Subscribe Us

छञपती शिवाजी महाराज आणि वऱ्हाड

 *छत्रपती शिवाजी महाराज आणि वऱ्हाड*




स्वधर्म, स्वराज्य, स्व अस्तित्वाची ज्योत मनात ठेवत छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात एका नव्या सत्ता केंद्राची मुहूर्तमेढ रोवली. मोघलांसारखा बलाढ्य शत्रू ,अहमदनगरचा निजामशहा, विजापूरचा आदिलशहा, गोवल कोंड्याचा कुतूबशहा ,इंग्रजांसारखा प्राश्चात्य शत्रू शिवराय विरोध होते.शिवरायांनी या शत्रूंशी यशस्वी झुंज देत महाराष्ट्राला पाखंडी गुलामीच्या साखळदंडा तून मुक्त केले .सह्याद्री ,तळ कोकण ते जिंजी पर्यंतच्या प्रदेशात रयतेचे कल्याणकारी राज्य स्थापन केले .दक्षिण भारतात महान राजा कृष्णदेवराय नंतर स्व.धर्मासाठी लढणारे सत्ता केंद्र स्थापले .या कार्यात स्वतःचे कर्तबगार नेतृत्व ,सहकार्यांवर विश्वास ,गुणांची योग्य पारख, दूरदृष्टी, नीती धैर्य, यामुळे इतर सरदारही स्वराज्यात दाखल झाले. सर्वांच्या मनात स्वराज्याची ज्योत पेटवली. त्यामुळे ज्या ज्या प्रांतात शिवरायांचा पदस्पर्श झाला तेथे स्वराज्य स्थापन झाले .आणि तो प्रदेश शिवतेजाने प्रभावित झाला आहे. आजच्या महाराष्ट्राच्या भौगोलिक रचनेनुसार सह्याद्री, कोकण प्रांत, मराठवाड्याचा काही भाग ,तथा खानदेश स्वराज्यात होता .या प्रदेशावर शिवरायांचे राज्य होते .याप्रमाणेच इतर भागातही छत्रपतींचा दरारा होता त्यांचे पदस्पर्शाने ही भूमी पावन झाली आहे या भूमीत वऱ्हाडच्या भूमीचाही समावेश होतो. 

    वऱ्हाड विदर्भ हा महाराष्ट्रातील उत्तर भाग असून प्राचीन काळापासून इतिहास प्रसिद्ध आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि वऱ्हाडचा फार जवळचा संबंध राहिला आहे .छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ यांचे जन्मस्थान बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा हे होते .तेथे त्यांचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी झाला . त्यांच्या वडिलांचे नाव लखोजी राजे जाधव तर आईचे नाव म्हाळसाबाई होते .वडील निजामशाहीत तथा मोगल दरबारातील 24000 मनसबदार होते. राष्ट्रमाता जिजाऊ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे मनी स्वराज्याची ज्योत बालपणीच पेटवली .छत्रपतींचे बालपण सिंदखेड राजा येथे काही काळ गेले. बालपणातच त्यांचा वऱ्हाडच्या भूमीशी जवळचा संबंध आला आहे .जसजसा काळ लोटत गेला तसतशी त्यांची स्वधर्म स्वराज्यासाठी लढण्याची वृत्ती वाढत गेली. अल्पावधीत लष्करी तथा सामाजिक बंड करताना स्वराज्य निर्माण झाले .एका जहागीरदाराच्या मुलाने स्थापलेले स्वराज्य शत्रूंच्या डोळ्यात खूपच होते त्यात मोगल हे प्रमुख होते .

      छत्रपतींचे राज्य गिळंकृत करावे यासाठी सम्राट औरंगजेबाने शाहिस्तेखानास वऱ्हाड,आणि स्वराज्यात पाठवले .तब्बल तीन वर्ष खान महाराष्ट्रात तळ ठोकून होता या काळात प्रजेचे अतोनात हाल झाले 

शिवरायांनी ही धैर्याने संकटाला तोंड देत शाहिस्तेखानाचा पुरता बीमोड केला. झालेली आर्थिक झीज भरून काढण्यासाठी मोगल साम्राज्यातील प्रसिद्ध सुरत शहर लुटले .परतीच्या प्रवासात छत्रपतींची काही सेना मलकापूर ,रोहिण खेड ,भोकरदन मार्गे पुण्यात पोहोचले. याबाबत रोहिन खेड किल्ल्या किल्ल्याबाबत अनेक कथा प्रचलित आहेत. सुरत शहराच्या दुसऱ्या लुटीनंतरही वऱ्हाडा तून छत्रपती शिवाजी महाराज गेल्याचा पुरावा वडनेर भोलजी तालुका मलकापूर येथील मंदिरात एका फलक लेखात वर्णन केला आहे .असाच संदर्भ निंबादेवी संस्थानातही आढळतो .

