Subscribe Us

राजर्षी शाहू महाराज जयंती


 वा. द. तोफखाने रोल्स राॅइस घेण्यासाठी महाराजांच्या खुप मागे लागलेले होते. त्यावर महाराज म्हणतात की, रोल्स राॅइसच्या किंमतीत ओव्हरलँड व समान किमतीच्या किमान पंधरा ते सोळा मोटारी तरी आपण विकत घेऊ शकतो. गावातील लोकांच्या लग्नासारख्या मंगलप्रसंगी व सरकारी लोकांच्या घरी जरूरीनुसार डाॅक्टरांची ने-आण करण्यासाठी माझ्या मोटारी नेहमी मागितल्या जातात व दिल्याही जातात. अशावेळी नकार देणे माणुसकीला धरून तुम्हास वाटते काय? मग आता मला सांगा की मोठ्या शिकस्तीच तुमच्या म्हणण्याप्रमाणे एक दोन रोल्स राॅइस गाड्या मी घेऊ शकलो तर त्यातून फिरण्याचा थोडाफार आनंद मला मिळू शकेल असे फार तर म्हणा. पण सध्यासारखी सर्वांच्या उपयोगी पडण्याची संधी व त्यापासून मिळणारे अंतरीचे समाधान मला मिळविता येईल का? माझ्याबरोबर तुम्ही पुष्कळ वेळा पुण्या-मुंबईस व इतरत्रही प्रवास केलेला आहे आणि अशा प्रवासात बरेचदा आपण सेकंड क्लासमधून गेलेलो असल्याचेही तुम्हाला माहिती आहे. तर ते फर्स्ट क्लाससाठी लागणारे पैसे जवळ नव्हते म्हणून नव्हे, तर इतर तीन-चार मंडळी बरोबर घेता येतात एवढ्यासाठी आणि होणाऱ्या चर्चेमध्ये वेळ किती जलद निघून जातो ते समजूनही येत नाही. शिवाय सेकंड क्लासमध्ये बसल्यावर माझी इभ्रत कमी होते असेही मला कधी वाटत नाही. माझी एकंदर रहाणी रांगड्या माणसाला शोभण्यासारखी आहे. हे तुम्ही पहातच आहात. आपल्या माणसात रमणाऱ्या आणि आपल्या मातीशी नाळ जोडणाऱ्या लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना मानाचा मुजरा.


"कोल्हापूर म्हणजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज म्हणजे कोल्हापूर"


हे फक्त एक समीकरण नसुन हा प्रत्येक करवीरकर नागरिकाचा अढळ विश्वास आहे. समाजकारण, राजकारण, शेती, उद्योग, खेळ, कला, संस्कृतीक, विज्ञान, तंत्रज्ञान, इतिहास, भूगोल, शिक्षण आणि अशाच असंख्य गोष्टी या लोकराजाने स्वतःच्या संस्थानात खुलवल्या आणि फुलवल्या देखील. अनेकांना राजाश्रय दिला, गरजूंना मदती केल्या. कोल्हापूरला कलापूर, कुस्तीची पंढरी, वस्तीगृहांचे शहर, व्यापार पेठ, तलावांचे गाव, समृध्द नगर हि नावं या राजाच्या कर्तृत्वामुळेच मिळाली. हा राजा धिप्पाड देहाचा होता, तसाच बलाढ्य मनाचाही होता. शाहू महाराज आधुनिक महाराष्ट्राचे एक पितामह होते, शाश्वत विकास कार्य दूरदृष्टीतून पहाणारे ते भारताचे भाग्यविधाते होते, जुन्या अंधश्रध्दा व रूढी-परंपरांना कडाडून विरोध करणारे ते सत्यशोधक होते, भारतीय आरक्षणाचे ते जनक होते. असा द्रष्टा आणि दूरदृष्टीचा लोककल्याणकारी राजा पुन्हा होणे नाही. "भूतलावरील या सर्व मानवजातीचा उध्दार करणाऱ्या थोर महापुरूषांचा वारसा सांगणारा पिंड होता राजाचा म्हणूनच राजा राजर्षी झाला जनतेचा"


