*“छत्रपती राजर्षी शाहू महाराज आणि अहमदनगरचा शैक्षणिक वारसा ”* -
महाराष्ट्र म्हटलं की, सर्वात आधी आठवतो तो छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास. जो तुम्हाला आम्हाला खुप जवळचा वाटतोय. दिल्लीचा मुघल बादशहा, विजापूरचा आदिलशहा,गोव्याचा फिरंगी गोरंदोर, जंजिऱ्याचा सिद्दी आणि गोदावरी- वर्धा च्या दुआबावरचा कुतुबशाह या सर्वांनी महाराष्ट्राच्या नंदनवनाचं रणांगण बनवून टाकलं त्या आर्त किंकाळ्यांनी दाहीही दिशा कोंदविल्या. या अवघ्या राजवटींनी मोठा संहार मांडला. निष्पाप माणसांचा खाटीकखाना सुरू केला. सुंदर देव-देवतांच्या मूर्तींच्या ठिकऱ्या केल्या. आणि तिथंच रचल्या. गो-मासांच्या मेजवान्या झडु लागल्या. तरुण लेकी-सुनांची अब्रु धाय मोकलून रडू लागली. अखेर आदिशक्ती तुळजाभवानी पेटून उठली. आणि तिनं महाराष्ट्राच्या गिरीकंदावर जिजाऊंच्या पोटी महाराष्ट्राचा लाडका शिवबा जन्माला घातला. पुढं तेच शिवराय छत्रपती जाहले.
त्यामुळं इथला इतिहास तसा उज्ज्वल झालाय. भोसले राजघराणं इतिहासात कायमचचं अजरामर झालंय. याच भोसले कुळातले आर्दश राज्यकर्ते म्हणून लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांना जगभर ओळखलं जातंय. ते मोफत सक्तीचं शिक्षण,वसतिगृह संकल्पनेचे जनक, आरक्षण आदी लोककल्याणकारी कामासाठीच. छत्रपती शाहू राजांची शिक्षण विषयक मोहीम ही राजर्षी शाहू महाराजांच्या जीवनाचा स्थायीभाव शिक्षण प्रसार हा असलेला दिसतोय.पितृऋण फेडण्याच्यानिमित्तानं राजर्षी शाहू महाराजांचा अहमदनगरशी संबंध आलेला आढळतो. पंच शताब्दीचा वैभवशाली वारसा असणारंआपलं ऐतिहासिक अहमदनगर. हे अहमदनगर शाहू राजांना चांगलच भावलय. अहमदनगरच्या शैक्षणिक जडण घडणीत शाहू राजाचं मोठं योगदान असल्याचा इतिहास आहे. इतकचं नव्हे तर राजर्षी शाहू महाराजांनी दिली अहमदनगरच्या शैक्षणिक वारश्याला मोठी चालना.
मग कोल्हापुरच्या छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी अहमदनगरचा शैक्षणिक वारसा कसा नि मार्ण केलाय असा प्रश्न आपल्या मनात आला असेल. त्यासाठी आपल्याला राजर्षी शाहू महाराजंचं शैक्षणिक कार्य आणि त्यांचं शैक्षणिक तत्वज्ञान समजायल हवं.
“समतेवर आधारित समाज व्यवस्था निर्माण झाली पाहिजे. त्याच्या निर्मितीसाठी शिक्षण प्रसार आवश्यक आहे. शिक्षणाशिवाय कोणत्याही देशाची उन्नती झाली नाही असे इतिहास सांगतो. अज्ञानात बुडून गेलेल्या देशात मुत्सद्दी आणि लढावय्ये वीर कधीही निपजणार नाहीत. म्हणूनच सक्तीचं आणि मोफत शिक्षण याची हिंदुस्थानाला अत्यंत आवश्यकता आहे”.
हे राजर्षी शाहू महाराजांचं शैक्षणिक तत्त्वज्ञान होतं. आणि त्याच्या प्राप्तीसाठी आपल्या राज्यात शैक्षणिक धोरण आखलं. शिक्षणानेच आमचा तरणोपाय आहे; असं त्यांचं ठाम मत होतं.शिक्षणाबाबत शाहू राजांनं मांडलेला विचार त्यांच्या शैक्षणिक धोरणावर प्रकाश टाकतोय. अहमदनगरमध्ये शाहू राजाचं जे शैक्षणिक कार्य सूरू झालं. त्याच प्र्तिबिंब शाहू राजांच्या शैक्षणिक चतु:सूत्रीमध्ये दडलेलं सापडतयं.