      शिवरायांचा पुरता बीमोड करावा यासाठी मिर्झाराजे जयसिंग दिलेरखाना सोबत महाराष्ट्रात आले. यावेळी प्रसिद्ध असा पुरंदर तह झाला तहानुसार आग्रा भेट घेण्यात आली परंतु आग्रा येथे शिवरायांना नजर कैदेत टाकले गेले यावेळी नीतीधार्याने आलेले संकट झेलत आपली व आपल्या सर्व सहकाऱ्यांची सही सलामत सुटका केली .साधूच्या वेशात देश भ्रमण करीत असताना छत्रपती शिवाजी महाराज बुलढाणा जिल्ह्यातील मैंलगड या किल्ल्यावर आले परंतु किल्ल्याचा किल्लेदार असलेल्या गोसावीला छत्रपती गडावर आल्याची बातमी समजली त्यांनी बक्षीसाच्या लालसेपोटी औरंगजेबाला ही बातमी देण्याचे ठरवले .तसा सैनिकांची वार्तालाप केला परंतु किल्लेदाराचा आणि सैनिकांचा वार्तालाप किल्लेदाराच्या पत्नीने ऐकला आणि शिवरायांना सावध करीत पुढच्या प्रवासात रवाना केले .तेथून छत्रपती शिवाजी महाराज कोणत्या मार्गाने गेले याचा संदर्भ मिळत नाही परंतु मैलगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज आले असल्याचे अनेक संदर्भ इतिहासात उपलब्ध आहेत आणि या मतास इतिहास संशोधकांनीही दुजोरा दिला आहे 

    पुरंदर तहात गेलेले किल्ले परत मिळवण्याची मोहीम छत्रपतींनी इसवीसन 1670 साली सुरू केली कोंढाणा घेत आपल्या विजयाची मुहूर्तमेढ पुनःच एकदा रोवली स्वराज्याचा विस्तार केला. इसवी सन 1666 ते 1670 या काळात झालेली प्रचंड आर्थिक हानी भरून काढण्यासाठी महाराजांनी वऱ्हाड तील प्रसिद्ध मोगली बाजारपेठ कारंजा शहर 3 ऑगस्ट 1670 रोजी लूटले लुटीनंतर ते बाळापूर येथे दाखल झाले बाळापूर हा सम्राट अकबरापासून मुघल साम्राज्याचा महत्त्वाचा परगाना होता तथा महत्त्वाचे आर्थिक केंद्र ही होते मुघलांना वऱ्हाड तून चार कोटी रुपयांपर्यंतचा महसूल मिळत होता त्यामुळे वऱ्हाड प्रांत हा आर्थिक बाबतीत सधन असाच होता बाळापुर येथेही छत्रपतींच्या सैन्याने लूट केली परंतु लूट करताना मन नदीच्या पूर्व किनाऱ्यावरील खान काहा मध्ये असलेल्या सुपी संतांची सैनिकांची भेट झाली खानकाह मध्येधसैनिक येताच येथील खानकाह चे प्रमुख सय्यद इनायत उल्ला नक्षबंदी या सुफी संतांनी आपल्या जवळील घोडा ,काही धान्य, वस्त्रे आणि इतर आध्यात्मिक साहित्य सैनिकांच्या सुपूर्द केले .हे साहित्य छत्रपतींसमोर ठेवण्यात आले .फकिराच्या दानशूर नीतीचे त्यांना आश्चर्य वाटले.यावेळी छत्रपतींनी सुफी संतांच्या कार्याची दखल घेत त्यांची भेट घेतली .8 ऑगस्ट 1670 रोजी ही भेट झाली .यावेळी सुफी संतांना गुरुस्थानी मानत त्यांच्या खानकाहाला मासिक 30 रुपये याप्रमाणे खानकाहास तंनखा लागू केला .ही रक्कम एक मे 1660 पर्यंत खानकास मिळत राहिली इसवी सन 1670 मधील एक रुपयाचे मूल्य एक मे 1960 साली 1428 रुपये झाले होते .या विषयावर डॉक्टर किशोर वानखेडे यांनी विदर्भातील सुफी संत या ग्रंथात प्रकाश टाकला आहे. त्यामुळे वऱ्हाडातील सुफी संतांबद्दल त्यांच्या कार्याबद्दल शिवरायांच्या मनात अपार आदर होता हे सिद्ध होते .

