिक शैली अनुवादताना मूळ आशय न गमावता सुस्पष्ट मांडणी करणे ही मोठी कसोटी ठरली. शिवाय, या भाषांचे मार्गदर्शन करणारे शिक्षक व अभ्याससामग्री मर्यादित असल्याने त्यांना स्वअभ्यासावर अवलंबून राहावे लागले. संशोधनासाठी लागणारा वेळ आणि आर्थिक खर्च हीसुद्धा त्यांच्या मार्गातील मोठी अडचण होती.

Post a Comment

0 Comments