मग शाहू राजांची शैक्षणिक चतु:सूत्री काय होती. राजर्षी शाहू महाराजांचा शैक्षणिक विचार ज्या चार पायावर उभा होता.त्या चतु:सूत्रीचा शोघ घेतला असता. शाहू राजांच्यचा दूरदृष्टी
ची स्पष्ट कल्पना येते. मग त्यांना द्रष्टा महापुरूष का म्हटलं जातं. हे ही पटतंय.
राजर्षी शाहू महाराजांची शैक्षणिक चतु:सूत्रीमधले पहिलं सुत्र म्हणजे समाजात प्राथमिक शिक्षण प्रथम सर्वांना उपलब्ध करून देणं मग दुय्यम आणि शेवटी उच्च शिक्षणाची सोय करणं, दुसरं सुत्र समाजातल्या प्रतिकूल परिस्थितील्या घटकांना शिक्षणाच्या सोयी-सवलती विशेष बाब म्हणून उपलब्ध करून देणं.
या चतु:सूत्रीमधलं तिसरं आणि आपल्या अहमदनगरच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचं ठरललं सुत्र म्हणजे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरात येऊन अल्पखर्चात शिक्षण घेता यावे म्हणून शहरात सर्व जमातींसाठी वस्तीगृहे सुरू करणं.
चौथं सुत्र असं होतं की, प्रथमच शिकून तयार झालेल्यांचा शिक्षणावरील विश्वास दृढ व्हावा म्हणून त्यांच्यासाठी रोजगाराची सोय करणं. त्यांच्यासाठी नोकऱ्यात राखीव जागा ठेवणं. लोकांच्या बुद्धीवर आणि ज्ञानावर जड आणि जुलमी “जु” लादलं गेलंय. ते जुगारून देण्याची शक्ती बहुजन समाजाचे अंगी येण्यास सक्तीच्या व मोफत प्राथमिक शिक्षणाची फार जरुरी आहे .शाहू राजानं आपल्या काल्हापूर राज्यात प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत करण्याची घोषणा केली. केवळ घोषणा करून राजे थांबले नाहीत. तर तसे प्रयत्न चालू केले. विसाव्या शतकाच्या सुरूवातीला कोल्हापूर संस्थानातील शाळांची संख्या आडीशे होती ती विसाव्या शतकाच्या तिसऱ्या दशकात म्हणजेच शाहू छत्रपतींच्या आखरीच्या दिवसात साडेपाचशेच्यावर गेली.
एकोणीसाव्या शतकाच्या शेवटच्या दशकात कोल्हापूर संस्थानात जवळपासू नव्वद विद्यार्थी शिक्षण घेत होते तर विसाव्या शतकाच्या तिसऱ्या दशकात ही संख्या 21 हजारापर्यंत वाढली. महाविद्यालय शिक्षण घेणाऱ्यांची संख्या नव्वदवरून साडेतीनशे पर्यंत गेली.
“थोडक्यात सागायचं म्हणजे शाहू छत्रपतींनी शाळा किती सुरू केल्या. आणि शिक्षणावर किती खर्च केला. यापेक्षा आपल्या नव्या शिक्षण प्रयोगानं महार, मांग, चांभार, फासेपारधी इत्यादी असंख्य दलित पीडितांच्या मनात समता, स्वातंत्र्य आणि स्वाभिमानी यांचे जे आत्मभान प्रयोजित केलं ते अधिक महत्त्वाचं मानलं पाहिजेत. त्यासाठी शाहू महाराज यांनी आपल्या राज्यात शैक्षणिक संस्थाचं जाळं विनलं. त्यांना वारंवारं भेटी दिल्या.
छत्रपतींच्या या शैक्षणिक कार्याचा वारसा महाराष्ट्रात अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज यांनी अभिमानपूर्वक जतन करून समर्थपणे पुढे नेला.
