*गडकिल्ले सेवा संस्था(महाराष्ट्र राज्य)*
*आणि*
*सलग्न संस्था आयोजित*
*दुर्गमहर्षी प्रमोद मांडे पुरस्कार सोहळा*
*सन.२०२४/२५*
*दुर्गमहर्षी प्रमोद मांडे यांचा गडकिल्ले आणि क्रांतीकारकांच्या कार्याला जनसामान्यांपर्यंत पोहचविण्यात मोलाचा वाटा आहे.महाराष्ट्रासह भारतातील २५००हून अधिक किल्ल्यांचे इतिहासासह केलेले अचूक निरिक्षण आणि भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात आपल्या प्राणांची आहूती देणार्या ज्ञात अज्ञात क्रांतीकारकांच्या सचित्र माहितीचा समग्र इतिहास आपल्या पुस्तकातून मांडणारे प्रमोद मांडे हे एकमाद्वितिय अभ्यासक आहेत.चाळीसहून अधिक वर्षे या दोन्ही ही विषयांवर दुर्गमहर्षी प्रमोद मांडे यांनी केलेले विपुल अध्ययन,समिक्षण आणि मार्गदर्शन उभ्या महाराष्ट्राला ज्ञात आहे.*
*त्यांच्या या अतुलनिय कार्याची आठवण समाजमनात कायम आहे.वास्तव इतिहास संशोधन आणि अभ्यासात्मक विवरणाच्या दीर्घ प्रवासात प्रमोद मांडे यांनी महाराष्ट्राला अप्रकाशित स्वरूपातील माहिती जगापुढे आणली.*
*त्यांच्या या थोर कार्यापासून प्रेरणा मिळविण्यासाठी त्यांच्या पश्चात स्मृतिदिनानिमित्त गेली सात वर्षे अनुक्रमे 'दुर्गमहर्षी प्रमोद मांडे दुर्गपाईक पुरस्कार' व दुर्गमहर्षी प्रमोद मांडे क्रांतीपाईक पुरस्कार' देऊन या दोन्ही विषयांमधे कार्य करणार्या अभ्यासक आणि संशोधकांना पुरस्कृत केले जाते.*
*गडकिल्ल्यांच्या क्षेत्रात अव्याहतपणे कार्य करणारे जेष्ठ इतिहास अभ्यासक,लेखक,व्याख्याते आणि वनस्पती शास्र तज्ञ प्रा.प्र.के.घाणेकर यांना यंदाचा 'दुर्गमहर्षी प्रमोद मांडे पुरस्कार' देऊन तर विदर्भातील क्रांतीकारकांवर विपुल अभ्यास करणारे युवा अभ्यासक डाॅ.प्रा.किशोरजी वानखेडे यांना 'दुर्गमहर्षी प्रमोद मांडे क्रांतीपाईक पुरस्कार'देऊन सन्मानित करण्यात आले.*
*जेष्ठ इतिहास अभ्यासक,मोडी लिपी तज्ञ आणि भारत इतिहास संशोधन मंडळाचे सचिव श्री.पांडुरंगजी बलकवडे यांच्या शुभहस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.*
*यावेळी व्यासपीठावर डाॅ.केदार फाळके आणि भारत मांडे उपस्थित होते.*
*पुरस्काराला उत्तर देताना प्रा.प्र.के.घाणेकर यांनी प्रमोद मांडे हे माझे सहृदयी मित्र होते.अनेक गडकोट मोहिमांना आम्ही एकत्र गेल्याचे नमुद करताना मांडे यांचा ज्ञानाचा आवाका प्रचंड होता.क्रांतीकारकांवरील अभ्यासामधे त्यांची असामान्य पकड निर्विवाद होती.ते बोलायला लागले की आम्ही मंत्रमुग्ध होऊन ऐकत असू.त्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन हजारो तरूणांचे गडकिल्ले संवर्धनासाठी संघटन उभे राहिले.नेतृत्वक्षमता असलेला हा अभ्यासक सातत्याने तरूणांना इतिहासाप्रती जागरूक करत राहिला.आजवर माझ्याकडून इतिहासाची जी काही सेवा झाली आहे त्याबद्दल समाजात असलेला कृतज्ञताभाव या पुरस्कारातून झळकतो.त्यांच्या पश्चात त्यांच्या नावे दिला जाणारा पुरस्कार हा अधिकाधिक कार्य करत राहण्यासाठी प्रेरणा देणारा पुरस्कार आहे असे मत घाणेकरांनी व्यक्त केले.*
*क्रांतीपाईक पुरस्काराचे मानकरी डाॅ.प्रा.किशोर वानखेडे यांनी समग्र वैदर्भिय इतिहासाचा आढावाच आपल्या मनोगतामधे घेतला.*