सहा फूट उंची आणि धिप्पाड शरिरयष्टी असणाऱ्या शाहू महाराजांकडे भीमासारखी ताकद होती. मुळातच अंगापिंडाने मजबूत असणाऱ्या महाराजांनी तालमीत कसून व्यायाम केल्याने आणि कुस्तीचा सराव केल्याने महाराजांचे शरीर एखाद्या कुस्तीगीर पैलवानासारखे सुडौल आणि मजबूत बनले होते. महाराज स्वतःला राजा नव्हे तर शेतकरी म्हणवत असत. 'मराठा हा पूर्णवेळ लढवय्या तर, शांततेच्या काळात उत्कृष्ट शेतकरी आहे' शिपाईगिरी ही आपल्या पाचवीला पुजलेली परंतु आपण मुळचे कुणबी अर्थात शेतकरीच आहोत. महाराजांनी कायम पुढील शेकडो वर्षांचा विचार केला. शेतीकडेही त्यांनी कधीच पारंपरिक दृष्टीने पाहिले नाही. माझा शेतकरी शहाणा झाला पाहिजे, त्याने नवनवीन पिके घेतली पाहिजेत असा त्यांचा अट्टहास होता. शेतमालाला योग्य भाव मिळावा, स्थानिक युवकांना रोजगार मिळावा म्हणून उद्योग-धंद्यांच्या वाढीसाठी महाराजांनी नवीन बाजारपेठा उभारल्या जयसिंगपूर, तसेच शाहुपूरीतील गुळाची व्यापारपेठ ही त्याचीच उदाहरणे आहेत. स्वतःच्या संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तिचे करणारे महाराजा म्हणजे शिक्षणरूपी गंगोत्री सर्वसामान्य व दिनदलीत लोकांच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचवणारे आधुनिक भारताचे भगीरथच होते. महाराजांना शिकारीची आवड होती. शिकारीला गेल्यावर स्वतः अस्वलाशी एकट्याने झुंज देणारे, चार बैलांची मोट एकट्याने ओढणारे, करवीराहून महाबळेश्वरला घोड्यावरून रपेट करत सहा तासात पोहोचणारे, बडोद्याच्या साठमारीत चवताळलेल्या हत्तीला सामोरे जाणारे शाहू महाराज म्हणजे एक अलौकिक आणि अस्सल मर्दानी व्यक्तीमत्व होते. आर्ध्याहून जास्त जगावर राज्य गाजवणाऱ्या आणि ज्यांच्या साम्राज्यावरिल सूर्य कधीच मावळत नाही अशा या ब्रिटनच्या प्रिन्स ऑफ वेल्स या ब्रिटीश सम्राटाला महाराष्ट्रातील पुण्यामध्ये आणून युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला वाकून मुजरा करायला लावणारे शाहू महाराज एक मुत्सद्दी आणि धोरणी व्यक्तिमत्वाचे होते. ब्रिटीश व्हाईसराॅयने भारतातील सर्व संस्थानिकांना दिल्ली दरबारी बोलाविले असता सोनं, हिरे, माणके परिधान करून आलेल्या सर्व संस्थानिकांच्या गराड्यात सरळ साध्या भारतीय वेशात गेलेल्या गळ्यात भोसलाईचं लेणं असलेली कवड्यांची माळ घातलेल्या, सहा फूट उंची आणि धिप्पाड - तेजाळ शरीरयष्टी असणाऱ्या, काळाचा कर्दनकाळ भासणाऱ्या आणि सगळ्या दरबारात उठून दिसणार्‍या या जातिवंत मराठा राजाला पाहून भारतीय संस्थानीकच नव्हे तर गोरे ब्रिटीश अधिकारी अन् सबंध दिल्ली दरबार थक्क झाला होता.


"पहिली संपत्ती शरीर संपत्ती, दुसरी पुत्र संतती आणि मग तिसरी भौतिक संपत्ती"

- राजर्षी छत्रपती शाहू महाराज


"लोकराजा राजर्षी छत्रपती शाहूमहाराज यांच्या जयंतीनिमित्त मानाचा मराठी मुजरा"

🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🚩🚩💐💐💐

Post a Comment

0 Comments