शाहू महाराजांनां लोकराजा म्हटलं जातं. शाहू राजानं लोककल्याणाचा विचार दिलाय.त्यासाठी विविध मार्ग त्यांनी सुचविले आणि त्यावर स्वत:च्या देखरेखीखाली अंमलबजावणी करण्याचे आदेश दिलेत. लोकशिक्षणाचा त्यांनी नेहमीच आग्रह धरलाय.नुसताच आग्रह नव्हे तर त्यासाठी मोठी आर्थिक तरतुद राज्याच्या तिजोरीतून केली.
आज अहमदनगर जिल्हातलं शिक्षण क्षेत्र मोठं पुढारलेलं दिसलंय.त्यामागं देखील छत्रपती शाहू महाराजांची प्रेरणा असल्याचा इतिहास आहे. तो कसा. तर त्यासाठी शाहू महाराजांच्या पुर्वाष्यात थोडं डोकावं लागेल.
आपण सर्वांनीच अहमदनगरच्या लाल टाकी परिसरातील हुतात्मा करवीर छत्रपती चौथे शिवाजी महाराज याचं स्मारक पाहिलंय. तिथं घडीव दगडात एक छोटीसी पंरतु अत्यंत सुंदर पध्दतीनं बांधलेली छत्री दिसती. तीच करवीर छत्रपती चौथ्या शिवाजी महाराजांची समाधी.
तुम्ही म्हणाल या छत्रपतींचा आणि लोकराजा शाहू महाराजांचा काय संबंध असेल बरं. तर करवीर छत्रपती चौथे शिवाजी महाराज यांचा अत्यंत निर्घुण खून झाला.तो अहमदनगरच्या भुईकोट किल्ल्यात. त्या दिवसी नाताळ होता. आणि साल होतं 1883 चं.
पुढं महाराजांच्या महाराणी आनंदीबाईसाहेबांनी घाटगे यांच्या कुटुंबातनं यशवंत बाबासाहेब नावाच्या मुलाला दत्तक घेतलं. आणि त्यांच नाव ठेवलं शाहू महाराज. तेच आपले राजर्षी शाहू महाराज. शाहू महाराजांचा राज्याभिषेक झाला तो दिवस होता 2 एप्रिल 1894.
शाहू महाराज कर्ते झाल्यावर त्यांनी आपल्या वडिलांचं म्हणजेच करवीर छत्रपती चौथे शिवाजी महाराजांचं पितृऋण फेडले. याबाबतीत “ राजर्षी शाहू महाराज आणि माणुस ” या ग्रंथाचे कर्ते कृ. गो. सूर्यवंशी असं मत नोंदवतात की , “ दिवंगत चौथे शिवाजी महाराज यांच्या स्मारकाच्या कल्पनेपासून शाहू महाराज अलिप्त राहीले. परंतु शाहू कर्ते झाल्यावर त्यांनी लागलीच पितृऋण फेडले.
पितृऋण फेडतांना सुध्दा लोकाराजा शाहू महाराजांची सामाजिक सुधारणेची प्रवृती दिसते. जसं शाहू महाराजांना समजलं की, अहमदनगरला आपल्या दत्तक पित्याचा इंग्रजांनी कट कारस्थाने रचून घातपात केला.त्याच वेळी ते आपल्या निवडक विश्वासू सहकार्यासह अहमदनगरला आले. ज्या जागेवर करवीर छत्रपती चौथ्या शिवाजी महाराजांना अंत्यसंस्कार झालेला तिथं त्यांना आणण्यात आलं.
त्यावेळी दिल्लीगेटच्या बाहेरचा भाग फारसा रहदारीचा नव्हता. लालटाकी परीसराकडं दिवसा येण्याची कोणाची हिंमत होत नसायची. सिध्दीबागेच्या पुढं फारस कोणी जात नसे. अशा विराण आणि निर्जन ठिकाणी शाहू महाराज आपल्या पित्याच्या ओढीने तिकडं निघाले. रस्ता अत्यंत उजाड,निर्जन,काटेकुटे आणि निवडूंगाच्या काटेरी बनातून,ओढया नाल्यातून मार्ग काढत ऐकदाचे ते सर्वजण समाधीस्थळी पोहचले.