*यावेळी व्याख्यानातून वऱ्हाड प्रांतात आदिमानव काळापासून आज पर्यंत झालेले राजकीय स्थित्यंतर,प्राचीन काळातील व्यापार,व्यापारी केंद्र,रामायण,महाभारत ग्रंथात आलेला विदर्भ चा उल्लेख, सम्राट अशोकाचे दक्षिण धोरण, भोन चा प्रसिद्ध स्तूप,सातवाहन,शुंग,वाकाटक,राष्ट्रकूट,चालुक्य,यादव,खिलजी,तुघलक*,
*बहामनी इमाद शाही ,निजाम शाही, मोगल,मराठे इंग्रज राज्य कर्त्यांकडे वऱ्हाड चे झालेले स्थित्यंतरन,येथील आर्थिक संपदा,कापूस,खनिजे, वन संपत्ती किल्ले,बारव,शिल्पे,मंदिरे,वीरगळ या सारख्या अनेकादी विषयांवर प्रकाश टाकला.स्वातंत्र्य लढ्यात वऱ्हाड चे योगदान,जंगल सत्याग्रह पिकेटिंग, सविनय कायदेभंग ते चलेजाव चळवळ सारख्या स्वातंत्र्य चळवळी,प्राचिन काळापासून विदर्भ हा कसा आणि किती महत्वाचा ठरला आहे याचे अनेक दाखले त्यांनी आपल्या वक्तव्यातून दिले.दुर्गमहर्षींच्या नावे दिला जाणारा पुरस्कार हा माझ्या संशोधन कार्यात मैलाचा दगड ठरावा इतका महत्वपूर्ण आहे.दुर्गमहर्षींचे कार्य अफाट आहे.त्यांच्या कार्याच्या कक्षा या भारतभर व्यापलेल्या असताना माझ्यासारख्या केवळ विदर्भावर केलेल्या सिमित कार्याची दखल पुरस्कारासाठी घेतली जावी याबद्दल त्यांनी हृदयपुर्वक धन्यवाद व्यक्त केले.*
*डाॅ.केदार फाळके यांनी आपल्या तडफदार वस्तव्यामधून इतिहासातील अनेक दाखले देत अभ्यासकांना योग्य दिशेने आपल्या अभ्यासाच्या वाटा निवडण्याचे तसेच अभ्यासातून नवनवे विचार पोहचविण्याचे संकेत दिले.*
*अध्यक्षिय भाषणात जेष्ठ इतिहास अभ्यासक श्री.पांडुरंगजी बलकवडे यांनी दुर्गमहर्षींच्या सहवासातील अनेक आठवणींना उजाळा दिला.मांडे हे भारत इतिहास संशोधन मंडळाचे आजीव सदस्य होते.इतिहासाचे अध्ययन हा आमच्यातील मैत्रीचा दुवा जरी असला तरी प्रमोद मांडे हे इतिहासाच्या पाऊलखुणा शोधत त्याची वास्तवाशी सांगड घालत या सह्याद्रीत फिरणारा जिज्ञासू तर मी वस्तुनिष्ठ कागदपत्रांच्या,इतिहासांच्या साधनांमधे बुडून जाणारा असल्याने आम्ही दोघेही आपआपल्या परिने इतिहासाची सेवा करत राहिलो.*
*प्रमोद मांडे यांची भाषेवरील पकड असामान्य होती.त्यांच्या भाषणात समोरच्यांना मंत्रमुग्ध करण्याचं सामर्थ्य होतं.त्यांनी सबंध भारतील किल्ल्यांची अभ्यासपुर्ण भटकंती केली.त्यांचं हे कार्य निर्विवादपणे पुढील अभ्यासकांना दिशादर्शक ठरणार आहे.*
*यावेळी गडकिल्ले सेवा संस्थेने भारत इतिहास संशोधन मंडळाच्या नव्याने पुनर्विकसित होत असलेल्या वि.का.राजवाडे सभागृहात पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे,शिवभूषण निनादजी बेडेकर आणि दुर्गमहर्षी प्रमोद मांडे या तीनही असामान्य प्रतिभेच्या तपस्वींची तैलचित्रे लावून त्यांचा सन्मान करावा असे पत्र देण्यात आले असता.श्री.पांडुरंगजी बलकवडे यांनी या विषयावर मंडळात देखील हा निर्णय झाला असून सभागृहात या तीनही प्रतिमा लावण्यात येतील असे गोरवोद्गार काढले.*
*कार्यक्रमाचे प्रास्ताविक इतिहास अभ्यासक निलेश गावडे यांनी केले.सुत्रसंचलनाची जबाबदारी श्री.संतोष घुले यांनी योग्य रित्या पार पाडली तर सौरभ मोडक यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.पुरस्कार प्रदान सोहळा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गडकिल्ले सेवा संस्था आणि दुर्गमहर्षी प्रमोद मांडे यांनी निर्माण केलेल्या अनेक संस्थांच्या प्रतिनिधींनी परिश्रम घेतले.*
दुर्गमहर्षी
0 Comments