    आग्रा भेटीतील कलमानुसार संभाजी महाराजांना पाच हजारी मनसब आणि दोन सूभ्यांची जबाबदारी दिल्या गेली होती. हे दोन सुभे बाळापूर आणि आवंडे खोत या दोन सूभ्यांची जबाबदारी संभाजी महाराजांनी प्रतापराव गुजर यांच्यासोबत औरंगाबाद येथे राहत यशस्वीरित्या पेलली.अर्थातच छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचाही वऱ्हाड शी राजकीय हेतूने संबंध आला आहे 

   वैवाहिक जीवनातही छत्रपतींचा वर्हाड शी फार जवळचा संबंध येतो. वऱ्हाळातील बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यात करवंड नावाचे मध्ययुगीन काळातील प्रसिद्ध गाव आहे या गावाला 52 बुरुजी म्हणूनही ओळखले जाते .या गावात मातीची गडी असून ते प्रसिद्ध सरदार इंगळे यांच्या मालकीची आहे इंगळे घराणे हे पूर्वीपासून निजामशाही दरबारात सरदार म्हणून कार्यरत होते .छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची निर्मिती करीत असताना मातब्बर सरदारांशी त्यांच्या कुटुंबीयांशी वैवाहिक संबंध जोडले आणि ते जपले सुद्धा. येथील इंगळे घराण्यातील गुणवंतीबाई इंगळे यांच्याशी त्यांचा विवाह झाला होता. ह्या शिवरायांच्या सातव्या पत्नी होत्या. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज हे वऱ्हाडचे जावई सुद्धा ठरतात ही विदर्भवासियां साठी गौरवाची बाब आहे. याचप्रमाणे अनेक मातब्बर सरदारांना जाधव आणि इंगळे घराण्यातील मुली दिल्या गेल्या शिवरायांचे सावत्र बंधू व्यंकोजी राजे भोसले यांना दीपाबाई इंगळे ही करण्यात दिली होती व्यंकोजी राजांनी तंजावर येथे आपली स्वतंत्र जहागीर वडिलोपार्जित मिळवली कालांतराने करवंटचे इंगळे घराणेही तंजावरला स्थायिक झाले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या दक्षिण दिग्विजय यावेळी व्यंकोजी राजे आणि शिवाजी महाराज यांच्यात काही प्रमाणात मतभेद निर्माण झाला यावेळी दीपा बाईने शिष्टाईने आणि तेवढ्याच सामंजस्यातून तो यशस्वीरित्या निभावला आणि संबंध पूर्ववत केले त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज आपल्या स्वराज्याचा विस्तार तंजावर भागातही पोहोचवू शकले आणि त्यासाठी इंगळे सरदार यांनीही मोलाची भूमिका बजावली आहे .छत्रपती शिवाजी महाराजां प्रमाणेच छत्रपती राजाराम महाराज छत्रपती शाहू महाराज यांच्या कुलातही वंश तील मुली देत वैवाहिक संबंध जोपासले गेले आहेत. त्यामुळे वऱ्हाड आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा राजकीय, आर्थिक, सामाजिक तथा वैवाहिक संबंध राहिला आहे .आणि ही इतिहासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची बाब आहे 

   

संदर्भ ग्रंथ 


1. डॉक्टर किशोर वानखेडे विदर्भातील सुफी संत आधार प्रकाशन अमरावती वर्ष 2021 

2. विवेक चांदुरकर उध्वस्त वास्तू समृद्ध इतिहास मीडिया वाच प्रकाशन अमरावती वर्ष 2019

3. द . बा.महाजन सिंदखेडकर राजे जाधव रावांची बखर महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबई वर्ष 1968 

4.डॉक्टर किशोर वानखेडे विदर्भातील किल्ले आगामी प्रकाशित पुस्तक

 5. प्रोफेसर शहाज अली तारीख ये हिंद का इन्कलाबी किरदार छत्रपती शिवाजी महाराज उर्दू नांदेड 

6.हादी नक्शबंदी इनायत उर्दू बाळापुर 

7..विविध वृत्तपत्रीय लेख.





*लेखक*


डॉ किशोर वानखेडे


इतिहास संशोधक तथा अभ्यासक


Dream land City shelodi road Khamgaon


Mo.no.7588565392

Post a Comment

0 Comments