शाहू महाराजांनी मोठया भक्ती भावानं,श्रध्दापुर्वक आणि जड अंत:करणानं समाधीचं दर्शन घेतलं.आणि त्यांच्या मनात एक विचार आला. इथं आपल्या वडिलांची चिंरतनस्मृति राहण्यासाठी काय करता येईल बरं. त्याटायमला समाधी परिसरात मोठी शेती क्षेत्र होतं. चोहीकडं गवत आणि घनदाट झाडी दिसायची, त्यात दूरवर भर उन्हात राबणारी माणसं दिसत.
त्या समाधीस्थळावर शाहू महाराज व सर्व सहाकारी थाबंले असतांना ते विचारात पार गढून गेलेले दिसले. त्यांच्या मनात विचाराचं चक्र जोरानं फिरत होतं.ढोरागत राबणारी ती मानसं महाराजाच्या डोळयापुढं वारंवार येत असायची…त्यावेळी त्यांना अचानक आठवलं की, शिक्षण ही सर्व सुधारणांची गु्रूकिल्ले आहे. हे महाराजांच्या ध्यानात आले होत
शतकानुशतकं अज्ञानाच्या गर्तेत पडलेल्या वा अज्ञानी व दीनदुबळया जनतेला शिक्षण दिलं तर आपल्या राज्यातील प्रजाजनांना किमान प्राथमिक शिक्षण तरी मिळालं पाहिजेत. या एकाच ध्येसातून त्यांनी आपल्या राज्यात मोफत व सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा कायदा केलेला.
शाहू महाराजांनी आपल्या सोबतच्या स्थानिक लोकांना या ठिकाणच्या शिक्षणाबाबत विचारलं…तर “ गावात शिक्षणांची सोय हाय पण गोरगरीबसांठी कसलं शिक्षाण.त्यांच्या नशिबी ढोरागत राबणं एवढच हाय महाराज”….महाराजांना आठवलं की, आपल्या प्रयत्नांनं करवीर नगरीत शिक्षण प्रसाराच्या खटपटीमुळं बहुजन समाजातले मुलं शिक्षण घेउ लागलीत.
सन 1901 ते 1922 या 22 वर्षाच्या काळात भिन्नभिन्न जातीची तेवीस वसतिगृहे राजर्षी शाहू महाराजांनी सुरू केलेले. आणि त्या त्या जातीच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला मोलाची मदत केली. जातवार ही वसतिगृहे काढल्यामुळं जाती-जातीमध्ये भेद वाढविण्यास कारणीभूत झाले आणि त्यामुळे जातीयता पोचली गेली असं शाहू राजांच्या टीका करांना वाटतंय.
ते टीकाकार वस्तुस्थितीची पुरेशी माहिती न घेता विपर्यास करत असत. कारण सुरुवातीस सर्व जातींना खुलं असं विद्यार्थी वस्तीगृह काढल्यानं ते केवळ उच्च जातीच्याच विद्यार्थ्यांचं कसं झालं? हा कटू अनुभव घेतल्यावर शाहू छत्रपतींनी जातवार विद्यार्थी वस्तीगृहांचा निर्णय घेतला. आणि तो प्रत्यक्षात राबविला त्याचाच एक भाग म्हणजे हुतात्मा करवीर छत्रपती चौथे शिवाजी महाराज मराठा बोर्डिंग हाऊस.
हायस्कुल किंवा कॉलेजचं पुढंच शिक्षण घेणं खेडयातल्या बहुजन समाजातल्या मुलांना अशक्य होतं. त्यावर महाराजांनी समाजतील प्रत्येक जातीच्या मुलांसाठी वेगळी वसतिगृह काढून त्यांच्या राहण्या जेवणाची सोय केलेली होती. मराठा,जैन,लिंगायत,सारस्वत, मुस्लिम, दैवज्ञ, सूतार,महार,मांग,चांभार,ढोर या अशा सर्व जातीसाठी स्वतंत्र वसतिगृह स्थापन केल्याचं त्यांना चांगलंच स्मरत होतं.
शाहू महाराजांनी अहमदनगरच्या या पहिल्या भेटीतच येथील जुन्या जाणत्या प्रतिष्ठातांबरोबर वसतिगृहाच्या स्थापने बाबत चर्चा केली. त्यावेळी त्यांच्या बरोबर रावबहादूर नवले, श्री काळे, सरदार विराज थोरात आदी शिक्षण प्रेमी मंडळी उपस्थित होती. ही महाराजांची बहुजन शिक्षणा विषयाची तळमळ सगळयांना खूपच पंसत पडली….
आपले वडिल करवीर छत्रपती चौथे शिवाजी महाराज यांची दिर्घ आठवण राहण्यासाठी त्यांच्या नावे इथं एक विद्यार्थी वसतिगृह उभारण्याच्या कल्पनेस शाहू महाराजांनी चालना दिली. त्यातूनच अहमदनगर इथं “श्री करवीर छत्रपती चौथे शिवाजी मराठा बोर्डिंग हाउसची” स्थापना केली.
कोल्हापुर राज्याबाहेरील इतर वसतिगृहानांसुध्दा दरबाराकडून देणग्या मिळून गेल्या. कोल्हापुरात 1901 ते 1921 पर्यंत एकूण 22 वस्तीग्रह स्थापन केली.. तीन शिक्षण तज्ञ फुले शाहू आंबेडकर या ग्रंथात डॉक्टर भालबा विभुते अहमदनगरला राजर्षी शाहू महाराजांच्या प्रयत्नातून सुरू झालेल्या शैक्षणिक संस्थेचे नाव ‘ शिवाजी फोर्थ स्टुडंट्स होस्टेल अहमदनगर असं देतात. याच ग्रंथात भालबा विभुते शिवाजी फोर्थ स्टुडंट्स हॉस्टेल अहमदनगर या शैक्षणिक संस्थेस भरघोस आर्थिक सहाय्य केले असल्याचे नमूद करतात.शिक्षणाचा नंदादीप लाऊनी,कर्मवीर जोतिरावांची पताका घेऊनी ,ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कारित ... अहमदनगरास उजळले स्वकर्तुत्वानी.
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी आपले दत्त्क वडील चौथे शिवाजी महाराज यांची स्मृती चिरंतन राहावी. त्यांच्या आठवणींना उजाळा मिळावा. यासाठी अहमदनगरला भेट दिली. आणि त्या ठिकाणी विजयी दशमीच्या मुहूर्तावर श्री करवीर छत्रपती चौथे शिवाजी महाराज मराठा बोर्डिंग हाऊस अहमदनगर या नावे सन 1914 रोजी संस्थेची स्थापना केली.
राजर्षी शाहू महाराजांनी या संस्थेला दोन वेळा भेट दिली. संस्थेच्या कार्याला मदत म्हणून काही रक्कम सतत 15 वर्षे दिली. छत्रपती शाहू महाराज यांचं शैक्षणिक कार्य मोठं महत्वपूर्ण होतं. बहूजनाना आपल्या पायावर उभं करणारं होतं. त्यांना माणूस म्हणून ओळख देणारं होतं. अहमदनगर जिल्ह्यातील अनेक पिढ्यांना माणूस म्हणून उभे करणारं असायचं.
एक समाजाभिमुख शिक्षण संरचना उभी करण्याचा माणूस मराठा बोर्डिंग व संस्था स्थापनेच्या मुळाशी आहे. राजर्षी शाहू महाराजांच्या प्रेरणेनं अवघ्या अहमदनगर जिल्ह्याभर गावोगाव शाळा निघू लागल्या. पुढं अनेक महाविद्यालयांच्या रूपानं या शैक्षणिक चळवळीनं अहमदनगर जिल्ह्यात नवचैतन्य निर्माण केलं. जणू काही ज्ञानाचे दरवाजे सर्वांसाठी खुले झाले. गोरगरीबांच्या झोपडीपर्यांत ही ज्ञान गंगा पोहचली.
अहमदनगर इथं राजर्षी शाहू राजांनी सुरू केलेल्या वस्तीगृहापासून ते आजपर्यंत अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज या संस्थेचा वटवृक्ष झालाय. हा शैक्षणि क वारसा फार महत्वाचा वाटतोय. या वाटचालीत छत्रपती शाहू महाराज या नेतृत्वाचा सृजनशील अविष्कार शैक्षणिक संस्थांच्या रूपाने अहमदनगर जिल्ह्यात पहावयाला मिळतो.
अहमदनगर शहरातल्या नालेगावातील देशपांडे यांच्याजागेत श्री करवीर छत्रपती चौथे शिवाजी मराठा बोर्डिंग हाउस सुरु झाली. अन बहुजनाच्या शिक्षणाचा श्री गणेशा झाला. पुढं पुन्हा एकदा शाहू महाराजांनी या विद्वार्थी वसतिगृहास समक्ष भेट दिली. त्यावेळी वसतिगृहाचं कामकाज पाहिलं. तसेच इथं उपस्थित मुलांशी संवाद साधला.
श्री करवीर छत्रपती चौथे शिवाजी मराठा बोर्डिंग हाउसचं कामकाज मनापासून लोक करत आहेत. त्यांनाही बहुजन शिक्षणांच महत्व पटलंय. हे महाराजांना जाणवलं. त्यांनी याकामकाजावर प्रसन्न होवून त्याचवेळी यासंस्थेला प्रेरणा देण्यासाठी मोठी रक्कम देणगी म्हणून दिली.
तेंव्हा श्री करवीर छत्रपती चौथे शिवाजी मराठा बोर्डिंग हाउसचे संस्था चालक सरदार विराज थोरात,रावबहादूर नवले आदी मंडळींनी त्यांचं स्वागत केलं. त्यावेळी शाहू महाराजांनी वसतिगृहांच्या संचालकांनी आपल्यापुढं विद्वार्थ्यांची निवास आणि भोजनाची सोय करणं इतकच संकुचित धोरण ठेवू नये.
विद्वार्थ्यांचा नैतिक विकास कसा होईल, यासाठी अमाप कष्ट उपासावेत, अशी अपेक्षा या भेटीच्या वेळी शाहू महाराजांनी व्यक्त केलेली होती.
लोकराजा शाहू महाराजांनी अहमदनगर शहरातल्या त्यावेळच्या शिक्षण प्रेमी आणि पुढा-यांशी चर्चा केली. करविर छत्रपती चौथ्या शिवाजी महाराजांवर ज्या जागेवर अंत्यविधी झाला. ती जागा विकत घेतली. याच जागेवर विद्वार्थ्यांसाठी वसतिगृह त्यावेळी अहमदनगर जिल्हयातील ग्रामिण भागातले गरीब, होतकरू आणि गरजू विद्वार्थ्यांना हे वसतिगृह मोठा आधार वाटायचं.त्या शेकडो मुलाचं शिक्षण या वसतिगृहामुळं पुर्णत्वास गेलयं.
वस्तीगृह स्थापना हा शिक्षण क्षेत्रातील एक अभिनव उपक्रम होता. मुंबई इलाख्यात किंबहुना अवघ्या हिंदुस्थानात त्याकाळी विद्यार्थ्यांसाठी एकही वस्तीगृह स्थापन झालेलं नव्हतं. एखाद्या जातीनं-जमातीनं अथवा धर्मानं चालविलेलं वस्तीगृह कुठेही नव्हतं.
विद्यार्थी वस्तीगृहाची विशेषत: निवासी भोजनाधी सोयींनी युक्त असलेली. निरनिराळया जातींची अलग अलग वस्तीगृहे स्थापन करण्याची अद्भुत कल्पना राजर्षी शाहू महाराजांना स्फुरली हे विशेष.
आज हे वसतिगृह अहमदनगर जिल्हा मराठा विदया प्रसारक समाज या शिक्षण संस्थेचं बीजेरोपण ठरलं. सरदार शिवराम थोरात, नामदेव नवले, कृष्णाजी काळे, वामनराव तोडमल यांच्यासारख्या शैक्षणिक कार्यकर्त्यांची शाहू महाराजांनी केलेली पारख किती अचूक होती याची प्रचिती एकाच वर्षात आली.
मराठा शिक्षण परिषद अहमदनगरच्या मंडळींनी वसतिगृहाच्या यजमानपणा खालीच भरवली. सन 1918ला अहमदनगरला मराठा शिक्षण परिषद भरली. या परिषदेत अहमदनगर जिल्हा मराठा विद्वया प्रसारक समाज या संस्थेच्या उभारणीबाबत विचार विनीमय झाला.
आणि त्यातुनच अहमदनगर जिल्हा मराठा विदया प्रसारक समाज या शिक्षण संस्थेची स्थापना सन 1918 मध्ये झाली. या संस्थेच्या स्थापनेमागं लोकराजा राजर्षी शाहू महाराजांची प्रेरणा होती.
26 एप्रिल 1921 रोजी मराठा विदया प्रसारक या संस्थेकडं याच कारणासाठी शाहू महाराजांनी एक हजार रुपये व सचिव श्री नवले यांचेकडं पाचशे रुपये पाठवले. अहमदनगरच्या शिक्षण क्षेत्राला लाभलेला हा राजाश्रय त्यावेळी फार मोलाचा ठरला. त्यावेळची ही रोख रक्कम सध्या आपल्याला खूपच कमी वाटत असली तरी त्याच त्यावेळचं मोल करता येणार नाही.
पुढं आठ महिन्यांनी म्हणजे 19 डिसेंबर 1921 रोजी छत्रपती चौथ्या शिवाजी महाराज मराठा वसतिगृहास दरसाल एक हजार रूपये याप्रमाणं सतत पंधरा वर्ष अनुदान देण्याचं करवीर राज दरबारानं मान्य केलं.
अहमदनगर जिल्हा मराठा विदया प्रसारक समजा अहमदनगर या संस्थेच्या मुळाशी छत्रपती शाहू महारांजांची प्रेरणा असल्यानं संस्थाने अहमदनगरच्या शैक्षिण विश्वास वाहून घेतलं. सुपर्ण जिल्हाभर बहुजन समाजात शिक्षणाबाबत जागृती केली.
त्यांना शिक्षण घेण्यास प्रवृत केलं. त्यासाठी गावेागावी शेकडो शाळा,महाविदयालयाची स्थापना केली. या शिवाय अभियांत्रकी,संगणक या सारख्या आधूनिक प्रवाहाचां विचार केलाय.
संस्थनं बहुजन मुलांच्या शैक्षिणक विकासासाठी बहुमजली टोलेजंग इमारती उभ्या केल्यात. अन ती मुलं जगाच्या बाजारात कोठेही कमी पडणार नाही याबाबतीत दक्षता घेतली.
संस्थेनं न्यू आटर्स,कॉमर्स व विज्ञान महाविदयालय अहमदनगर या सारखी अव्व्ल दर्जाची महाविदयालय उभारून संपुर्ण राज्यात पथदर्शक आदर्श घालून दिलाय. यामागं सुध्दा शाहू महाराजांची प्रेरणा असल्याचं प्राजंळ मत संस्थाचालक व्यक्त करतात…
अहमदनगरकरांनीसुध्दा राजर्षी शाहू महाराजाची ही प्रेरणा सारखी तेवत ठेवण्यासाठी न्यू आटर्स कॉलेज अहमदनगरच्या प्रागंणात मोठा अर्धकृती अकर्षक पुतळा बसवलाय. तसेच लोकराजा राजर्षी शाहू महाराजांच्या नावानं शाही आणि आलिशान असं सर्व सोयीनी सुसज्ज असं वातानुकुलीत आधुनिक सभागृह उभारलंय.
त्याची बैठक क्षमतासुध्दा मोठी आहे. असं भव्यदिव्य सभागृह जिल्हयात एकाही शैक्षणि क संकुलाकडं सापडणारं नाही. आणि त्यास छत्रपती शाहू महाराज सभागृह असं साजसं नाव दिलय..
तर हिमालयाची उंची आणि गंगाजलाच पावित्र्य यांचं एकत्र दर्शन देणाऱ्या महान विभूती याच मातीत जन्मल्या. त्यापैकी एक म्हणजे ज्यानां महाराष्ट्राचं मानचिन्हं म्हणून ओळखलं जातं ते म्हणजे लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज. त्यांच्या जयंती निमित्तानं विनम्र अभिवादन!... © *प्रा.डॉ. नवनाथ काशिनाथ वाव्हळ
0 Comments